गुजरातमध्ये बदनाम झालेल्या कंपनीला टीएमसीचे रेड कार्पेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2020
Total Views |

TMC_1  H x W: 0
 
 
ठाणे : गुजरातमध्ये बदनाम झालेल्या जाहिरात कंपनीला ठाणे महापालिकेने रेड कार्पेट अंथरले आहे. अहमदाबाद महापालिकेने तब्बल ५० नोटिसा बजाविल्याने बदनाम झालेल्या कंपनीला तब्बल १५ वर्षाच्या काळात दरवर्षी १ कोटी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला भाजपचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अहमदाबाद महापालिकेकडून सत्य स्थिती जाणून घेण्याची विनंती ठामपा प्रशासनाला केली आहे.
 
 
जाहिरात विभागाचे संपूर्ण काम ऑनलाईन, जाहिरात फलकांच्या परवानगीसाठी संगणक प्रणाली आणि शहरातील जाहिरात फलकांचे नियमित सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे काम मे. अॅडव्हीजन नामक जाहिरात कंपनीला देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. पुणे येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने अहमदाबाद महापालिकेत काम केले असुन अहमदाबाद महापालिकेचे उत्पन्न चार वर्षांत १४८ कोटी ७८ लाखांवर पोचल्याचा कंत्राटदाराचा दावा ठाणे महापालिकेने मान्य केला आहे.
 
 
त्यानुसार या कंपनीला पीपीटी तत्वावर पहिल्या टप्प्यासाठी १५ लाख, ऑनलाईन संगणक प्रणाली तयार केल्यानंतर १० लाख आणि दरमहा देखरेख व अहवालांसाठी दरमहा १० लाख रुपये आणि पुढील १५ वर्षांसाठी प्रतीवर्षी ५ टक्के वाढीने रक्कम दिली जाईल. त्याचबरोबर वाढलेल्या महसूलाच्या रक्कमेवर प्रतिवर्षी १० टक्के वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे.या कंपनीला महापालिकेकडून ५०० चौरस फूट जागाही १५ वर्षांसाठी दिली जाणार आहे. या प्रस्तावानुसार संबंधित कंपनीच्या तिजोरीत वार्षिक किमान १ कोटी २० लाख रुपये जमा होणार आहेत.
 
 
भाजप गटनेते संजय वाघुले यांनी अहमदाबाद महापालिकेकडून मिळविलेल्या कागदपत्रांनुसार, संबंधित कंपनीला कामात कसूर केल्याबद्दल तब्बल ५० वेळा कारणे दाखवा तर, ८ वेळा दंड ठोठावण्याच्या नोटिसा देण्यात आल्या.संबंधित कंपनीमुळे अहमदाबाद महापालिकेच्या उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नसुन गेल्या चार वर्षांत कंपनीला १ कोटी ६४ लाख ४७ हजार ८५५ रुपये प्रदान केल्याचे अहमदाबाद महापालिकेने स्पष्ट केले आहे. तेव्हा, या कागदपत्रांवरून संबंधित कंपनीकडून ठाणे महापालिकेची दिशाभूल केली जात असुन, कोणत्या आधारावर ठाणे महापालिका या कंपनीला रेड कार्पेट अंथरत आहे, असा सवालही वाघुले यांनी केला. या संदर्भात ठाणे महापालिका प्रशासनाने अहमदाबाद महापालिकेकडून वस्तूस्थिती जाणून घेऊन त्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
 
 
जाहिरात फलकांसाठी जागा कुठे ?
 
 
ठाणे महापालिकेने शहरातील ५० महत्वाचे चौक व परिसर, महत्वाच्या रस्त्यांवर ५० ठिकाणी शौचालयांच्या बदल्यात जाहिरात फलक, मोबाईल व्हॅन आदींना जाहिराती करण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे.जाहिरात महसूल मिळवून देणाऱ्या एकाच रस्त्यावर दोन ठिकाणी दिशादर्शक फलक उभारून जाहिराती केल्या जात आहेत. महत्वाचे रस्ते होर्डिंग व जाहिरात फलकांनी व्यापले आहेत. अशा परिस्थितीत जाहिरात फलकांसाठी नव्या जागा कुठे? कोट्यवधींचे कंत्राट बहाल करण्यासाठीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जाहिरातींसाठी नव्या जागा शोधण्याची टूम काढल्याचा आरोप संजय वाघुले यांनी केला.एकीकडे जाहिरात विभागाचा कारभार पेपरलेस करण्याचे आश्वासन कंपनी देते मात्र, संगणकीय प्रणालीसाठी १५ वर्षांसाठी ५०० चौरस फूट जागा मोफत हवी आहे, याकडेही वाघुले यांनी लक्ष वेधले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@