मुंबई महापालिकेतर्फे कोविड योद्धेही उपेक्षित

    28-Dec-2020
Total Views |

Kishori Pednekar_1 &
 
 


कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची प्रतीक्षा


मुंबई : मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्ष होत आले तरी अजून निवृत्तीनंतरच्या लाभाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची फारच कुचंबणा होत आहे. आयुष्यभर सेवा बजावल्यानंतर निवृत्तीचा काळ सुखाचा जावा यासाठी अनेकजणांना निवृत्तीनंतर मिळणारे लाभ हाच एकमेव आधार असतो. पण त्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागते. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेच्या आधारावरच काहींनी मुलांची लग्नकार्यादी कामे योजलेली असतात. मात्र रक्कमच हातात नसल्याने त्यांच्या विवंचना वाढल्या आहेत.
 
 
 
मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बेस्ट उपक्रमात अनेकांना निवृत्तीनंतरच्या लाभासाठी कार्यालयात खेटे मारावे लागले होते. मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या अनुदानानंतरच काहींना रक्कम मिळाली. त्याच मुंबई महापालिका प्रशासनाचे निवृत्त कामगार आता लाभ रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई महापालिकेने आता सेवानिवृत्त कामगारांना मिळणारी सर्व रक्कम ही ऑनलाईन पध्दतीने एकाचवेळी मिळेल, असा आदेश आहे, परंतु असा आदेश असताना लाभ रकमेसाठी पहिल्या पध्दतीपेक्षा फार उशिराने म्हणजे आठ महिन्यांनी, काहीना तर एक वर्षापेक्षा प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे निवृत्त कामगारांची चिंता वाढली आहे.
 
 
कोविड योद्ध्येही उपेक्षित
 
निवृत्तांपैकी अनेकांनी जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना काळात जीवावर उदार होऊन कामे केलेली आहेत. अशा कामगारांना मिळणारी हक्काची रक्कम वेळेत देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक होते. पण ज्यांच्या हाती ही सूत्रे आहेत त्यांच्याकडे तेवढेही शहाणपण नसल्याने कामगारांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. कामगारांचा लाखोंचा फंड महापालिकेकडे आहे. पण तो देण्यात विलंब का, असा प्रश्न कामगारांकडून विचारण्यात येत आहे.
 
 
 
२०१० पासून कर्मचारी वंचित
 
 
महापालिकेच्या एल विभागात काम करणारे सुदाम मोहिले २०१० मध्ये निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांना वरिष्ठ लिपिक म्हणून बढती मिळाली. निवृत्त होताना त्यांना सेवेचे लाभ मिळाले, पण बढतीची थकबाकी मिळाली नाही. एल वॉर्डमध्ये सेवा बजावणारे मोहिले जी उत्तर विभागातून २०१० मध्ये निवृत्त झाले. मात्र तेव्हापासून प्रमोशनमुळे मिळणारी ग्रॅच्युईटी आणि इतर लाभासाठी ते पालिका कार्यालयात खेटे घालत आहेत. पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत असल्याची त्यांची तक्रार आहे. जी नॉर्थ विभागाने त्यांचा सारा तपशील तयार ठेवला आहे. पण एल वॉर्डकडून त्याची पडताळणी (व्हेरिफिकेशन) होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्यांनी आयुक्तांपर्यंत पत्रव्यवहार केला आहे. सर्व उपाय झाल्याने ते आता लाभ रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
 
 
येथेही कोरोना कारण 
 
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र सेवानिवृत्तांना लाभ रक्कम मिळण्यात कोरोना आडवा आला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महापालिकेचे बहुतेक कर्मचारी लढा देत होते. लॉकडाऊनमुळे काही कर्मचारी कार्यालयात येऊ शकत नव्हते. त्यामुळे सेवानिवृत्तांना मिळणाऱ्या लाभ रकमेचा हिशेब करण्यात उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. सेवानिवृत्तांना पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅचुईटी आणि शिल्लक रजेचा मोबदला अशा स्वरूपात निवृत्तीनंतरचे लाभ मिळतात. प्रत्येक विभागाने तसे क्लेम द्यावे लागतात. परंतु कोरोनामुळे काही काळ विस्कळीतपणा आलेला आहे. सुमारे दीड हजार प्रकरणे प्रलंबित असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोरोनामुळे झालेला बिलंब समजू शकतो. पण २०१० मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यालाही त्याच्या काही लाभ रकमेसाठी प्रतीक्षा करावी लागणे, हे त्या कामगारासाठी चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.