झोपेचे सोंग की जाग आली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |

ICC_1  H x W: 0





भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने शतकी खेळी साकारल्याने भारत विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर टिकून राहणे हीच अशक्यप्राय गोष्ट मानली जाते, अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजांनी शतकी खेळी करणे म्हणजे मोठे कर्तब करण्यासारखेच आहे. रहाणेला शतकानंतरही मोठी धावसंख्या उभी करता आली असती. मात्र, पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे रहाणेला बाद ठरविण्यात आले आणि भारतीय कर्णधार मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. रहाणेला बाद करणे हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसाठी या सामन्यात कठीणच मानले जात होते. मात्र, दुर्दैवाने रहाणे धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, तो धावबाद होता का? हा या सामन्यादरम्यान निर्माण झालेला महत्त्वाचा आणि अनुत्तरीत प्रश्न. धावबाद होण्याच्या नियमांनुसार फलंदाजाची बॅट ही क्रीजच्या आत असणे बंधनकारक आहे. बॅट क्रीजवरील रेषेवर असल्यासही फलंदाजांना बाद ठरविण्यात येते. रहाणेची बॅट ही क्रीजवर असल्यामुळे त्याला बाद ठरविण्यात आले. मात्र, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम पेन हासुद्धा पहिल्या डावादरम्यान रहाणेप्रमाणेच बॅट क्रीजवर असताना धावबाद झाला होता. परंतु, तिसर्‍या पंचांनी त्याला नाबाद ठरवत ऑस्ट्रेलियाला दिलासा दिला. त्या तुलनेत भारताचा कर्णधार रहाणेला मात्र सारखीच परिस्थिती असताना बाद ठरविल्याने ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यादरम्यान एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऑस्ट्रेलियात पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही काही पहिली वेळ नाही. अनेकदा प्रतिस्पर्धी संघांनी समान न्याय मिळत नसल्याची तक्रार करत ऑस्ट्रेलिया दौैरा मध्येच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचीही वेळ ओढवली होती. ‘आयसीसी’ने मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला होता. मात्र, आणखी किती वर्षे असे चालणार याचा विचार करण्याची खरी वेळ आल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. योग्य वेळी ‘आयसीसी’ने कारवाई न केल्यास भविष्यात एखाद्या देशाच्या संघाकडून वेगळा आणि टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 


अब आया उंट पहाड के नीचे...

 
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांदरम्यान सध्या सुरू असलेल्या ‘बॉर्डर-गावस्कर’ कसोटी क्रिकेट करंडक मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाचे पारडे सध्या कमालीचे जड आहे. भारतीय संघ हा सध्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाच्या छायेत आहे. याआधीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारणार्‍या भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही अशी कामगिरी केली की, गेल्या सामन्यात विजयाचा जल्लोष करणार्‍या प्रतिस्पर्धी संघालाच यावेळी पराभवाच्या छायेत ढकलले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ‘टीम इंडिया’चा दारुण पराभव होईल, अशा वल्गना ऑस्ट्रेलिया संघातील आजी-माजी खेळाडूंकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यात यश मिळविले आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणार्‍या भारतीय संघाचा पहिल्या सामन्यापेक्षा लाजीरवाणा पराभव होईल, असा कयास काही आजी-माजी क्रिकेटपटूंकडून बांधण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात नेमके झाले उलटेच. ऑस्ट्रेलियाचाच संघ सध्या पराभवाच्या छायेत असून भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याच्या तयारीत आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही भारताने उत्कृष्ट कामगिरी करत आस्ट्रेलियाला नमविण्याची जय्यत तयारी केली आहे. हा बदल भारताने कसा घडवला, याचाही विचार करणे गरजेचे आहे. भारतीय संघाने सलामी फलंदाजांच्या जोडीत बदल करत सर्वात आधी आपला आत्मविश्वास बळकट केला, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. भारताने पृथ्वी शॉच्या जागी नवख्या शुभमन गिलला संधी दिली. गिलने ४५ धावा काढत निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला. विश्वासू फलंदाज मयांक अग्रवाल लवकर बाद झाला, तरी गिलने अनुभवी फलंदाज पुजारासोबत डाव सावरला. रहाणेने कर्णधारपदाला साजेशी शतकी खेळी साकारल्याने भारताने चांगली धावसंख्या उभारताच प्रतिस्पर्ध्यांचे अवसान गळाले. स्वतःची धावसंख्या उंटाच्या उंचीसारखी समजणार्‍या ऑस्ट्रेलियापुढे भारताने धावांचा डोंगरच उभारला. ‘बलाढ्य संघ’ असे बिरूद मिरविणार्‍या ऑस्ट्रेलियापुढे भारताने आणखीन बळकट खेळी केली, म्हणूनच अखेर गुडघे टेकण्याची वेळ ऑस्ट्रेलियावर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाच्या छायेत ढकलणार्‍या भारतीय संघाचे कौतुक करावे तितके कमीच म्हटले तर वावगे ठरणार नाही.

- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@