ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |

M.G.Gokhale _1  
 



ठाणे : ठाणे भारत सहकारी बँकेचे संस्थापक संचालक, उपाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष माधव यशवंत गोखले (मा. य. गोखले) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ज्युपिटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षांचे होते. ठाणे भारत सहकारी बँकेत गेली २२ वर्षे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
 
 
 
कर्नाटकातील मु. कुंदगोळ, ता. धारवड येथून सुमारे १९५४- ५५ च्या सुमारास गोखले ठाण्यात आले. काही वर्षे भारत सरकारच्या ऑडिटर जनरल या कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. ठाण्यामध्ये बांधकाम व्यवसायात पदार्पण करून काही वर्षातच ते कुशल बांधकाम व्यवसायिक म्हणून नावारूपास आले. त्यांनी ठाणे, डोंबिवली आणि पुणे याठिकाणी इमारतीचे बांधकाम केले. वयाच्या साठीनंतर त्यांनी विधी शाखेचे शिक्षण घेऊन त्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे गेली अनेक वर्षे संचालक सदस्य, तसेच गेली १८ वर्षे सुरु असलेल्या श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे संस्थापक अध्यक्ष होते. न्यासातर्फे गुढीपाडव्या निमित्त गेली १८ वर्षे स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते.
 
 
ठाण्यामध्ये सन २०१० साली मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख सल्लागार आणि मराठी ग्रंथ संग्रहालयाचे काही वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रशिक्षित योग शिक्षक असलेल्या गोखले यांनी हॉलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर या देशात अभ्यासविषयक परिषदांमध्ये सहभाग घेऊन विविध देशांचे दौरेही केले होते. त्याचबरोबर ब्राम्हण सेवा संघ, सध्दर्म प्रतिष्ठान, चित्तपावन ब्राम्हण मंडळ ठाणे आदी संस्थांचे ते विश्वस्त होते.
 
 
बँकिंग, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्द्दल ठाणे महापालिकेने त्यांना 'ठाणे भूषण' पुरस्काराने सन्मानित केले होते. 'गोखले यांच्या निधनामुळे मोठी हानी झाली.', अशा शब्दात पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
खऱ्या अर्थाने ठाण्याचे `माय गोखले'
 
 
ठाणे शहरातील बँकिंग, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य वर्तुळातील एक आदरार्थी नाव म्हणजे मा. य. गोखले. ते खऱ्या अर्थाने ठाण्याचे माय गोखले होते. मा. य. गोखले यांच्याविषयी ठाणेकरांना आपुलकी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे भारत सहकारी बॅंकेने नेहमीच सचोटीने व्यवसाय करून बॅंकिंग क्षेत्रात मानाचे स्थान पटकावले आहे. ठाण्यात झालेले ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. माय गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
- निरंजन वसंत डावखरे, आमदार व भाजप,जिल्हाध्यक्ष,
 
 
चतुरस्त्र व्यक्तिमत्व हरपले - पालकमंत्री
 
मा. य. गोखले यांच्या निधनाने ठाण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विश्वातील एक अग्रणी व चतुरस्त्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं.ठाण्याच्या शैक्षणिक तसेच, सांस्कृतिक विश्वात त्यांचं योगदान मोठं होतं.ठाण्याच्या सर्वांगीण विकासाशी आपल्या कर्तृत्वाने नाळ जोडलेले मा. य. गोखले यांच्या निधनाने ठाण्याची व ठाणेकरांची अपरिमित हानी झाली.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा



@@AUTHORINFO_V1@@