योगीविरोधी ‘रोगी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2020
Total Views |

Yogi Adityanath_1 &n
 
 
आपल्या मालकांना खूश करण्यासाठी त्यांच्या चाटुकारांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍याला विरोध केला. विरोध करणार्‍या राजकीय पक्षांत हे होतच असते, कारण त्याशिवाय पक्षप्रमुखांची अशा बिनडोकांवर कृपादृष्टी पडत नसते. मात्र, योगी मुंबईत आल्याने रस्त्यावर उतरलेल्या विद्या चव्हाण या, त्यांच्यावर “बलात्कार्‍यांना संरक्षण देणारा,” असा आरोप करतात, तेव्हा प्रश्न निर्माण होतात.
 
 
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ‘फिल्मसिटी’ उभारण्याची घोषणा केली आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या कर्त्याधर्त्यांच्या पोटात गोळा उठला. योगी आदित्यनाथ यांच्या ‘फिल्मसिटी’ निर्मिती योजनेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने हल्लागुल्ला केला आणि मुंबईतून बॉलिवूडला नेऊनच दाखवा, असा बेटकुळ्या फुगवत आव्हान देण्याचा आवही आणला. योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनंतर “आम्ही इथून कोणालाही कोणताही उद्योग बाहेर नेऊ देणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तर “मुंबईतून ‘फिल्मसिटी’चे स्थलांतर शक्य नाही.
 
 
पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही ‘फिल्मसिटी’ आहे, योगी आदित्यनाथ यांनी तिकडेही जावे,” असा फुकटचा सल्ला संजय राऊत यांनी दिला. “मुंबई आणि बॉलिवूडचे नाते दुधात विरघळलेल्या साखरेसारखे आहे, बॉलिवूडला कोणीही वेगळे करू शकत नाही,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या, तर विद्या चव्हाण यांनी, “बलात्कार्‍यांचा पाठीराखा” म्हणत योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍यावेळी आंदोलनाची स्टंटबाजीही करून दाखविली. काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी तर अकलेचे तारे तोडत, “योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा डाव असून ते यासाठी उद्योजक-निर्मांत्यांना धमक्या देऊ शकतात,” असा बिनबुडाचा आरोप केला.
 
 
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबईचा दौरा केला आणि आपल्यावर टीका करणार्‍या सर्वच विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. उत्तर प्रदेशात ‘फिल्मसिटी’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे खवळलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, नेत्या विद्या चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आदी सर्वांनाच योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले, तसेच या नेत्यांची बौद्धिक क्षमता, वैचारिक पातळी किती खुजी आहे, हेही आपल्या वक्तव्यांतून, वर्तनातून सांगितले. ‘फिल्मसिटी’वरून तमाशा करणार्‍यांना योगी आदित्यनाथ यांनी, “कोणीही काळजी करण्याचे कारण नाही.
 
 
कारण, मी महाराष्ट्रातून काहीही न्यायला आलेलो नाही, तर उत्तर प्रदेशात नव्या ‘फिल्म सिटी’च्या निर्मितीसाठी आलो आहे. उत्तर प्रदेशातील ‘फिल्मसिटी’ तिथल्या मागणी आणि गरजांनुसार उभारली जात असून, मुंबईतली ‘फिल्म सिटी’ आपल्या गरजांनुसार काम करेल,” असे स्पष्ट केले. एकूणच योगी आदित्यनाथ यांच्या विधानांतून विवेकाचा वापर करून, इतरांचे काहीही न हडपता स्व-राज्याचा विकास करण्यासाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री दिसतो, तर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या वक्तव्यांतून केवळ राग, द्वेष आणि संताप दिसून येतो. तो अर्थातच मुंबई किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी नसून, स्वतःचे अर्थपूर्ण संबंध जपण्यासाठीच. कारण जनतेचे हित साधण्याची या पक्ष-नेत्यांची नियत असती, तर ती गेल्या वर्षभराच्या काळात पाहायला मिळाली असती. पण, तसे झाले नाही.
 
