तर्राट चालकांविरोधात कारवाईसाठी पोलिसांचा महत्वाचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2020
Total Views |

Thane _1  H x W


‘थर्टी फर्स्ट’ सज्जता ३१ डिसेंबरला उड्डाणपूल बंद


ठाणे : ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनच्या नावाखाली नववर्षाचे स्वागत करताना सामिष पार्ट्यांसह मद्याची नशाही केली जाते. तेव्हा, ठाणे पोलिसांची सज्जता चोख असली, तरी ३१ डिसेंबरला पोलिसांच्या नाकेबंदीचा ससेमिरा टाळण्यासाठी तर्राट चालक सर्रास उड्डाणपुलांवरून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात अपघात घडू शकतात.
 
 
हे टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील उड्डाणपुलावरील वाहतूक ३१ डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नितीन कंपनी, घोडबंदर रोड भागातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शहरातील वाहतूककोंडीवर होण्याची शक्यता आहे. तसेच, महामार्गालगत असलेले ढाबे, पब, रिसॉर्टवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्यासोबतच येऊर, उपवन, कोलशेत खाडी, तलावपाळी आणि संकुलाच्या आवारात नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ‘संचारबंदी’ लागू केली असून हॉटेल, रेस्टॉरंट, पब रात्रीच्या वेळेत बंद असणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस उपायुक्त, १७ साहाय्यक पोलीस आयुक्त, १२८ पोलीस निरीक्षक, १५० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, चार हजार ४५० पोलीस अंमलदार यांच्यासह तीन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दोन दंगल नियंत्रण पथके तसेच ३०० गृहरक्षक असा पाच हजारहून अधिक फौजफाटा तैनात असणार आहे.
 
 
तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ३१ डिसेंबरच्या दिवशी ही तपासणी अधिक तीव्र होणार आहे. ठाणे शहरातून जाणारे अनेक उड्डाणपूल आहेत. ज्यामुळे पोलिसांची नाकाबंदी तोडून थेट उड्डाणपुलावाटे कुठेही जाता येऊ शकते. काही दिवसांपूर्वीच एका वाहनचालकाने अशाचप्रकारे नाकाबंदीत पोलिसांना गुंगारा देत पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. या वाहनचालकाने दोन दुचाकीस्वारांनाही धडक दिली होती. हे प्रकार टाळण्यासाठी आता शहरातील उड्डाणपुलांवरील वाहतूक ३१ डिसेंबरला बंद करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. रात्री या वेळेत हे उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
 
मद्यपी चालकासोबत सहप्रवाशावरही कारवाई
 
मद्य प्राशन करून वाहन चालविणार्‍यांबरोबरच आता सहप्रवाशांवरही कारवाई होणार आहे. मोटार वाहन कायद्याच्या ‘कलम १८८’ मधील मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते, या कलमाचा आधार ठाणे पोलीस यंदा घेणार आहेत. मद्यपी चालकांना दोन हजार दंड आणि सहा महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास हाच दंड तीन हजार आणि दोन वर्षे कारावास असा आहे.
 
 
रिक्षा, टॅक्सी व इतर सार्वजनिक वाहनातील कारवाई पोलीस उपनिरीक्षकाच्या पडताळणी अहवालानुसार करण्याचे निर्देश असतील, अशी माहिती वाहतूक उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास वाहनचालकांच्या कुटुंबीयांना फोन करून माहिती देण्याचा विचार पोलीस करत आहेत. विशेषत: तरुण वाहनचालकाच्या विरोधात अशी कारवाई प्राधान्याने केली जाणार असून, प्रसंगी त्याच्या कुटुंबीयांना बोलावून वाहनचालकाला त्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
 
‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेतही ई-चलन वसुली
वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांविरोधात बजावलेल्या ‘ई-चलन’च्या दंडवसुलीसाठी ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत दोन कोटी ९३ लाखांची वसुली केली आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात असून, तिथल्या तपासणीत वाहनचालकांकडून थकित दंड वसूल केला जाणार आहे. १४ फेब्रुवारी, २०१९ पासून १८ वाहतूक उपविभागामार्फत ई-चलन प्रक्रिया पोलीस राबवत असून आजवर सुमारे २६ कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@