जीए सिंधू देश; आमेन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2020   
Total Views |

SRA_1  H x W: 0
 
 
 
 
पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत. नुकतेच पाकिस्तानच्या आर्थिक राजधानी कराचीमध्ये एका कारच्या शोरूमध्ये चिनी नागरिकांवर आणि त्याच्या साथीदारावर हल्ला झाला. मात्र, ते थोडक्यात बचावले, तर कराचीमध्येच चिनी नागरिकाच्या गाडीला बॉम्बने स्फोट करून उडविण्यात आले. सातत्याने चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत.
 
 
 
एकूणच पाकिस्तानमध्ये चिनी नागरिक आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले का होत असतील? आता कुणाला वाटेल की चीनमध्ये उघूर मुस्लिमांवर अत्याचार केले जातात किंवा पाकिस्तानमध्ये असलेल्या चिनी कंपन्यांनी कंपनीमध्ये नमाज पढण्यास बंदी घातली म्हणून इथल्या चिनी नागरिकांवर हल्ले होत असावेत.
पण, तसे नाही.
 
 
 
चिनी नागरिकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मी’ या संघटनेने घेतली आहे. या संघटनेने नुकतेच एक निवेदन जाहीर केले. या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान आणि चीन आर्थिक भौतिक प्रगतीच्या नावाखाली पाकिस्तानातील सिंधी लोकांच्या जमिनी बळकावत आहेत. पाकिस्तान आणि चीन हे दोघे सिंध प्रांतातील साधन संपत्तीचे जबरीने शोषण करतात. या शोषण केलेल्या साधन संपत्तीचा उपयोग सिंध किंवा बलुचिस्तानसाठी न करता केवळ पाकिस्तानातील पंजाब प्रांतासाठी केला जातो.
 
 
 
त्यामुळे ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’अंतर्गत असलेल्या प्रत्येक गोष्टीला आमचा विरोध आहे. ‘सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मी’ या संघटनेला पाकिस्तानमध्ये फुटीरतावादी म्हणून घोषित केले आहेे. कारण, या संघटनेचा जन्मच झाला तो वेगळा सिंधू देश स्थापन व्हावा यासाठी. हे जगजाहीर आहे की, भारताची फाळणी होण्यापूर्वी सिंध आणि बलुचिस्तानातून कधीही वेगळ्या पाकिस्तानची मागणी झाली नव्हती. त्यांना भारतातच राहायचे होते. पुढे १९७१ साली पाकिस्तानची फाळणी होऊन वेगळी भाषा वेगळ्या संस्कृतीच्या नावावर बांगलादेश निर्माण झाला.
 
 
 
 
बांगलादेशाच्या निर्मितीनंतर १९७२ सालापासून बांगलादेशसारखीच सिंधु देशची मागणी पाकिस्तानमध्ये जोर धरू लागली. ‘जीए सिंध तेहरीक’चे नेते जी. एम. सय्यद यांनी १९७२ साली पाकिस्तानपासून स्वतंत्र सिंधु देशाची मागणी केली. सिंधु संस्कृती पाकिस्तानपेक्षा हजारो वर्षे जुनी आहे. सिंधू भाषा संस्कृती ही पाकिस्तानी उर्दू-अरबी संस्कृती आणि भाषेपेक्षा वेगळी आहे. हजारो वर्षांपासून सिंधु घाटीवर परकीय आक्रमणकारांनी हल्ला केला. मात्र, तरीही सिंधू संस्कृती टिकून आहे.
 
 
 
तिचे अस्तित्व राखण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी सिंधू देश निर्माण करण्याचे स्वप्न सिंधी समाजात रुजले. त्या मागणीसाठी पाकिस्तानामध्ये अनेक संघटना तयार झाल्या. जसे ‘सिंधू देश लिबरेशन आर्मी’, ‘जीए सिंध कौमी महज’, ‘जीए सिंध मुताहिदा महज’, ‘जीए सिंध स्टुड्ंस फेडरेशन’, ‘सिंध नॅशनल मूव्हमेंट पार्टी’ आणि ‘सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मी’ होय. पाकिस्तानमध्ये या सर्व संघटनांच्या नेत्यांवर तर सोडाच; पण निष्क्रिय सदस्यांवरही अत्याचार होतात, त्यांचे खून होतात. त्यांना गायब केले जाते. आंतरराष्ट्रीय मानव हक्क संघटनेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
 
 
 
 
असो, ‘सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मी’ने वेगळ्या सिंधू देशनिर्मितीसाठी सशस्त्र लढा पुकारला आहे. पण, आपल्या इकडल्या दहशतवादी किंवा नक्षलींसारखे ते अविचारी नाहीत. ते म्हणतात की, “पाकिस्तानमध्ये सिंधिस्तानही आहे. इतिहास साक्षी आहे की, घोरी आणि गजनीच्या आक्रमणाने सिंधू घाटी घायाळ झाली होती. चिनी-मंगोलनेही सिंधू खोरे रक्तबंबाळ केले होते. मात्र, पाकिस्तान हे विसरून क्षेपणास्त्रांना गजनी आणि घोरीचे नाव देत आहे. हे दोघेही पाकिस्तानी नाहीत. नुकतेच इमरान खानने भारताने ‘३७० कलम’ हटविल्याच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये रॅलीचे आवाहन केले होते.
 
 
 
 
त्यावेळी या रॅलीवर बॉम्ब हल्ला झाला आणि रॅलीत पळापळ झाली. इमरान खानचा ‘३७० कलम’ हटविण्याला विरोध करण्याचा उद्देश असफल झाला. त्यावेळी या हल्ल्याची जबाबदारी ‘सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मी’ने घेतली. या सगळ्या कारवायांमुळे पाकिस्तान त्रस्त आहे. मात्र, ‘सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मी’चे म्हणणे आहे की, वेगळा सिंधू देश होणारच. जीए सिंधू देश; आमेन!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@