विकासाचे ‘ठाणे’ एक वर्ष मागे पडले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2020
Total Views |

thane_1  H x W:



२०२०या सरत्या वर्षात मागील काही वर्षांतील विविध विकासकामांच्या पूर्तीची आस ठाणेकरांना लागली असतानाच, प्रारंभीच्या दोन महिन्यांनंतर मार्च महिन्यात प्रादुर्भाव झालेल्या कोरोनामुळे ठाण्याच्या विकासालाच खीळ बसली. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत ‘महापौर’ चषकाच्या निमित्ताने राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचा फड रंगला. मात्र, मार्चच्या दुसर्‍या सप्ताहात ठाण्यातील घोडबंदर भागात ‘कोविड’चा पहिला रुग्ण आढळल्याने सर्वकाही ठप्प झाले. क्रीडापटूंनाही सरावाविना घरात बसावे लागले. या महामारीमुळे नववर्ष स्वागतयात्रेलाही खीळ बसली. प्रथमच ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत नववर्षाचे स्वागत झाले नाही. त्यानंतर, देवही कुलुपबंद होऊन सरकारी आदेशाने मंदिरांचे दरवाजेही बंद झाले. तब्बल आठ महिने ठाणेकरांना कोरोनाचा प्रादुर्भाव, ‘निगेटिव्ह’, ‘पॉझिटिव्ह’, ‘संचारबंदी’, ‘टाळेबंदी’, ‘मास्क’, ‘पीपीई किट’ या सारख्या शब्दछळांसोबत दिवस काढावे लागले. ‘कोविड’काळात विशेष राजकीय घडामोडी घडल्या नसल्या, तरी भाजप व मनसेने सत्ताधार्‍यांविरोधात जागल्याची भूमिका उत्तमपणे वठविली, तरीही प्रशासनाच्या मदतीने वेबिनार सभा-बैठकांमधून मनमानी कारभार करण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले. वर्षाच्या अखेरीला मात्र, ‘अनलॉक’ होऊन जनजीवन काही अंशी पूर्वपदावर आले असले, तरी २०२०मध्ये विकासाचे ‘ठाणे’ मात्र एक वर्ष मागे पडले.



जिल्हा प्रशासनाच्या नवनव्या कृषी योजना, ग्रामविकास, तर ठाणे महापालिकेच्या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, प्रस्तावित नवे ठाणे स्थानक, जलवाहतूक, क्लस्टर, स्मार्ट सिटी, एसआरए, मेट्रो, बुलेट, एलआरटी, सॅटीस, स्कायवॉक, एफओबी आणि आरओबी आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांसोबतच थेट नागरिकांशी संवाद साधणारे जनसंवाद कार्यक्रमदेखील कागदावरच स्थिरावले. यातील काही प्रकल्प यापूर्वीच मंजूर झाले असले, तरी २०२०या वर्षात यात विशेष प्रगती साधण्यात कोरोनामुळे आणि कामगार, मजुरांच्या स्थलांतरामुळे अटकाव झाला. ‘लॉकडाऊन’मुळे रेल्वेसेवा ठप्प झाल्याने किंबहुना, सर्वसामान्यांसाठी अद्यापही लोकल बंद असल्याने अनेकांचे व्यवसाय-रोजगार मात्र हिरावले गेले. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये केवळ आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठीच संपूर्ण यंत्रणा सक्रिय झालेली दिसून आली. वर्षाखेरीचे दोन महिने विकासाच्या पायाभरणीसाठी महत्त्वाचे ठरले.

नूतन वर्षाची सुरुवात करताना तत्कालीन मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विकासाच्या स्वप्नांचे इमले रचले. मात्र, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच 4 मार्चला त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सोडला. त्यानंतर अनेक दिवसांनी त्यांच्याजागी आलेल्या आयुक्त विजय सिंघल यांना कोरोना आणि सत्तासंघर्षामुळे काही महिन्यांतच गाशा गुंडाळावा लागला. या कालावधीत ‘कोविड रुग्णालये’, ‘कोविड सेंटर्स’ आणि ‘क्वारंटाईन केंद्रा’च्या उभारणीत व ठेकेदारीमध्ये भ्रष्ट कारभाराचे आरोप-प्रत्यारोप झाले. त्याचबरोबर ‘कोविड रुग्णालया’त मृतदेह अदलाबदलीसह रुग्णांच्या आत्महत्या आदीसारखे अनेक गलथान प्रकार चव्हाट्यावर आले. प्रशासनाचे सुनियोजन नसल्याने रुग्णवाहिका व औषधांअभावी अनेक जणांना ‘कोविड’ प्रादुर्भावामुळे मृत्यूला कवटाळावे लागले. पोलिसांनीही प्राणांचे मोल देऊन जीवाची बाजी लावली. सरत्या वर्षात ठाणे मनपाचे दोन नगरसेवक विलास कांबळे (भाजप), मुकुंद केणी (राष्ट्रवादी) यांचे निधन झाले, तर अभिनेते रवि पटवर्धन, अविनाश खर्शीकर, ज्येष्ठ गीतकार मुरलीधर गोडे, नाट्यनिर्माते दत्ता घोसाळकर, ‘मामलेदार मिसळ’चे लक्ष्मण मूर्डेश्वर, ‘भारत सह. बँके’चे मा. य. गोखले आणि ‘टीजेएसबी’चे अजित रानडे यांनी अचानक ‘एक्झिट’ घेतली. समाधानाची बाब म्हणजे, अनेक टीका-टोमण्यानंतर महापालिकेने ‘कोविड वॉर रूम’ उभारून चूक सुधारली. त्यानंतर मनपा आयुक्तपदी आलेल्या डॉ. विपीन शर्मा यांनी बर्‍यापैकी जम बसवून कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे.

परंतु, कोरोनाकाळात सोकावलेल्या अनधिकृत बांधकामाकडे अद्याप पुरेशी वक्रदृष्टी केलेली नसल्याने शहरात बजबजपुरी माजली आहे. दरम्यान, अशा बिकट काळात वर्षभरात तीन आयुक्त अनुभवणारी ठाणे पालिका बहुदा पहिलीच असावी. यावर्षी ‘क्लस्टर’चे भूमिपूजन करून सिडको, म्हाडासारख्या इतर प्राधिकरणांच्या मदतीने प्रकल्प रेटण्यासाठी आता २०२१ उजाडणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील अनेक कामे रेंगाळत आहेत. तर एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली आणि विकास शुल्काच्या माध्यमातून खासगी विकासकांना ‘रेड कार्पेट’ घालण्याचे कामही सत्ताधारी आणि प्रशासनाने केले. कोरोनाचा कहर सुरू असतानाच ‘निसर्ग वादळ’ आणि अतिवृष्टीने ग्रासले. त्यानंतर अवकाळी पावसानेही शेतीचे अपरिमित नुकसान झाले, तर शहरी भागात करवसुली रोडावल्याने अर्थकारण कोलमडून पडल्याने हलाखीची परिस्थिती निर्माण झाली, तरीही नियम व स्वयंशिस्तीचा चांगला परिणाम आरोग्यावर झाला. किंबहुना, हे सर्व पर्यावरणाच्या, चांगलेच पथ्यावर पडल्याचे दिसून आले.
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@