कसे होते कल्याण डोंबिवलीकरांचे वर्ष २०२०?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2020
Total Views |
KDMC _1  H x W:
 
 

कोरोनाची काळरात्र, कुठे दुःखाचा डोंगर तर गुढीपाडव्याला सुन्न फडके रोड

 
 
डोंबिवली (जान्हवी मोर्ये) : कल्याण-डोंबिवलीकरांनी २०२० चे आगमन मोठ्या धुमधडाक्यात केले होते. मार्च महिन्यात महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हे वर्ष सर्वासाठीच एक काळरात्रीसारखे ठरले. अनेकांनी आपली जीवाभावांची माणसे गमावली. कोरोनाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाल्याचे दिसून आला. अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला, तर हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. सामाजिक संस्थापासून राजकीय नेत्यांनी मदतीचा हात पुढे केले.
 
 
 
कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शंभर कोटींचा खर्च केला. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच आरोग्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असेल. कल्याण डोंबिवली हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाशी दोन हात करत असताना अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभे केले. कोरोनामुळे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर, परिवहन सदस्य नाना यशवंतराव व दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला.
 
 
तसेच केडीएमटीचे वाहक, चालक, सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश होता. राज्यात शिवसेना-भाजपा युती तुटल्याने भाजपाच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी पदाचा राजीनामा दिला. महापालिकेत भाजपाने विरोधी बाकांवर बसून शिवसेनेला लक्ष्य केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे या निवडणूका होऊ शकल्या नाहीत. नोव्हेंबरमध्ये सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने कल्याण-डोंबिवलीकरांना प्रशासकीय राजवट अनुभवण्याची संधी मिळाली.
 
 
कोरोनामुळे अनेक विकासकामे रखडली. विकासकामांना वेग यावा यासाठी माजी आमदार रविंद्र चव्हाण यांनी आंदोलन केले. त्यानंतर अनेक विकासकामाच्या शुभारंभाचा नारळ फुटला. आरोग्यावर प्रथम मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आल्याने इतर विकासकामांवर हात आखडता घ्यावा लागला. निवडणूका डोळयासमोर ठेवून स्थायी समितीने कर व पाणी दरवाढ फेटाळली.
 
 
कल्याण डोंबिवली महापालिकेला नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी लाभले. महापालिकेच्या कर्मचा:यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. याचा लाभ पालिकेच्या साडेसहा हजार कोविड योद्ध्यांना घेता आला. कचरा वर्गीकरण यशस्वी करन डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कचरावेचकांवर उपासमारीची वेळ आली. तर दुसरीकडे महापालिकेने सुक्या कचऱ्यातून बचतगटच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
 

dombivali _3  H 
 
 
 
क्रिडा सराव बंद
 
 
कोरोनामुळे क्रीडा स्पर्धेवर निर्बंध आले. जिल्हा पासून राज्यस्तरीय स्पर्धेंना खेळाडूंना मुकावे लागले. खेळाडूंचा सराव ऑनलाईन झाला. अनेक क्रीडा संस्थांना ऑनलाईनच्या माध्यमातून स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. क्रीडा क्षेत्रतील दिग्गज खेळाडूंशी संवाद साधता आला. त्यांच्या यशाचे गमक समजून घेता आले. खेळाडूंनी फिटनेसकडे अधिक महत्त्व दिले.क्रिकेट, फुटबॉल, स्विमिंग, व्हॉलीबॉल यासारखे खेळ खेळाडूंना खेळता आले नाही. स्पोर्ट्स के अर फाऊंडेशन, संतोष स्पोर्ट्स अकादमी आणि एम.जे. स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ क्रीडा महोत्सव संपन्न झाला. त्यात विविध प्रकारच्या खेळात १२९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुभेदारवाडा कट्टा, कडोंमपा आणि क्रीडा शिक्षकांतर्फे सुभाष मैदानात सांघिक सूर्यनमस्कार कार्यक्रम पार पडला. त्यात दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
 

dombivali _2  H 
 
शाळा झाल्या ऑनलाईन!
 
 
कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळा ऑनलाईन झाल्या. मोबाईल, संगणक, इंटरनेट या समस्येमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी दूरदर्शनवर शिक्षण सुरू झाले. महापालिका आणि खाजगी शाळेतील शिक्षकांना कोरोना सव्रेक्षणाचे काम लावण्यात आले होते. कोरोनामुळे परिक्षा ही ऑनलाईन झाल्या. ऑनलाईन परिक्षामुळे मार्क्‍स वाढले. शाळेमध्ये विद्यार्थी विविध विषयांच्या परिक्षा देत असतात पण त्या परिक्षेला बसण्याचा कल कमी झाला. कलाशिक्षक अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून कलेचे धडे दिले.
 

gudhipadawa_1   
 
 (संग्रहित छायाचित्र - शोभा यात्रा 2019)
 
सण समारंभांना बसला फटका
 
 
कोरोनाचा परिणाम सण-समारंभाना बसला. यंदा प्रथमच गुढीपाडव्याला निघणारी हिंदू नववर्षाची स्वागतयात्रेची परंपरा खंडित झाली. धार्मिक स्थळे बंद असल्याने नागरिकांनी सर्व सण घरातच साजरे केले. दरवर्षी दहीहंडीला उंच थर लागत असे. पण यंदा ते दिसून आले नाही. गणोशोत्सव ही साधेपणाने साजरा करण्यात आला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर संचारबंदी कलम लावल्याने तरूणाईची गर्दी दिसून आली नाही. आजवरच्या इतिहासात प्रथमच दिवाळी पहाटची परंपरा खंडित झाली. चित्रपटगृहे, नाटयगृहे नऊ महिने बंद होती. त्यामुळे कलाकारासह, कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.
@@AUTHORINFO_V1@@