पेशवे बखरीचे साक्षीदार : श्रीक्षेत्र वैजनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

Vaijnath_1  H x
 
 
 
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये देव आणि धर्माला प्रमुख स्थान आहे आणि त्यामुळेच एकाहून एक अशी अनेक सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थाने संबंध महाराष्ट्रभर पसरली आहेत. ही मंदिरेच महाराष्ट्राची मुख्य शक्तिकेंद्रे आहेत. अशाच या देवश्रद्धा आणि धार्मिक महाराष्ट्रात काहीशा आडवाटेवर श्री वैजनाथाचे एक जागृत आणि स्वयंभू देवस्थान आहे. वैजनाथ हा शब्द उच्चारताच बहुसंख्य मराठी मनांत बीड जिल्ह्यातील ‘परळी वैजनाथ’ या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या क्षेत्राची आठवण येते. पण, असेच आणखी एक वैजनाथ रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातसुद्धा आहे. प्रस्तुत लेखात त्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
 
 
रायगड जिल्ह्यातील कर्जत, या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारणतः १५ किमी अंतरावर नदीकाठी श्रीक्षेत्र वैजनाथाचे स्वयंभू स्थान वसले आहे. देवस्थानाच्या नावानेच उल्हासनदीची उपनदी पेजनदीच्या काठावर वसलेल्या या गावाचे नावसुद्धा वैजनाथच आहे. वैजनाथ शिवलिंगाबाबत पंचक्रोशीत एक आख्ययिका आहे की, हे लिंग पूर्वी नदीच्या पलीकडील तीरावर स्थित पाली या गावात होते. परंतु, काही कारणास्तव ते आज जेथे मंदिर आहे तेथे प्रकट झाले. त्याबद्दल असे सांगितले जाते की, एका भक्ताच्या स्वप्नात येऊन वैजनाथाने दृष्टांत दिला व अगदी त्याच ठिकाणी शोधाशोध केल्यावर हे शिवलिंग प्रकट झाले. पण, हे कोणत्या काळात झाले? का झाले? मंदिराच्या निर्मितीचा काळ कोणता? याचे उत्तर मात्र पंचक्रोशीतील कोणाकडूनच मिळत नाही. पैलतीरावरील पाली गावातही शिवाचे मंदिर आहे, त्यालासुद्धा पालीचे ग्रामस्थ वैजनाथच म्हणतात. हे सर्व आपल्याला काहीसे कोड्यात टाकते; पण तसे असले तरीही वैजनाथ गावातील स्थान आज महत्त्वाचे मानले जाते. वैजनाथ गावापासून अगदी काही अंतरावर असणाऱ्या भिवपुरी गावात पानिपतच्या तिसऱ्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊंच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनी बांधलेला अष्टकोनी दगडी तलाव आहे. गावाच्या नैऋत्येला प्रसिद्ध असा ढाक-बहिरीचा डोंगर आहे, तर पूर्वेकडे कोकणातून घाटमाथ्यावर जाणारा प्राचीन असा कुसूरचा घाट आहे.
 
 
 
