‘हरे कृष्ण हरे हरे, बीजेपी घरे घरे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020   
Total Views |
Suvendru Adhikari _1 
 
 
 
 
अधिकारी यांच्या समर्थकांनी एक नवीन घोषणा लोकप्रिय केली आहे. ती म्हणजे, ‘हरे कृष्ण हरे हरे, बीजेपी घरे घरे!’ चैतन्य महाप्रभू यांच्याबद्दल बंगालमध्ये अत्यंत आदर आहे. त्यांनी कृष्णभक्ती करण्यासाठी असंख्य अनुयायांना प्रवृत्त केले होते. “पंधराव्या शतकातील चैतन्य महाप्रभू या संताने सर्व जगास प्रेमाचा संदेश दिला. ते लक्षात घेऊन आम्ही ही घोषणा केली आहे,” असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
 
 
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षास मोठ्या प्रमाणात जे जनसमर्थन मिळत आहे, ते पाहून तृणमूल काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अस्वस्थ झाल्या आहेत. भाजपला मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेऊन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे; त्यांच्या हत्या करण्याचे प्रमाणही त्या राज्यात वाढले आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे.
 
 
तृणमूल काँग्रेसचे एक खंदे नेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ममता बॅनर्जी यांचा जळफळाट झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कांथी या आपल्या गावी जी सभा आयोजित केली होती, त्या सभेत जनता प्रचंड संख्येने सहभागी झाली होती. जनतेचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेता, आपण अत्यंत योग्य निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली आहे. ‘जोपर्यंत कमळ फुलणार नाही, तोपर्यंत आपण झोप घेणार नाही,’ असा निर्धार सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
 
 
प. बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला खडे चारायचेच, असा निर्धार भाजपने केला असून भाजप २०० जागा जिंकेल, असा विश्वास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले, ते लक्षात घेता ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून खाली खेचणे भारतीय जनता पक्षास अशक्य नाही. तृणमूल काँग्रेसचे विविध नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.
 
ममता बॅनर्जी यांच्या पक्षास जी गळती लागली आहे ती पाहून, पक्षामध्ये ममता बॅनर्जी या एकट्याच उरतील, अशी उपहासात्मक टीका केली जाऊ लागली आहे. ‘इस बार, दो सौ पार’ अशी घोषणा भाजपने दिली आहे आणि तेवढी संख्या गाठण्याच्या दिशेने भाजपचे प्रयत्नही सुरू आहेत. भाजपच्या सभांना प. बंगालमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुवेंदू अधिकारी यांचा प्रभाव असलेल्या भागामध्ये सभा, रोड शो आयोजित करून अधिकारी यांना प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केला जात आहे. “माझ्याविरुद्ध जेवढा प्रचार कराल तेवढा अधिक प्रतिसाद आपणास मिळेल,” असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
 
अधिकारी यांच्या समर्थकांनी एक नवीन घोषणा लोकप्रिय केली आहे. ती म्हणजे, ‘हरे कृष्ण हरे हरे, बीजेपी घरे घरे!’ चैतन्य महाप्रभू यांच्याबद्दल बंगालमध्ये अत्यंत आदर आहे. त्यांनी कृष्णभक्ती करण्यासाठी असंख्य अनुयायांना प्रवृत्त केले होते. “पंधराव्या शतकातील चैतन्य महाप्रभू या संताने सर्व जगास प्रेमाचा संदेश दिला. ते लक्षात घेऊन आम्ही ही घोषणा केली आहे,” असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे. “एकाच वेळी पुरुषोत्तम राम आणि चैतन्य महाप्रभू यांच्याविषयी आमच्या मनात आदरभाव असतो,” असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
 
 
प. बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांपैकी २०० जागा जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने जोरकस तयारी सुरू केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत ४२ जागांपैकी १८ जागा जिंकून तृणमूल काँग्रेसला जबर धक्का दिला होता. प. बंगालमध्ये मिळत असलेला पाठिंबा पाहता भाजपने विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांना, रोड शो यांना बंगालमधील जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे सर्व पाहून तृणमूल काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यातूनच तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक डावपेचांची आखणी करीत असलेले प्रशांत किशोर भलतेच चिडले असल्याचे दिसून आले.
 
 
निवडणुकीचे डावपेच आखण्यामध्ये आपली बरोबरी कोणीच करू शकत नसल्याचे प्रशांत किशोर यांना वाटत आले आहे. विविध ठिकाणी फिरून आता हे महाशय तृणमूल काँग्रेससाठी काम करीत आहेत. भाजपने, आम्ही २०० जागा जिंकणार, असे सांगितल्यावर प्रशांत किशोर यांनी भाजपला आव्हान देणारी भाषा वापरली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला दोन अंकी जागा मिळविता आल्यास खूप झाले, असे भविष्य त्यांनी वर्तविले आहे. भाजपने त्याहून अधिक जागा मिळविल्यास आपण आपला हा व्यवसाय सोडून देऊ, अशी जाहीर घोषणा त्यांनी केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीतच दोन अंकी संख्या पार केली आहे, हे या तृणमूल काँग्रेससाठी व्यूहरचना करणार्‍या प्रशांत किशोर यांना ठाऊक नाही काय? असे असताना विधानसभा निवडणुकीत भाजप दोन अंकी आकडाही गाठू शकणार नाही, हे कशाच्या आधारावर प्रशांत किशोर म्हणतात?
 
भाजपमध्ये प्रवेश केलेले सुवेंदू अधिकारी यांनी, भाजपचा एक शिस्तबद्ध सैनिक या नात्याने तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. “भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून देशासाठी समर्पित भावनेने कार्य करीत आहे. भाजप सत्तेवर येण्यासाठी आम्ही कार्य करू आणि बंगालचे ‘सोनार बांगला’मध्ये रूपांतर करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनीही ममतादीदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ममतादीदी या, सर्वांना ‘बाहेरचे’ म्हणून हिणवत असतात. पण, बंगालचे सुपुत्र असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेल्या विरोधामुळे बंगाल पाकिस्तानमध्ये गेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ममतादीदी या केवळ भाजप नेत्यांनाच ‘बाहेरचे’ असल्याचे म्हणत नाहीत. मागे त्यांनी भगवान श्रीराम यांचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे विधान केले होते, हेही लक्षात घ्यायला हवे.
 
विजयवर्गीय यांनी ममतादीदी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. ममतादीदी साधी पांढरी साडी नेसतात आणि चपला परिधान करतात. पण, अभिषेक बॅनर्जी २५ लाखांचा चष्मा वापरतात आणि सात कोटींच्या निवासस्थानी राहतात. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीच ही माहिती दिली असल्याची पुस्ती विजयवर्गीय यांनी जोडली आहे. एकूणच प. बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशा जवळ येतील, तसतसे या राज्यात भाजपचे तुफान मोठ्या वेगाने घोंगावण्याची चिन्हे दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे तारू आताच भरकटू लागले आहे. भाजपच्या प्रचंड लाटेच्या तडाख्यात ते पूर्णपणे बुडते की तरते, हे पाहण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@