'राऊत परिवार' चौकशीपासून का पळतंय ?; भाजपचा सवाल

    29-Dec-2020
Total Views |

kirit somaiya_1 &nbs


मुंबई :
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्यापासून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखीच जोर चढला आहे. राऊत कुटुंबातील आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

'एचडीआयएलनं पीएमसी बँकेचे ५४०० कोटी हडपले आहेत. एचडीआयएलचे प्रवीण राऊत यांच्या कुटुंबाशी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. याच प्रवीण राऊत यांचे संजय राऊत यांच्या कुटुंबाशी खास संबंध आणि आर्थिक व्यवहार आहेत. संजय राऊत व प्रवीण राऊत यांच्या कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. हा पैसा कुठून आला? एचडीआयएलच्या माध्यमातून पीएमसी बँकेचा पैसा कुठून कुठे गेला? एचडीआयएल आणि त्यांच्या समूहातील कंपन्यांकडून दोन्ही राऊत कुटुंबांना किती रक्कम मिळाली?, याची चौकशी व्हायलाच हवी,' अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून त्यांनी ही मागणी केली आहे.





मनी ट्रेल, कॅश ट्रेल'चा तपास व्हायला हवा
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी रुपये चोरले असून, एचडीआयएल आणि प्रवीण राऊत कुटुंबात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोन कुटुंबातही कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या दोन्ही परिवाराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून, हा पैसा कुठून आला? आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.