मुंबई : संभाजीनगरमध्ये तरूणीवर अत्याचार करणार्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल होताच तत्काळ अटक करण्याऐवजी पाठीशी घालणार्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवार, दि. ३० डिसेंबर रोजी केली.
पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षावर बलात्कारासारखा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असुन पत्रकार परिषदेतही बसण्याचे धाडस करत आहे. हे केवळ गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच होत आहे. ज्यावेळी बलात्काराचा गुन्हा दाखल होतो त्यावेळी पिडीतेवर कोणताही दबाव येऊ नये, पुराव्यामध्ये छेडछाड होऊ नये म्हणून आरोपीला तत्काळ अटक करून नंतर पुढची कारवाई केली जाते. ’आरोपी असू तर शिक्षा भोगण्यास तयार आहोत’ असे विधान पत्रकार परिषद घेऊन केले जाते. जर तुमची बाजू बरोबर असेल तर गुन्हा दाखल होताच पोलिसांकडे समर्पण होऊन तपासासाठी सहकार्य का केले नाही? अशा पद्धतीने बाहेर मोकाट फिरून पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने खुद्द गृहमंत्र्यांनीच कायद्याला बगल दिली आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
“राज्याचे, राज्यातील महिलांचे संरक्षण करणे हे गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे. गुन्हेगारांना संरक्षण देणे हे नव्हे. ’शक्ती कायदा’ लाग करून जर गृहमंत्रीच आरोपीचे रक्षण करणार असेल तर कायद्याची अंमलबजावणी तरी कशी होणार? राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर हे अशा परिस्थितीत पीडितेच्या बाजूने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजूने या आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा खटला ‘शक्ती कायद्या’नुसार ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवून पीडितेला न्याय द्यावा,” अशी मागणी विक्रांत पाटील यांनी केली.