दोष तुमचाच; इतरांचा नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2020
Total Views |
ICC 2020 _1  H
 
 
 
 
कोरोना संकटातून सावरल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीस क्रिकेटची गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाली. मार्च-एप्रिलपासून रद्द झालेले क्रिकेटचे सामने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांप्रमाणेच विविध देशांच्या लीग स्पर्धांनाही प्रारंभ झाला.
 
 
 
२०२१ या वर्षात सर्व देशांकडून गेल्या वर्षांपेक्षा अधिक क्रिकेटचे सामने खेळविण्यात येणार आहेत. २०२० या संपूर्ण वर्षभराची उणीव भरून काढण्यासाठी सर्वच देश प्रयत्नशील आहेत. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद’ही (आयसीसी) क्रिकेट विश्वातील हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. उदाहरण घ्यायचेच झाले तर ‘आयसीसी’कडून आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन पोल’चे घेता येईल. कोरोनाकाळात क्रिकेटचे सामने बंद असले, तरी क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करण्याच्या दृष्टीने ‘आयसीसी’ने जगभरातील क्रिकेट रसिकांना ‘ऑनलाईन पोल’द्वारे तिन्ही प्रकारच्या संघनिवडीसाठी खेळाडूंची नावे पाठविण्याचे आवाहन केले होते.
 
 
 
‘आयसीसी’च्या या आवाहनाला जगभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. क्रिकेट खेळणार्‍या देशांनी याला प्रतिसाद तर दिलाच; मात्र ज्या देशांकडून क्रिकेट खेळले जात नाही, अशा राष्ट्रांतील काही क्रिकेटप्रेमींकडूनही नावे सुचविण्यात आली. विशेष म्हणजे, क्रिकेटप्रेमींनी सुचविलेल्या नावांच्या आधारे आणि खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत ‘आयसीसी’ने कसोटी, एकदिवसीय आणि ‘टी-२०’ संघातील खेळाडूंच्या निवडीसह संघनिवड जाहीर केली. या संघनिवड प्रक्रियेत भारतीय खेळाडूंचा जगभरात बोलबाला दिसून आला. जगभरातील सर्वोत्तम संघ म्हणून निवडण्यात आलेल्या या संघात सर्वाधिक भारतीय खेळाडूंचा समावेश असल्याचे पाहावयास मिळाले.
 
 
भारतासोबत इतरही काही देशांतील खेळाडूंना या संघात स्थान मिळाले. भारतासह अनेक देशांतील आजी-माजी क्रिकेटपटूंसह अनेक क्रिकेट रसिकांनी ‘आयसीसी’च्या या संघनिवडीचे स्वागत केले. मात्र, भारताचा कट्टर विरोधक असणार्‍या पाकिस्तानला हे काही सहन झाले नाही. पाकिस्तानने या प्रक्रियेनंतर ‘आयसीसी’ला दोष न देता थेट भारताविरोधातच गरळ ओकण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेट रसिकांनी ‘आयसीसी’ भारताच्या दबावापोटी हे सर्व करत असल्याचा जावईशोध लावला. आमच्या देशातील एकाही खेळाडूला या संघात स्थान मिळत नाही.
 
 
परंतु, संघाच्या कर्णधारासह अनेक भारतीय खेळाडूंना स्थान मिळणे म्हणजे ही एक ‘सेटिंग’ असल्याचा आक्षेप पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंनी घेतला. पाकच्या या वागण्यानंतर जगभरातील क्रिकेट समीक्षक आणि जाणकारांनी जे मुद्दे उपस्थित केले ते लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. क्रिकेट समीक्षकांनी केलेल्या मुद्द्यानंतर या प्रक्रियेविरोधात पाकिस्तानची बोलती बंद झाली. समीक्षकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या धर्तीवर क्रिकेटचे सामने होत नसल्याने पाकिस्तानच्या संघाला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अस्तित्वासाठी झगडावे लागत असल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानच्या क्रीडा रसिकांमध्येही गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घट होऊ लागल्याची आकडेवारी आहे. चाहते कमी झाल्याने पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी परिणामी साहजिकच मतदान कमी झाले आणि त्यांच्या खेळाडूंची निवड झाली नाही.
 
 
मात्र, केवळ चाहत्यांचा प्रतिसाद हा मुद्दा लक्षात घेऊन चालणार नाही. गेल्या दहा वर्षांतील (दशकभरातील) खेळाची कामगिरीही लक्षात घेऊन ही संघनिवड करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या म्हणण्याप्रमाणे माजी कर्णधार शोएब मलिक, मिसबाह उल हक बाबर आझम या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय असतानाही त्यांचा सर्वोत्तम संघासाठी विचार करण्यात आला नाही. मात्र, समीक्षकांच्या म्हणण्यानुसार पाकच्या आजी-माजी खेळाडूंची कामगिरी ही सर्वोत्तम संघातील खेळाडूंच्या तुलनेत बरीच कमी आहे. अशा परिस्थितीत त्यांची निवड कशी करता येईल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
 
 
२०१९ साली झालेल्या ‘विश्वचषक’ स्पर्धेतही पाकिस्तानच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी न केल्याने दुबळ्या संघांकडूनही पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरोधात भाष्य करण्याआधी आपण गेल्या दशकभरात नेमके काय केले, याचा विचार करण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर समीक्षकांनी बोट ठेवले आहे. आपण कुठे कमी पडलो याचे मंथन पाकिस्तानने केल्यास किमान दुसर्‍याला दोष देण्याची वेळ ओढवणार नाही, अशी कानउघडणीही क्रिकेट समीक्षकांनी केली आहे.

- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@