भाग्यनगरातून दक्षिण दिग्विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2020   
Total Views |

ccc_1  H x W: 0




देशाच्या ज्या भागात आपल्या पक्षाला अद्यापही हवे तसे यश मिळालेले नाही, तेथे ते मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे, या नीतीने भाजप आता दक्षिण दिग्विजयासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी तामिळनाडूमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे. द्राविडी राजकारणाला हिंदुत्वाद्वारे शह देण्याचा प्रयत्न हा अगदीच सोपा नसला तरी अशक्यही अजिबात नाही.
 
 
दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे महानगर असलेल्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली सर्व शक्ती मैदानात उतरविली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार या नेत्यांनी निवडणूक प्रचारात भाग घेतला. त्यासोबतच केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, ओबीसी मोर्चा अध्यक्ष के. लक्ष्मण, महिला मोर्चा अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन आदी सर्व नेतेही प्रचारात उतरले होते.
 
 
केवळ एका महानगराच्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री, पक्षाध्यक्ष यांना मैदानात उतरविल्याची खिल्लीदेखील राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्येही उडविली गेली. हैदराबाद महापालिकेच्या १५० वॉर्डसाठी संपूर्ण तयारी केली आहे, त्यासाठी बिहारच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजाविणार्‍या भूपेंद्र यादव यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी दिली होती. सध्या भाजपचे महापालिकेत केवळ चार नगरसेवक आहेत. सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीचे ९९, तर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे ४४ नगरसेवक आहेत. त्यामुळे यावेळी हैदराबाद महापालिकेत सत्ता प्राप्त करण्याच्या इराद्यानेच भाजप निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरली होती; अर्थात मतदानाच्या नगण्य टक्केवारीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भाजपला या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही, तरी त्यात फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मात्र, या निवडणुकीत भाजपने जी तयारी केली होती, त्यामुळे तेलंगणमध्ये भाजपच्या पक्षसंघटनेला फार मोठे बळ मिळणार आहे, त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार; यात कोणतीही शंका नाही.
 
 
देशाच्या ज्या भागात आपल्या पक्षाला अद्यापही हवे तसे यश मिळालेले नाही, तेथे ते मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे. त्यासाठी अगदी प्रत्येक निवडणुकीत सर्व सामर्थ्यानिशी प्रयत्न करायचे, या नीतीनुसारच हैदराबाद महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार होता. त्यामुळे महानगरपालिकेत भाजपचे किती नगरसेवक निवडून येतील याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व प्रचारात पक्षाचे सर्वोच्च नेते उतरल्याने कार्यकर्त्यांच्या वाढणार्‍या मनोबलाला आहे. कारण, कार्यकर्त्यांचे मनोबल ही भाजपची खासियत आहे. त्यामुळे एकेकाळी दोन खासदारांवर आलेला पक्ष आज ३०३ खासदारांसह सलग दोन वेळा केंद्रात सत्तेत आला आहे. त्यामुळे हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल हा भाजपसाठी दक्षिण दिग्विजयासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
 
 
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तेलंगणमधील आपल्या जनाधाराची चाचपणीदेखील भाजप करीत आहे. कारण, आतापर्यंत तरी कर्नाटक वगळता दक्षिणेतील राज्यांनी भाजपला हात दिलेला नाही. त्यातही कर्नाटकमध्ये सत्ता येण्यात बी.एस. येडीयुरप्पा यांच्या खमक्या नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, आता कर्नाटकनंतर तेलंगणमध्ये भाजपला यश मिळू शकते, याचा भाजपला विश्वास आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत फारसा जोर लावला नसतानाही भाजपला चार जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ती कसर भरून काढायची आहे. हैदराबादमध्ये एवढे जोर लावायचे आणखी एक कारण म्हणजे, ओवेसी आणि त्यांच्या एमआयएमला घरातच आव्हान देणे.
 
