केशवायनम:

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

keshavaynamah_1 &nbs
 
 
 
१९३६ पासून परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना तात्या कमीत कमी ५०-६० वेळा भेटले होते. डॉक्टरांच्या जन्मशताब्दीनिमित्त तात्यांनी काही लेख लिहिले होते, तरीही एक छोटेसे पुस्तक दहा दिवसांत लिहिले. ‘केशवायनमः’ या पुस्तकातील आठवणींमधून संघाबद्दलच्या तात्यांच्या कल्पना स्पष्ट कशा होत गेल्या आणि स्वतः डॉक्टर किती उदार अंतःकरणाने समाजाकडे पाहत होते, ते लक्षात येते.
 
‘राष्ट्रोन्नती एक मात्र ध्यान हेच राहू दे,राष्ट्रजीवनात जीव, जीव अंत होऊ दे !!’
 
प्रत्यक्षात हे गीत जगण्याचा ध्यास महाजन कुटुंबातील तरुणांना लागला होता. मधुकरराव महाजनांच्या घरातील वातावरण देशभक्ती आणि समाजसेवेला अनुकूल होते. त्यांचे काका परशुराम विठ्ठल हे ‘केसरी’चे मुख्य एजंट होते. लोकमान्यांच्या काळात ठाणे जिल्हा काँग्रेसची जबाबदारी त्यांच्यावर होती. १९३६ मध्ये कल्याणला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून, महाजनांच्या घरातली १० ते १८ वयोगटातील सगळीच सख्खी-चुलत भावंडे, शाखेत जात होती. आरोग्यसंपदा आणि ज्ञानसंपदा याकडे मधुकरराव यांच्या वडिलांचे पुरुषोत्तमरावांचे विशेष लक्ष होते. चौदाव्या वर्षापासून पुढे शिक्षणासाठी कायमचे पुण्याला जाईपर्यंत त्यांचे वडील पुरुषोत्तमराव या मुलांना दर उन्हाळी सुट्टीमध्ये पुण्याला पाठवत होते, ते तेथील महाराष्ट्र मंडळात लाठी-काठी आणि पोहणे शिकण्यासाठी. त्याचप्रमाणे कल्याण नगर वाचनालयातील ललित, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि अनेक विषयांची सर्वच्या सर्व पुस्तके मधुकरावांनी पुण्याला जाण्यापूर्वी म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षापूर्वीच वाचून काढली होती असे त्यांनीच, म्हणजे आमच्या वडिलांनी-तात्यांनी आम्हाला सांगितले होते. येथून पुढे लेखात त्यांचा उल्लेख मी तात्या असाच करणार आहे.
 
बालपणातील संस्कार
 
तात्यांचे समवयस्क चुलत भाऊ कृष्णाजी परशुराम तात्यांवरील एका लेखामध्ये लिहितात की, त्या काळात मुलांनी स्वावलंबी बनावे, अशीच शिकवण प्रामुख्याने असे. सकाळच्या प्रहरी चांगला अभ्यास होतो व केलेले लक्षात राहते, ही मधूची दृढ समजूत होती. त्यामुळे तो नेहमी पहाटे ५ वाजता उठून अभ्यास करायचा. मुख्य गोष्ट म्हणजे, थोड्या प्रयत्नाने मधूला सर्व गोष्टी ज्ञात होत असत. मधूचं हस्ताक्षर सुरेख होतं, ड्रॉईंगच्या दोन परीक्षा तो पास झाला होता, खेळण्याच्या बाबतीत म्हणाल, तर मधू क्रिकेटसुद्धा छान खेळायचा. तो एक पल्लेदार बॅट्समन होता. पुढे डॉ. मोडक यांच्या प्रेरणेने कल्याणला ‘बॉईज स्काऊट’ सुरू झाला आणि मग आम्ही तेथे एकत्र जमू लागलो. त्याच वेळी कल्याणमध्ये ‘नमस्कार मंडळा’ची स्थापना झाली. विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी तेथे नमस्काराच्या चढाओढी असत. वय वर्षे आठ ते बारा या वयोगटात मधूचा पहिला व माझा दुसरा नंबर असायचा. १९३०पासून सतत तीन वर्षे आम्हाला हे बक्षीस मिळाले. मधू बरीच वर्षे सूर्यनमस्कार घालीत असे आणि पुढे तो योगासने करू लागला. १९४२ मध्ये तात्या व माझे काका विष्णुपंत संघप्रचारक निघाले, तेव्हा हे काका कॉलेजमध्ये या दोघांची हजेरी लावून नोकरीवर जात. सर्व महाजन भाऊ-बहिणींना संघ व समितीच्या कामाचे महत्त्व उमगले होते. तात्या ठाणे जिल्हा पूर्णकालीन प्रचारक असतानाच १९४५ मध्ये एम.ए. झाले. १९४८च्या संघबंदीकाळात त्यांनी भूमिगत राहून काम केले. नंतर संघाच्या कामाची पुन्हा घडी बसविणे आवश्यक होते, हे लक्षात घेऊन ते १९५१ पर्यंत प्रचारक म्हणून कार्यरत होते.
 