वैजनाथ गावातून हुमगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पूर्वाभिमुख श्री वैजनाथचे मंदिर स्थित आहे. मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात येताच आपल्याला समोर नंदीमंडप दिसतो. त्याशेजारीच तुळशी वृंदावन आणि दीपमाळ व त्यावर कर्पूरस्तंभ आहे. पूर्वी येथेच दोन दगडी दीपमाळा होत्या, त्यांना नव्वदच्या दशकातील जीर्णोद्धारावेळी येथून काढण्यात आले. दीपमाळांचे हे भग्न अवशेष आपण आजही मंदिराबाहेरील परिसरात पाहू शकतो. शिवमंदिर परिसरात सहसा न आढळणारे दक्षिणाभिमुख मारुती मंदिर येथे आपल्याला पाहायला मिळते. एके काळी स्वतः समर्थ रामदास स्वामींनी या मारुतीची स्थापना केली, असे गावकरी मानतात. पण मग हा मारुती शिवमंदिराच्या परिसरातच का स्थापला आहे? हे एक अवघड कोडेच आहे. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धाराच्या वेळी मारुती मंदिरात अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यातील मुख्य म्हणजे, पूर्वीचे वैजनाथाच्या सभामंडपातील काष्ठशिल्पाने नटलेले खांब येथे वापरण्यात आले आहेत. या खांबांवर रामायणातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. त्याचप्रमाणे खांबांच्या वरच्या भागावर आपण पुसट झालेले मध्ययुगीन काळातील रंगकाम पाहू शकतो. मारुती मंदिरातून बाहेर आल्यास आपण मंदिर प्रांगणात येतो. मुख्य सभामंडप आणि प्रांगण यामध्ये दक्षिणेकडे आपल्याला तीन छोटी मंदिरे दिसतात. त्यातील पहिल्या मंदिरात सती शिळा व एका पुरातन मूर्तीचे पूजन केले जाते. दुसरे मंदिर सत्पुरुष वामनबुवा महाराज यांचे शिष्य सीताराम महाराज यांचे समाधी मंदिर आहे. येथेच त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. तिसरे मंदिर अलीकडे बांधलेले विठ्ठल-रखुमाईचे आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील देवकोष्ठांत श्रीगणेश आणि मारुतीच्या मूर्ती आहेत. अलीकडील जीर्णोद्धारावेळी सभामंडपातील बहुतांश भागावर पांढरा संगमरवर बसवण्यात आला आहे. सभामंडपाला लागूनच धार्मिक कार्यांसाठी वापरले जाणारे मोठे सभागृह आहे. सभामंडपात प्रवेश करताच आपल्याला डोक्यावर मोठी पितळी घंटा दिसते. सभामंडपात उत्तर-दक्षिणेला मिळून दुसऱ्या जीर्णोद्धारावेळी तयार केलेली चार देवकोष्ठ आहेत, ज्यात अनुक्रमे श्रीराम-सीता-लक्ष्मण, श्रीकृष्ण-राधा, दुर्गा आणि सरस्वती या देवता आहेत. सध्याचा सभा मंडप ज्या काँक्रीटच्या चार खांबांवर तोलला आहे, तेथेच पूर्वी निरगुडीच्या अखंड लाकडाचे रामायणातील विविध प्रसंगांच्या काष्ठशिल्पांनी नटलेले नक्षीदार खांब होते, जे आज आपल्याला मारुती मंदिरामध्ये पाहता येतात. अंतराळातील देवकोष्ठात अनुक्रमे श्रीकृष्ण आणि श्रीगणेशाच्या मूर्ती आहेत, तर सभामंडपात नंदी आणि कासव आहे. पाच पायऱ्या उतरून गेल्यास गर्भगृहातील स्वयंभू देवस्थान श्री वैजनाथचे दर्शन घेता येते. एकादश (११) धारांचे अभिषेक पात्र शिवलिंगावर धरले असता शिवलिंगातून सिंहनाद होतो, जे इतर देवस्थानांच्या बाबतीत आढळत नाही. शिवपीठासमोर काळभैरव पुजला जातो, तर मागे शिवपार्वतीच्या संगमरवरी मूर्ती आहेत. प्रदक्षिणा मारताना वैजनाथाचे दर्शन घेता यावे म्हणून गर्भगृहाला त्रिदिशांना गवाक्ष आहेत. प्रदक्षिणा मार्गावरच मंदिराच्या मागील भागात जाण्यासाठी द्वार आहे. येथूनच नदीपात्रात उतरणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत, ज्यातील पहिल्या पायरीवर उजवीकडे देवनागरी लिपीतील तीन ओळींचा भग्नस्वरूपातील शिलालेख आहे.
 
 

Vaijnath_1  H x 
 
 
 