 
इकडे योगी आदित्यनाथ यांचे चित्रपटनिर्मिती करणे किंवा दिग्दर्शित करणे, हे काही मुख्य काम नाही, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. पण, राज्य चालविणार्‍या व्यक्तीला साहित्य, कला, संस्कृती, मनोरंजन आदी विविध विषय वेळोवेळी हाताळावे लागत असतात. कारण, त्यांचा सर्वसामान्यांशी थेट संबंध येत असतो व योगी आदित्यनाथ असो किंवा त्यांचे सहकारी, ही सामान्यांतून निवडून आलेली माणसे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्याही राज्यात ‘फिल्मसिटी’साठी प्रयत्न केले, त्यासाठी मुंबईसारख्या चित्रपटनिर्मितीचा आद्य व प्रदीर्घ वारसा असणार्‍या शहरातील व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या, तर त्यात आक्षेपार्ह काहीही नाही.
 
 
परंतु, आपल्या वरच्या मालकांना खूश करण्यासाठी त्यांच्या चाटुकारांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍याला विरोध केला. ते अर्थातच विरोध करणार्‍या राजकीय पक्षांत होतच असते, कारण त्याशिवाय पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष वगैरेंची अशा बिनडोक लोकांवर कृपादृष्टी पडत नसते. मात्र, योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने रस्त्यावर उतरलेल्या विद्या चव्हाण त्यांच्यावर “बलात्कार्‍यांना संरक्षण देणारा,” असा आरोप करतात तेव्हा प्रश्न निर्माण होतात. कारण, महाराष्ट्रात काय सुरू आहे, हे विद्या चव्हाण यांना माहिती नाही का?
 
 
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचार आणि बलात्काराची आकडेवारीनिशी माहिती दिलेली आहे. राज्यात गेल्या वर्षभरात दिवसाढवळ्या वा रात्री-अपरात्रीच नव्हे तर कोरोना काळात थेट ‘कोविड केअर सेंटर’मध्ये बलात्काराच्या कित्येक घटना घडल्या. पण, राज्यात महिलांवर बलात्काराच्या घटना घडत असताना आज योगी आदित्यनाथ यांच्या विरोधासाठी बाहेर पडलेल्या विद्या चव्हाण कुठल्या बिळात लपून बसल्या होत्या, याची कोणालाही कल्पना नाही. असे का, कारण हे लोक कोणत्याही विचारसरणीच्या पलीकडचे असून अव्वल दर्जाचे मूर्ख आहेत, त्यांना आपण काय करतो, काय बरळतो, कशासाठी, हेही समजत नसते.
 
 
चालू वर्तमानापेक्षा थोडे मागे गेल्यास नरेंद्र मोदींच्या बाबतीतही या लोकांनी असाच प्रकार केला होता. मात्र, मोदींना रोखण्यासाठी, त्यांच्या बदनामीसाठी तर्‍हेतर्‍हेचे उद्योग करणार्‍यांची बिरबलाची खिचडी कधी शिजलीच नाही. उलट नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून सलग दोन वेळा पूर्ण बहुमताने देशाचे पंतप्रधान झाले. २०१७ साली योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी आले, तर तेव्हापासून त्यांच्या विरोधकांनी आरडाओरडा सुरू केला. आता योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट उपसताहेत, तर त्याविरोधातही ही मंडळी बडबडताना दिसतात. उत्तर प्रदेशातील ‘फिल्म सिटी’ निर्मितीची घोषणा व योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍यातून योगीविरोधी रोग्यांकडून तेच होत असल्याचे पाहायला मिळाले. पण, मोदींच्या बाबतीत जे घडले तसेच काही रोमहर्षक पुढच्या काळात योगी आदित्यनाथ यांच्याही बाबतीत घडले, तर आश्चर्याचा धक्का बसणार नाही, असे वाटते.




@@AUTHORINFO_V1@@