‘कोरोना’ग्रस्तांचा ‘आध्यात्मिक देवदूत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |

dr _1  H x W: 0
 
 
 
 
कोरोनाकाळात आपला स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून, कोरोनाग्रस्तांवर उपचार करून, श्रीपंत सांप्रदायातील सर्व जबाबदार्‍या सांभाळणार्‍या बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ येथील आध्यात्मिक देवदूत डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्याविषयी...
 
 
सध्या कोरोनाचे संकट आपल्या देशावर नव्हे तर जगावर आहे. या कालावधीत कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्यात आपल्या सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. या काळात कोरोनाग्रस्तांची प्रत्यक्ष म्हणजे ‘कोविड’ वॉर्डात जाऊन, तर काही जण जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन समाजकार्य करताहेत. पण, बेळगाव जिल्ह्यात असे एक देवदूत आहेत की, ते कोरोनाकाळात कोरोनाग्रस्तांचा आध्यात्मिक देवदूत ठरलेले आहेत. ते म्हणजे, अवधूत संप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचे पणतू परमपूज्य डॉ. संजय पंतबाळेकुंद्री.
 
पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या घराण्यात जन्म झालेले; पण कोणताही मान, सन्मान आणि प्रसिद्धीपासून चार हात दूरच असलेले; पण पंतभक्तांचा आधारस्तंभ असलेले असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. संजय पंत यांचे आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेले संजय पंत हे गेली कित्येक वर्षे आपला डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळून श्रीपंत संप्रदायाच्या प्रचारात कोल्हापूर, निपाणी, बेळगाव परिसरात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचे पणतू असलेले संजय पंत यांचे राहणीमान अगदी साधे आहे.
 
 
संजय पंत यांचे आजोबा डॉ. बापूसाहेब (सीताराम पंतबाळेकुंद्री), वडील स्व. डॉ. अरुण पंतबाळेकुंद्री यांच्याकडून आलेला वैद्यकीय सेवेचा, पंतसंप्रदायाच्या सेवेचा आणि प्रचाराचा वसा ते समर्थपणे पुढे चालवित आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. श्रद्धा, त्यांचे सुपुत्र डॉ. निखिल हेदेखील संजय पंत यांच्यासोबत वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत.
 
डॉ. संजय पंत हे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री येथे महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या सांभाळत आहेत. श्रीगोपाळपंत आदर्श शिक्षण मंडळाचे संजय पंतबाळेकुंद्री हे विद्यमान अध्यक्ष आहेत. जितकं वैद्यकीय व्यवसायात संजय पंत हे बारकाईने लक्ष देतात, तितकंच त्यांचं लक्ष श्रीपंत महाराज आदर्श विद्यामंदिर बाळेकुंद्री, श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री व बेळगाव परिसरातील श्रीपंत संप्रदायाच्या विस्तारावर आहे.
 
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री हे अध्यात्मासोबत सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर असलेलं नाव आहे. कोरोनाकाळात डॉ. संजय पंत यांनी ‘कोविड’ रुग्णांवर उपचार करून ते कोरोनाग्रस्तांचा ‘आध्यात्मिक देवदूत’ ठरले आहेत. कोरोनाकाळात डॉ. संजय पंत यांनी आपली स्वत:ची प्रॅक्टिस बाजूला ठेवून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले आहेत.
 
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना श्रीपंत महाराजांचा आध्यात्मिक वसादेखील आहेच, त्यासोबतच त्यांनी समाजासाठी मदत करून सामाजिक बांधिलकीही जपली आहे. आरोग्य शिबिरे, सॅनिटायझरचे मोफत वाटप, मास्कचे मोफत वाटप, अशा माध्यमातून त्यांनी कोरोनाग्रस्तांना आणि सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक बांधिलकी जपत मदत केली आहे.
 
आज कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील कोणत्याही गावात श्रीपंत सांप्रदायिक उत्सव असला की, त्या उत्सवाला डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांची श्रीपंत घराण्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती असते. या प्रत्येक कार्यक्रमाला डॉ. संजय पंत हे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून वेळ देत असतात. इतकंच नव्हे, तर काही गावांमध्ये ते वैद्यकीय शिबिरेही आयोजित करतात.
 
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी ‘लॉकडाऊन’ व कोरोना महामारीच्या काळात बाहेरील गावातील जे लोक अडकून पडले होते, त्या सर्व लोकांना आणि महामार्गावरून जाणार्‍या प्रवाशांना ‘ताजी भाकर अथवा शिळी देई भुकेच्या वेळी’ याप्रमाणे मोफत जेवण व आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली. निपाणी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील ११ गावांमधील अडीच लाख नागरिकांना कोरोना जनजागृती व मोफत रोग प्रतिकार शक्तिवर्धक औषधांचे वितरण करून वैद्यकीय सेवा देणारे ते त्या परिसरातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत.
 
कोरोना महामारीचे तीव्र स्वरूप मे-जून २०२० या दरम्यान होते, या अवस्थेत वाटेत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण परिसरात पोर्टेबल ऑक्सिजनची सोय डॉ. संजय पंत यांनी केली. इतकंच नव्हे, ज्या वेळी बेळगाव आणि ग्रामीण परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत होती, त्यावेळेस निपाणी शहरात ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावरील निपाणी ‘कोविड केअर सेंटर’ची स्थापना करण्यात डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी पुढाकार घेतला व स्वत: तीन महिने शिवशंकर जोल्ले स्कूलमधील ‘कोविड वॉर्ड’मध्ये कोरोना रुग्णांची विनामोबदला सेवा केली. निपाणी आणि आजूबाजूच्या परिसरातील कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यविधीस खूप अडचण निर्माण होत होती.
 
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी ही अडचण लक्षात घेऊन निपाणी परिसरातील विविध युवक मंडळांना स्वतः मार्गदर्शन करून व पुढाकार घेऊन कोरोनाबाधित मृतदेहावर मोफत अंत्यविधीसाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यासाठी गावोगावी संघटना स्थापन करून अनेक अंत्यविधी मोफत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या कामात डॉ. संजय पंत यांनी विविध मंडळांच्या सहकार्याने राष्ट्रधर्म संस्था स्थापनेत सहकार्य केले. अक्कोळ येथे ग्रामपंचायत व विविध मंडळांच्या माध्यमातून १६ हजार ग्रामस्थांना ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्यांचे मोफत वाटप केले.
 
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचे सध्या अक्कोळ (निपाणी-बेळगाव) येथे वास्तव्य आहे. या अक्कोळ गावातील अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांची होणारी अडचण ओळखून बाळोबामाळ येथील स्मशानभूमीत ८० हजार रुपयांचे अंत्यविधीसाठी लागणारे दोन लोखंडी शवदाहिनी स्टँड बसवून दिले. ‘कोविड सेंटर’मधील विनामूल्य वैद्यकीय सेवा असो, भुकेलेल्यांना जेवणाची सोय असो, कोरोनाग्रस्तांसाठी अंत्यविधी, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे असो, प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष देऊन ती गोष्ट मार्गी लावेपर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा करणारे, सर्वांना प्रेम आणि अध्यात्माच्या माध्यमातून आपलंस करून घेणारे आणि कोरोनाग्रस्तांचे आध्यात्मिक देवदूत डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या कार्याला सलाम..!


- आदित्य कडू

@@AUTHORINFO_V1@@