 
कारण, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएममुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदाच होत असला तरीही पक्षाचा वाढता जनाधार हा काळजीचे कारण आहे. कारण, सध्याचा ट्रेंड पाहता एकेकाळी काँग्रेसची मक्तेदारी असलेली मुस्लीम मते आता एकगठ्ठा ओवेसींकडे वळायला लागली आहेत. त्यामुळे ओवेसींना त्यांच्या घरातच मोठा धक्का देण्यात भाजपला यश आले, तर ‘मुस्लिमांचा एकमेव मसिहा’ होण्याच्या मनसुब्यांनाही रोखण्याची सुरुवात करता येणार आहे. दुसरीकडे तेलंगणमध्ये काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाचा जनाधार संपुष्टात आला आहे. त्यामुळे चंद्राबाबूंसारख्या के. चंद्रशेखर राव यांच्याही राष्ट्रीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षांना पुन्हा धुमारे फुटण्याच्या आतच त्यांनाही योग्य तो संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
 
 
भाजपच्या अजेंड्यावर तामिळनाडूदेखील भाजपच्या अजेंड्यावर आहे आणि त्यासाठी भाजप किती गंभीर आहे, हे २१ नोव्हेंबर रोजीच्या अमित शाहांच्या दौर्‍यामध्ये पुरेसे स्पष्ट झाले आहे. विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन करताना अमित शाह जे म्हणाले ते अतिशय महत्त्वाचे आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून भ्रष्टाचार, जातीवाद आणि घराणेशाहीविरोधात युद्ध सुरू झाले आहे. देशाच्या विकासासाठी घातक ठरणार्‍या या तिन्ही गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहोत. देशात गेल्या काही काळामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत, त्या सर्व राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला यश मिळाले आहे.
 
 
महत्त्वाचे म्हणजे, त्या सर्व राज्यांमध्ये एका परिवाराची मालमत्ता असलेल्या पक्षांना पराभूत करून घराणेशाहीला धक्का देण्याचे काम झाले आहे. तामिळनाडूमध्येही लोकशाही नव्हे, तर घराणेशाही मानणारा एक पक्ष आहे आणि आता त्यालाही पराभूत करण्याची वेळ आणि राज्यात लोकशाही मजबूत करण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि द्रमुकने आपल्या कार्यकाळाचे आत्मपरीक्षण करावे,” असे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “हे दोन पक्ष भ्रष्टाचारावर बोलतात, तेव्हा मोठे आश्चर्य वाटते. कारण, त्यांच्याच कार्यकाळामध्ये ‘टू-जी’सारखा मोठा घोटाळा झाला होता. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी या दोन्ही पक्षांनी आपापल्या कुटुंबाने किती आणि कसे घोटाळे, भ्रष्टाचार केले याची माहिती घ्यावी,” असा टोलाही शाह यांनी यावेळी लगाविला.
 
 
अर्थात, तामिळनाडूच्या राजकारणाचा पोत दक्षिणेतील अन्य राज्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. मारुथून गोपालन रामचंद्रन अर्थात एमजीआर, जयलललिता आणि एम. करुणानिधी या तिघा नेत्यांनी तामिळनाडूमध्ये दीर्घकाळ राज्य केले आहे. तामिळनाडूमध्ये सिनेकलावंतांना मिळणारा पाठिंबा हा देशातील कोणत्याही राज्यापेक्षा अतिशय वेगळा आहे. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये या तिघा नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकने एकहाती जनाधार कमाविला आहे. त्यापैकी एमजीआर निर्वतल्यानंतर जयललिता यांनी अण्णाद्रमुकची सूत्रे हाती घेतली आणि करुणानिधींच्या द्रमुकला टक्कर दिली. मोठा करिष्मा असलेल्या या दोघा नेत्यांचे वैरही संपूर्ण देशाने पाहिले आहे. मात्र, आता जयललिता आणि करुणानिधी हे दोघेही हयात नाहीत. सध्या जरी अण्णाद्रमुक सत्तेत असला, तरी द्रमुकचे आव्हान करुणानिधींचे पुत्र एम. के. स्टालिन यांनी जीवंत ठेवले आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये खरा सामना या दोन पक्षांमध्येच होणार आहे. मात्र, जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भाजपला खुणावत आहे.
 
