निसर्गाशी सोयरीक करणारी ‘गृहिणी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2020
Total Views |

reema _1  H x W
 
 
आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासण्यासाठी घरातूनच निसर्गाशी सोयरीक साधत थेट लघुपटाची निर्मिती करणार्‍या ठाण्याच्या पक्षिप्रेमी सीमा राजेशिर्के यांनी इतर गृहिणींसमोर नवा आदर्श उभा केला आहे. त्यांच्याविषयी...
 
 
 
कोरोनामुळे लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे अवघं जग थबकलं होतं, तेव्हा घरातच ‘लॉक’ झाल्याने या वेळेचा सदुपयोग करीत सीमा राजेशिर्के या ठाणेकर गृहिणीने काँक्रीटच्या जंगलात निसर्गाशी सोयरीक साधत चक्क घराच्या खिडकीत पक्ष्यांची शाळा भरवली. आगंतुक पाहुण्यांप्रमाणे घरात बिनधास्त वावरणार्‍या या पक्ष्यांना टिपण्याचा नित्यनेम सुरू झाला अन् या दुर्मीळ पक्षिचित्रणाची त्यांनी बनवलेली ‘विंडो बर्डिंग’ ही डाक्युमेंटरी सध्या निसर्गप्रेमींसह लाखो आबालवृद्धांमध्ये हीट झाली आहे. एका गृहिणीच्या या कर्तृत्वाने सर्वच गृहिणी अचंबित झाल्या आहेत. अनेकींनी घरबसल्या असे नानाविध छंद जोपासण्यास सुरुवात केल्याचे सीमा राजेशिर्के सांगतात.
 
 
फलटण येथे माहेरी असताना लहानपणीच त्यांना घराच्या अंगणातील तुळशी वृंदावनात बागडणारे सूर्यपक्षी पाहून पक्ष्यांविषयी ओढ निर्माण झाली. लग्नानंतर सासरी डेरवणलाही विस्तीर्ण जंगल असल्याने तेथील जैवविविधता पाहून त्यांची निसर्गाशी गट्टी जमली. नंतर पतीसमवेत ठाण्यात स्थिरावल्यानंतर परंपरेप्रमाणे गृहिणीचे कर्तव्य बजाविण्यास सुरुवात केली. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे खाडीच्या मध्यभागी वसलेल्या ‘ब्रह्मांड’ गृहसंकुलात फेज-8 मध्ये चौथ्या मजल्यावरील घरकुलात मुलगी वसुंधरा आणि मुलगा परम या दोन चिमण्या-पाखरांसह संसार सुरू झाला. पती हौशी ट्रेकर असल्याने गड-किल्ल्यांची छायाचित्रे काढण्याचा त्यांना छंद आहे. एक दिवस त्यांचा मॅन्युअल कॅमेरा हाताळत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा कॅमेर्‍याच्या वाटेला गेलीच नाही.
 
काही वर्षांनंतर डिजिटल युग आल्याने पतीने मुलांसाठी आणलेला डिजिटल कॅमेरा सीमा यांनीही हाताळण्यास सुरुवात केली. मग काय छंदच जडला. दुपारच्या फावल्या वेळात त्या कॅमेर्‍यातून खिडकीसमोरील झाडावर बसलेल्या पक्ष्यांचे फोटो काढणे, शूटिंग करणे असे उपक्रम घरबसल्या सुरू झाले. झाडांवरील पक्षीही आधी खिडकीत नंतर दिवाणखान्यापर्यंत येऊ लागले. सीमा यांनी या विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या छबी कॅमेर्‍यात टिपण्याची एकही संधी दवडली नाही. पाहता पाहता फोटोंचा मोठा संग्रह जमा झाला. या फोटोंचं करायचं काय?
 
