अजमल यांच्याकडे दहशतवादी संघटनांशी संबंधित परदेशी देणग्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2020
Total Views |

ajmal-1024x614_1 &nb

मुंबई : बांगलादेशी मुसलमानांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे(एआययुडीएफ) प्रमुख बद्रुद्दिन अजमल यांनी आपल्या ‘अजमल फाऊंडेशन’ या शैक्षणिक संस्थेसाठी एफसीआरए अर्थात परदेशी देणगी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून ६९.५५ कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त केल्या आहेत.
 
 
 
अमेरिका, युके आणि तुर्कस्तानातील ज्या संस्थांकडून ही देणगी प्राप्त झाली आहे, त्या संस्था दहशतवादी संघटनांशी थेट संबंधित आहेत. विशेष म्हणजे, यातील केवळ दोन कोटी पाच लाख रुपये शैक्षणिक कारणासाठी वापरण्यात आले असून उर्वरित पैसा आपल्या राजकीय पक्षाच्या कामासाठी वापरला आहे. ‘लीगल राईट्स ऑब्झर्व्हेटरी’ या संस्थेने या प्रकरणी गृहमंत्रालयाच्या ‘एफसीआरए’ विभागाकडे तक्रार केली असून ‘अजमल फाऊंडेशन’चे ‘एफसीआरए’ नोंदणीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे.
 
या तक्रारीत म्हटले आहे की, बद्रुद्दिन अजमल यांनी २०१२ ते २०१९ या काळात विविध संस्थांकडून एकूण ६९,५४,८७,९२७ रुपयांची देणगी घेतली आहे. देणगीदार संस्थांपैकी ‘अल-इमदाद फाऊंडेशन - युके’ ही संस्था ‘हमस’ या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेशी थेट संबंधित असून या संघटनेने इस्रायलींच्या विरोधात पॅलेस्टाईनमध्ये आत्मघातकी हल्ले केले आहेत.
 
 
‘हमस’ संस्था कोट्यवधींचे ‘हलाल सर्टिफिकेशन’ शुल्क घेऊन ते पैसे दहशतवादी कारवायांना पुरवते. देणगी देणार्‍या दुसर्‍या संस्थेवर ‘उम्मा वेलफेअर ट्रस्ट - युके’वर पैशांची अफरातफर आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवणे असे आरोप आहेत. तुर्कस्तानातील ‘इन्सानी यार्दिम वक्फी’(मानवी हक्क व मानवी स्वातंत्र्य संस्था) ही तिसरी देणगीदार संस्था असून तिचे अल-कायदा व ग्लोबल जिहाद नेटवर्कशी असणारे संबंध जगभरातील अनेक सरकारी संस्था, थिंक टँक आणि प्रसारमाध्यमांनी उघड केले आहेत.
 
‘मुस्लीम एड - युके’ ही देणगीदार संस्था काश्मिरी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदिनशी असलेले संबंध आणि त्यांच्या दहशतवादी कारवाया याबद्दल आसाममधील सेंटिनल वृत्तपत्रात समोर आले आहे. यासह पॅलेस होल्डिंग्स आयएनसी - युएसए, मुस्लीम एड, रझाक मुसा अ‍ॅण्ड ब्रदर्स अ‍ॅण्ड नेफ्युज, मौलाना अब्दुल कादर पटेल - बोट्सवाना या व्यक्ती तसेच संस्थांकडूनही या अवैध देणग्या घेण्यात आल्या. या सर्वांनीच वेळोवेळी भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
 
 
‘एलआरओ’ने या फाऊंडेशनविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची आणि कठोर निर्णय घेण्याची सरकारला विनंती केली आहे. मौलाना बद्रुद्दिन अजमल हे मुंबईचे निवासी असून त्यांचा अधिकृत व्यवसाय सुगंधी द्रव्यांचा आहे. अजमल फाऊंडेशन ही आसाममधील संस्था मौलानांनी स्थापन केली असून ही संस्था आणि एयुआयडीएफ हा राजकीय पक्ष पूर्णपणे मौलाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात आहे.
 
 
आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांची अवैध घुसखोरी होत असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणालाही त्यांनी विरोध केला होता. देशहिताच्या नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात ‘सीएए’ला मौलाना आणि त्यांच्या पक्षातील मंडळींनी वेळोवेळी ठाम विरोध केला होता. ‘एनआरसी’लादेखील त्यांचा विरोध होता व त्यांनी त्याविरोधात आवाजही उठवला होता. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारल्याबद्दल त्याच्यावर हल्लाही केला होता.




@@AUTHORINFO_V1@@