चित्रपटसृष्टीतील ज्वलंत वादळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

Vinay Apte_1  H
 
 
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून आपल्या कामाचा आणि अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे म्हणजेच चतुरस्र रंगकर्मी विनय आपटे...
मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेमातही त्यांनी केलेल्या भूमिकांमध्ये त्यांच्या अभिनयाचा सकस पोत होता. ‘सत्याग्रह’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ‘आरक्षण’, ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘प्रणाली’ ही त्यांची काही उदाहरणे. नाटक व सिनेमामधील दिग्दर्शनाइतकाच त्यांच्या कामाचा पैस सीमित नव्हता, तर ‘अ‍ॅडिक्ट’सारख्या जाहिरात संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नावाजलेल्या जाहिरातींचे दिग्दर्शन केले. तंत्रज्ञानामध्ये वेगाने होत असणारे बदल रंगकर्मींना कळायला हवेत, यासाठी ते कायम आग्रही राहत. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यवाहपदाचा कारभारही त्यांनी दीर्घकाळ पाहिला. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या मुलांना अमाप उमेद आणि प्रोत्साहन देण्यात ते तप्तर असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये त्यांचा पहाडी आवाज हे वैशिष्ट्य. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये स्वतःची जागा तयार करीत असताना त्यांनी आवाजाच्या या गुणवैशिष्ट्यांचाही नेमका वापर केला. आपल्या तत्त्वांसाठी आग्रही असणाऱ्या त्यांना गुरुस्थानी मानणारे त्यांचे अनेक शिष्य केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर निरनिराळ्या क्षेत्रात विखुरलेले आहेत. कोणतीही भूमिका साकारताना एका वेगळ्याच स्टायलीत संवादफेक ही त्यांच्या अभिनयाची विशेष बाब होती. त्यांच्या आवाजात भारदस्तपणा होता. १९८४च्या ‘आशियाई गेम्स’चं त्यांनी वृत्तांकन केलं तर ‘गांधी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचं नाटक म्हणजे एखाद्या रंगकर्मीसाठी नाटकाची कार्यशाळाच. तेंडुलकरांचे संवाद, त्यातले छुपे स्तर अचूक पकडणं हे दिग्दर्शकीय दृष्टीनंही मोठं आव्हान. पण, एका तरुण नाटकवेड्यानं हे आव्हान नुसतं स्वीकारलंच नाही, तर आपल्या दमदार आवाजावर आणि दिग्दर्शनातील हुकूमतीवर एका सुंदर नाटकाचं सोनं केलं. नाटक होतं ‘मित्राची गोष्ट’ आणि तो अभिनेता-दिग्दर्शक होता विनय आपटे... शब्दफेक, आवाज आणि अभिनय या त्रिसूत्रीच्या जोरावर विनय आपटेंनी या नाटकातला तरल आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि आपल्या चतुरस्र प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत समर्थपणे वावरलेलं एक ज्वलंत वादळ म्हणजेच विनय आपटे...
 
 
 
१७ जून, १९५१ या दिवशी जन्म घेतलेल्या या वादळानं आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत स्वतःचं ध्रुवपद स्वतःच्या हिमतीवर मिळवलं आणि आजन्म सांभाळलं. विद्यार्थीदशेतच राज्य नाट्य स्पर्धेच्या ‘मॅन विदाऊट शॅडो’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणारा हा हरहुन्नरी कलाकार त्या नाटकाच्या नावाप्रमाणेच कोणत्याही सावलीचा आधार न घेता स्वच्छंदपणे रंगभूमीवर रुजला, बागडला आणि बहरला. अभिनेता, दिग्दर्शक, पुढे ‘गणरंग’ संस्थेच्या माध्यमातून नाट्यनिर्माता आणि दूरचित्रवाणीच्या प्रांगणातला एक सतत नावीन्याचा ध्यास घेतलेला सर्जनशील कलावंत अशा विविध ओळखींमधून विनय आपटे हे नाव गाजत राहिलं. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅट्ट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अव्हेलिबिलिटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकांमध्ये समूहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. विनय आपटे यांची कारकिर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. ‘नाटक’, ‘गजरा’, ‘युवावाणी’ अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अँटिगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. ‘झी मराठी’ वाहिनीवरून प्रसारित झालेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेत त्यांची भूमिका होती. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ही त्यांची शेवटची मालिका ठरली. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
 
 
 