 
स्थानिक ग्रामस्थांच्या मते जुने मंदिर हे काष्ठशिल्पात नटलेले खांब आणि कौलारू छपराचे होते, त्यावर कळस नव्हता. साधारण १९८७ ते ९०च्या दरम्यान झालेल्या दुसऱ्या जीर्णोद्धारावेळीही मूळ लाकडी रचना बदलून काँक्रीटचा वापर करून मंदिरावर कळस तयार करण्यात आला. मंदिराच्या मागे नदीपात्रात भक्कम दगडी तोड्यांचा भव्य कुंड आहे. कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या असून भिंतीवर आतील बाजूस दोन देवकोष्ठ आहेत. या कुंडाच्या बांधकामावेळी एक भन्नाट तंत्र वापरले आहे, ज्यामुळे नदीतील पाणी आणि कुंडातील पाण्याची पातळी सामान राहते. यासाठी कुंडाच्या जोत्यात उत्तरेकडील चिऱ्यामध्ये एक छिद्र पाडण्यात आले आहे. कुंडापासून काही अंतरावर नदीपात्राच्या मध्यभागी एक छोटा दगडी चिऱ्यांत बांधलेला आणखी एक कुंड आहे, ज्यास ‘गंगा कुंड’ही संबोधतात. भोवतालच्या गावांतील विहिरींचे पाणी आटले, तरी या कुंडात भरपूर पाणी असते. अलीकडे संवर्धनाच्या नावाखाली काँक्रीटच्या वापराने गळचेपी केलेल्या या कुंडाची घुसमट आपल्याला नदीतीरावरून जाणवते. वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या रात्री दीपमाळेवर त्रिपूर लावून साक्षात वैजनाथाचा चांदीचा मुखवटा ठेवलेली पालखी गावात मिरविण्यासाठी निघते, तेव्हा या कुंडातील पाणी महादेवाच्या डोळ्यांना लावले जाते. ग्रामस्थांची अशी श्रद्धा आहे की, नेमके याच वेळी गंगा कुंडातील पाणी दुधाळ रंगाचे होते. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसरात मोठी यात्रा असते, हजारो भाविक त्यावेळी वैजनाथाचे दर्शन घेतात. गूळ आणि शेंगदाणे यांपासून बनवलेली ‘गुडदाणी मिठाई’ या यात्रेचे मुख्य आकर्षण असते.
 
 
 
वैजनाथ मंदिराचे महत्त्व येथे काही काळ वास्तव्य केलेल्या दोन सत्पुरुषांमुळे अधिकच वाढले आहे. त्यातील प्रथम आहेत पेशव्यांच्या बखरीचे कर्ते ‘श्री कृष्णाजी विनायक सोहनी’, बसला की नाही धक्का! कृष्णाजी विनायक सोहनी यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध वैजनाथाच्या मंदिरातच घालवला आहे. येथे ते जटा वाढवून एखाद्या तपस्व्याप्रमाणे राहत. वैजनाथाचे हे मंदिर जणू या बखरीच्या निर्मितीचे साक्षीदारच आहे कारण येथेच त्यांनी ही बखर तोंडी सांगितली व गावातीलकाही मंडळींनी ती लिहून काढली. पण, लिहिणारे हे हात आज इतिहासास अपरिचित आहेत.कृष्णाजी पेशव्यांचे कारभारी चिंतोपंत देशमुख पावसकर यांचे आप्त होते. याच मंदिरात सन १८५४-५५च्या दरम्यान वयाच्या साधारण सत्तराव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. येथूनच काही अंतरावर असलेल्या भिवपुरी गावात या बखरीच्या उत्तरार्धाची मूळ प्रत सापडली होती. तर दुसरे सत्पुरुष आहेत ‘श्री वामन महाराज परांजपे.’ मूळचे कोकणातील असलेल्या वामनबुवांनी तारुण्यात अनेक तीर्थाटने आणि वेदाभ्यास करून वैजनाथ मंदिरात स्थिर होऊन पुढील साधना करण्याचे ठरविले. गंगा कुंड आणि नदीकाठावरील शिवाचे जागृत देवस्थान हे त्यांच्या येथील वास्तव्याचे मूळ कारण मानले जाते. सन १८९१ मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी त्यांनी कर्जत तालुक्यातील दहिवली गावाशेजारी उल्हास नदीतीरी देहत्याग केला. मागील १२८ वर्षांपासून माघ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा या काळात त्यांचा पुण्यतिथी सप्ताह वैजनाथ मंदिरात साजरा केला जातो. मूळ मंदिराच्या सभामंडपाला लागून असलेल्या सभागृहाच्या एका भागात वामनबुवांचा मठ आहे. जेथे त्यांच्या नित्य वापरातील काही वस्तू आपण पाहू शकतो. तर असे हे कर्जतपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारे; पण काहीसे आडवाटेवरील आणि भाविकांच्या मोठ्या वर्गाकडून दुर्लक्षित असलेल्या श्री वैजनाथ मंदिरास आपणही एकदा वाट वाकडी करून नक्की भेट द्यावी म्हणून हा लेख प्रपंच.
 
 
- ओंकार महाडिक
@@AUTHORINFO_V1@@