 
दरम्यान, वृत्तपत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित २०१४च्या पर्यावरणविषयक लघुपटासाठी पक्ष्यांच्या फोटोची डॉक्युमेंटरी पाठविण्याची जाहिरात आली होती. त्यात कुटुंबीयांच्या मदतीने त्या पक्ष्यांच्या फोटोंची ‘विंडो बर्डिंग’ ही डॉक्युमेंटरी तयार करून पर्यावरणविषयक लघुपट स्पर्धेसाठी पाठविली अन् सीमा यांच्या या मेहनतीला फळ आले. ‘हौशी गटात’ त्यांचा चक्क प्रथम क्रमांक आला. राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सीमा राजेशिर्के यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
 
 
कॅमेरा हाताळण्याचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नसताना फावल्या वेळात पती आणि मुलांच्या हट्टाखातर जपलेल्या छंदाचे पुढे राजेशिर्के यांना वेडच लागले. त्याच वेडाने प्रेरीत होऊन त्यांनी मैत्रिणींच्या आग्रहाखातर पक्ष्यांच्या तब्बल १०० फोटोंचे ब्रह्मांड येथे प्रजासत्ताक दिनी प्रदर्शन भरवले. ‘पर्पल मुरहेन’, ‘क्रेक’ अशा दुर्मीळ पक्ष्यांसोबत ‘रेड विस्कर्ड बुलबुल’, ‘हळद्या’, ‘लालबुड्या बुलबुल’, ‘शिपाई बुलबुल’, ‘स्वर्गीय नर्तक’, ‘गवई चंडोल’, ‘पाणकोंबडी’, ‘एशियन प्रिनिया’, ‘कोतवाल’, ‘सनबर्ड’, ‘टेलर’ आदी सहसा दृष्टीस न पडणारे नाना जातींचे पक्षी खिडकीतूनच टिपल्याने राजेशिर्के यांच्या डॉक्युमेंटरीला ‘विंडो बर्डिंग’ असे साजेसे नाव देण्यात आले. चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या सल्ल्याने फोटो सर्कल संस्थेच्या फोटोग्राफर प्रवीण देशपांडे यांच्या संपर्कात आल्यानंतर ‘विंडो बर्डिंग’चे भव्य दिव्य प्रदर्शन ठाण्यातील कापुरबावडी येथील ठाणे महापालिकेच्या कला भवनात भरविण्यात आले.
 
त्यांनी केलेल्या शूटिंगचे राजेशिर्के कुटुंबीयांनी घरच्या घरीच रेकॉर्डिंग आणि एडिटिंगदेखील केले. मुलगी वसुंधराने रेकॉर्डिंग आणि परम याने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. पक्ष्यांच्या आवडीनिवडी न्याहाळताना त्यांचे बारकावे असलेली ‘विंडो बर्डिंग’ ही छोटेखानी डॉक्युमेंटरी बनवली. सध्या ही डॉक्युमेंटरी युट्यूबवर प्रचंड हीट ठरली आहे. विशेष म्हणजे, अतिशय सुंदर आणि पूर्णतः मराठीमध्ये असलेल्या या डॉक्युमेंट्रीला प्रचंड व्हूज मिळत असून, तब्बल साडेतीन लाख जणांनी पसंती दर्शवली आहे.
 
 
या डॉक्युमेंट्रीमध्ये चिमणी, कावळा, कबुतर, पोपट या नेहमीच्या पक्ष्यांसोबत ‘पर्पल मुरहेन’, ‘क्रेक’, ‘रेड विस्कर्ड बुलबुल’, ‘हळद्या’, ‘रेड व्हेंटेड बुलबुल’, ‘चंडोल’, ‘पाणकोंबडी’, ‘एशियन प्रिनिया’, ‘कोतवाल’, ‘सनबर्ड’, ‘टेलर’ असे सहसा शहरात न दिसणारे पक्षी आपल्या घराच्या खिडकीतून टिपले आहेत. त्यांचे फोटो बघून, त्यांची नावे शोधून, त्यांच्याबद्दल माहितीदेखील यात आहे. तेव्हा, अगदी घरबसल्या एखादी गृहिणी काय कमाल करु शकते, हे सीमा रार्जेशिर्के यांनी आपल्या या अनोख्या छंदातून अवघ्या जगाला दाखवून दिले आहे. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...



- दीपक शेलार 
@@AUTHORINFO_V1@@