बोरिवली नॅशनल पार्कमध्ये 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडाचे दुर्मीळ दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2020
Total Views |

vulture_1  H x
(छाया - विजय वरठे) 

सिंह सफारीच्या परिसरात वावर



मुंबई (अक्षय मांडवकर) - प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये आढळणारे आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले ‘हिमालयीन ग्रिफाॅन’ जातीचे दुर्मीळ गिधाड मुंबईतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त आढळले. गुरुवारी या गिधाडाचे दर्शन वनधिकाऱ्यांना झाले. यानिमित्ताने अनेक वर्षांनंतर राष्ट्रीय उद्यानात गिधाड दिसल्याची नोंद झाली आहे.


महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी 'पांढऱ्या पुठ्ठ्याची', 'लांब चोचीची' आणि 'पांढरी गिधाडे' १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. भारतातील गिधाडांच्या प्रजातीमधील सर्वात मोठे 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडाचे दर्शन बोरिवली राष्ट्रीय उद्यानात झाले. या जातीची गिधाडे कोकणातही आढळतात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि म्हसाळा तालुक्यातील काही भागांमध्ये गिधाडांचा अधिवास असून याठिकाणी त्यांची घरटीही आहेत.

 



राष्ट्रीय उद्यानातील ट्रॅक्सडर्मी केंद्रात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला गुरुवारी 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाड दिसले. उद्यानातील सिंह सफारीच्या आवारातील एका झाडावर हे गिधाड बसले होते. गिधाडासंदर्भातील माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्याठिकाणी त्यांनी धाव घेतली. दोन तासांपेक्षा अधिक काळ गिधाड झाडावर बसून होते. त्यानंतर ते त्याठिकाणाहून उडून गेले. राष्ट्रीय उद्यानात फार वर्षांपूर्वी गिधाड दिसल्याच्या नोंदी आहेत. मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाखस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये 'हिमालयीन ग्रिफाॅन' प्रजातीच्या गिधाडांचे वास्तव्य आहे. या गिधाडाचे वजन वजन साधारणतः ८ ते १२ किलो पर्यंत असून त्यांच्या पंखांचा व्यास ९ ते १० फूट इतका असतो. राष्ट्रीय उद्यानात दिसलेले हे गिधाड 'हिमालयीन ग्रिफाॅन'चे नवजात असल्याची शक्यता छायाचित्रावरुन पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 

 

@@AUTHORINFO_V1@@