भारदस्त आवाज, थेट भिडणारी नजर, सहज अभिनय ही विनय आपटे यांची ओळख. रंगभूमी, मालिका, चित्रपटांत वावरणाऱ्यांच्या ‘आपटे स्कूल’चे प्रणेते म्हणजे विनय आपटे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या विनय आपटे यांची सुरुवात झाली ती सत्तरच्या दशकात कॉलेजच्या रंगभूमीवर. ‘पुंडलिक शेट्टीवार’, ‘कुल वृत्तांत’, ‘अपुरी’ या त्यांच्या एकांकिका गाजल्या. १९७२ साली त्यांचे दूरदर्शनच्या पडद्यावर आगमन झाले आणि रसिकमान्यतेची शाबासकी मिळविली. ‘गजरा’ची संकल्पना हीट झाली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण, त्याहीपेक्षा गाजल्या त्या त्यांच्या लघुनाटिका. सुरुवातीला ‘भूमिका’ आणि कालांतराने ‘गणरंग’ या नाट्यसंस्था त्यांनी उभ्या केल्या. नाट्यकर्मी हे बिरूद खऱ्या अर्थाने सार्थ केलं. ‘मित्राची गोष्ट’, ‘घनदाट’, ‘सवाल अंधाराचा’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ अशी एकापेक्षा एक नाटके त्यांनी केली. पार्ल्यातील त्यांच्या ‘गॉसिप ग्रुप’ने अनेक प्रायोगिक नाटके केली. ‘आभाळमाया’ या मालिकेने मराठीत महामालिकांचा सिलसिला सुरू झाला. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत जाणवायचा तो स्पेशल ‘आपटे’ टच. कलाकर्मीने कोणतीही भूमिका अत्यंत समरसून कशी करायला हवी, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे त्यांनी केलेल्या भूमिका. स्वतः दिग्दर्शनामध्ये आत्यंतिक रस असूनही अरुण नलावडे या सहकारी मित्राने दिग्दर्शित केलेल्या ‘रानभूल’ नाटकात त्यांनी अप्रतिम अभिनय साकारला. एकांकिका, प्रायोगिक, हौशी, व्यावसायिक अशा सर्वच रंगभूमीवर काम केलेल्या आपटे यांनी मालिका आणि चित्रपटांमध्येही वेगळेपणा कायम राखला.
 
 
 
आवाजाची निसर्गदत्त देणगी, अत्यंत उठावदार व्यक्तिमत्त्व, अभिनयाची थक्क करायला लावणारी झेप आणि दिग्दर्शनातील अजोड प्रतिभा यांतून मराठी मनोरंजन क्षेत्रात विनय आपटे नावाचा झंझावात जवळजवळ चार दशकं फिरत होता... तेंडुलकरांपासून ते आताच्या प्रदीप दळवींपर्यंत अनेकांच्या उत्कृष्ट संहितांना हा परिसस्पर्श लाभला. ‘मित्राची गोष्ट’, ‘अँटिगनी’पासून ‘रानभूल’, ‘डॅडी आय लव्ह यू’, ‘तुमचा मुलगा करतो काय?’, ‘कबड्डी कबड्डी’ अशा अनेकविध नाटकांमधून, ‘खबरदार’, ‘लालबाग परळ’, ‘धमाल’, ‘कॉर्पोरेट’, ‘टार्गेट’, ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘चांदनी बार’, ’एक चालीस की लास्ट लोकल’ अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमधून आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘दुर्वा’, ‘वहिनीसाहेब’, ‘आभाळमाया,’ अशा मालिकांमधून विनय आपटेंनी आपली चमक दाखवून दिली. ‘कुसुम मनोहर लेले’ किंवा ‘नथुराम’सारख्या नाटकांचे हजारो प्रयोग होऊनही हाऊसफुलचा बोर्ड शेवटच्या प्रयोगापर्यंत झळकत राहिला, याचं श्रेय अर्थातच विनय आपटेंच्या संवेदनशील आणि समर्थ दिग्दर्शनाला जातंच, असा हा झंझावात ‘७ डिसेंबर, २०१३’ या दिवशी शांत झाला. सिमला येथे एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले असताना आपटे यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर मुंबईत सुमारे दीड महिन्याच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. श्वसनाच्या त्रासाबरोबरच अन्य आजारही उफाळल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. पण, आजही त्यांचा आवाज रंगमंचावरच्या अंधारात घुमत राहतो. पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, ‘मी विनय आपटे बोलतोय...’ अशा या चित्रपट, रंगभूमी, आकाशवाणी किंवा दूरचित्रवाणी माध्यम प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा आणि ओळख निर्माण केलेल्या, भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या अभिनेत्याला, मानाचा मुजरा...
 
 
- आशिष निनगुरकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@