 
त्यासाठी भाजपने अण्णाद्रमुकसोबतच करुणानिधींचे ज्येष्ठ पुत्र एम. के. अळगिरी यांना सोबत घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. द्रमुकचे सर्वेसर्वे एम. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र एम. के. स्टालिन यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. मात्र, स्टालिन यांचे त्यांचे मोठे भाऊ असलेल्या एम. के. अळगिरी यांच्याशी अजिबात सख्य नाही. अळगिरी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगून स्टालिन यांनी त्यांची पक्षातून २०१४ साली हकालपट्टी केली होती. मात्र, आता अळगिरी हे स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या निकटवर्तीयांसोबत चर्चा केली असून, नवा पक्ष स्थापन करून स्टालिन यांना आव्हान उभे करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. अळगिरी यांनी नवा पक्ष स्थापन केल्यास त्यांना आपल्यासोबत घेण्यास भाजप उत्सुक आहे. अळगिरी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास पुढील वर्षी मे महिन्यात होणार्‍या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपला लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, पंतप्रधान मोदींचा करिष्मा असला तरीही भाजपला तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे, यात कोणतीही शंका नाही.
 
 
अर्थात, भाजपने तामिळनाडूमध्ये आपले पक्षसंघटन मजबूत करण्यासाठीही पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दक्षिणेतील दैवत मुरुगन यांच्या मंदिरांपर्यंत ‘वेत्रीवेल’ रथयात्रांना प्रारंभ केला आहे. त्याची जबाबदारी तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्यावर टाकली आहे. सुमारे महिनाभर चालणार्‍या या यात्रांसाठी एल. मुरुगन हे जीवतोड प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, तामिळनाडू सरकारने या रथयात्रेला परवानगी नाकारली आहे, कारण रथयात्रा आणि भाजपचे यश हे समीकरण पाहता, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास अण्णाद्रमुक तयार नाही. मात्र, तरीदेखील भाजपने रथयात्रा सुरू ठेवली आहे.
 
 
भाजपच्या या रथयात्रेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात तरंग उठण्यास सुरुवात झाली आहे. कारण, भगवान मुरुगन यांच्या सहा अधिष्ठानांच्या यात्रेला मोठे धार्मिक महत्त्व आहे. राज्यातील ओबीसी आणि दलित समुदायामध्ये भगवान मुरुगन यांच्याप्रति प्रगाढ श्रद्धा आहे. खास द्राविडी राजकारणाच्या दृष्टीनेही भगवान मुरुगन यांचे मोठे महत्त्व आहे. कारण, द्रमुकच्या करुणानिधींनी १९८२ साली मदुराई ते थिरुचेंदुर अशी मोठी यात्रा तत्कालीन मुख्यमंत्री एमजीआर यांच्या कार्यकाळात काढली होती. थिरुचेंदुर मंदिरातील एका अधिकार्‍याच्या संशयास्पद मृत्यूची आणि भगवान मुरुगन यांचे शस्त्र असलेल्या भाल्यामधील हिरा गायब झाल्याची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली होती. त्याचा मोठा परिणाम राज्याच्या राजकारणामध्ये झाला होता.
 
 
रथयात्रा हा भाजपच्या आजवरच्या राजकारणातील एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्येही रथयात्रेच्या माध्यमातून आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. कारण, २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी ५.५६ टक्के होती, ती २०१९ साली ३.६६ टक्क्यांवर घसरली. त्याचप्रमाणे २०१६ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १३४ जागा लढविल्या असल्या, तरी मतांची टक्केवारी केवळ २.८ टक्के होती. त्यामुळे दक्षिणेमध्ये द्राविडी राजकारणाला शह देण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे; अर्थात द्राविडी राजकारणाला हिंदुत्वाद्वारे शह देण्याचा प्रयत्न हा अगदीच सोपा नसला तरी अशक्यही अजिबात नाही.
 
 
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर रोजी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकही ते लढविणार आहेत. तामिळनाडूमध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्यानंतर केवळ रजनीकांत यांनाच अफाट लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या घोषणेमुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक, विरोधी पक्ष द्रमुक आणि भाजपलाही आपली रणनिती आता नव्याने आखावी लागणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@