डॉ. हेडगेवार यांचा सहवास
 
१९३६ पासून परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना तात्या कमीत कमी ५०-६० वेळा भेटले होते. डॉक्टरांच्या जन्मशताब्दीनिमित्त तात्यांनी काही लेख लिहिले होते, तरीही एक छोटेसे पुस्तक दहा दिवसांत लिहिले. ‘केशवायनमः’ या पुस्तकातील आठवणींमधून संघाबद्दलच्या तात्यांच्या कल्पना स्पष्ट कशा होत गेल्या आणि स्वतः डॉक्टर किती उदार अंतःकरणाने समाजाकडे पाहत होते, ते लक्षात येते. याच काळात तात्यांना त्यांच्या अंतिम आजाराची, कर्करोगाची चाहूल लागली होती, त्यामुळे डॉक्टरांच्या आठवणी शब्दबद्ध करण्याची ही अखेरची संधी आहे, असे त्यांच्या मनाने घेतले. पुस्तकाच्या ‘मनोगता’मध्ये तात्या लिहितात की, “फार जुन्या आठवणींचे धुमारे मनामध्ये अव्यक्त स्थितीत राहतात ते त्या वेळच्या सूक्ष्म व संकलित संस्कारामुळे. ते व्यक्त होताना त्या आठवणींचा रंगबिरंगी मनोहरी स्रोत उसळी मारून वर येतो.”
 
ते लिहितात, “‘केशवायनमः’चे लेखन करताना मी पुन्हा एकदा भूतकाळात गेलो, त्यावेळी वयोमानाप्रमाणे हळवे झालेले मन अनेकदा हेलावून गेले. बालमूर्ती आप्पा पाटणकरच्या संघस्थानावरील खणखणीत आज्ञा ऐकल्या. वयाने प्रौढ; पण तरुणांनाही लाजवेल अशा चपळाईने दूर ठाण्याहून संघ शाखेवर घाईघाईने आलेल्या आबा घाणेकरांना अदबीने प्रणाम केला. रुसलेल्या यशवंत विद्वांसची समजूत घालण्याकरिता त्याचा मोठा भाऊ बनलो. पूजनीय डॉक्टरांच्या पुण्यात निघालेल्या मिरवणुकीत थयथय नाचलो आणि त्यांच्याबरोबर भालजी पेंढारकर यांच्या ‘भगवा झेंडा’ या सिनेमालाही गेलो. या सर्व आठवणींची पाठशिवणी करणाऱ्या अपार दुःखाने भावविभोर झालो.”
 
संवेदनशील डॉ. हेडगेवार
तात्या जेवढे गंभीर प्रवृत्तीचे आणि अभ्यासू होते तेवढेच रसिक आणि संवेदनशील होते, म्हणूनच सर्व वयाच्या लोकांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त आपुलकीही वाटत असे. १९३६-३७ या दोन वर्षांत डॉ. हेडगेवार यांचे कल्याणला वारंवार जाणे होत असे. प्रवासात अनेकदा डॉक्टरांना कल्याण जंक्शनला गाडी बदलावी लागत असे. डॉक्टर कधी गावात आले तर ते उतरतील त्या घरी आणि कधी त्यांच्याजवळ वेळ नसेल तर तरुण मुले, स्टेशनवर त्यांना भेटायला जात. तात्यांनी लिहिले आहे की, डॉक्टरांना भेटायला कोणी मोठी माणसे नसत. आम्ही मुले जात असू. डॉक्टर स्टेशनवर येऊन परस्पर पुण्याला जाणार असले तरी आम्ही त्यांना चहा दिल्याचे आठवत नाही. चहा घेऊन द्यायला पैसे नसत आणि घरून थर्मासमध्ये चहा घेऊन जाण्याचे कधी आमच्या मनात आले नाही. डॉक्टर सर्वांची चौकशी करीत. त्यांची स्मृती नावे लक्षात ठेवण्याच्या बाबतीत तल्लख होती. कसे वागायचे याबद्दल ते उपदेश करीत, “भांडू नका,” असे सांगत. परंतु, त्यांचे शब्द उपदेशाची त्रयस्थ भूमिका घेऊन येत नसत तर ते जिव्हाळ्याचा साज चढवून येत आणि बघता बघता मनाचा कब्जा करीत. राग-द्वेषाचे काटेकुटे हळुवारपणे काढून टाकून मनाची मशागत करणारा डॉक्टरांसारखा माणूस मी आज पर्यंत कोणी दुसरा पाहिला नाही.
 
तारुण्याच्या उंबरठ्यावर संघ संस्कार
 
कल्याण शाखेच्या प्रारंभीच्या काळात तात्यांसारखी १५-१६ वर्षांची मुले दादा समजली जात. डॉक्टरांना भेटायला जायचे असले किंवा बैठक असली तर ८ ते १४ वयाच्या बाल मुलांना ही मोठी मुले अजिबात बरोबर घेत नसत. एकदा डॉक्टरांच्या हे लक्षात आले आणि ते म्हणाले, “ही मुलं आपण होऊन आलेली आहेत, त्यामुळे ती बैठकीस बोलावलेल्या मोठ्या स्वयंसेवकांपेक्षा अधिक लवकर संघ समजून घेतील.” त्यापैकी काही उत्तम शिल्पकार, गायक, लेखक झाले, असे तात्या पुस्तकात म्हणतात. डॉक्टरांच्या काळातील हे बाल स्वयंसेवक कीर्तिमान असो किंवा नसो, त्यांच्या अंतःकरणात असलेली संघ तत्त्वज्ञानाची धग मात्र कायम टिकून राहिली, असे तात्या लिहितात.
 
डॉक्टर साहेबांच्या स्वभावात केवळ पित्याची शिस्त नव्हती, तर त्यांच्या रोमारोमात मातेच्या हृदयाची कोमलता भरली होती. आपल्या छोट्या स्वयंसेवकांकरिता ते सहजपणे काबाडकष्ट करीत असत, हे सांगताना तात्यांनी डॉक्टरांची एक आठवण लिहिली आहे. डॉक्टरांना स्टेशनवरून घेऊन विठ्ठलवाडीला संघाच्या कार्यक्रमासाठी एकदा शाळकरी तात्या आणि बाळ पटवर्धन निघाले. डॉक्टरांचा अवजड होल्डॉल उचलून रेल्वेलाईनमधून तात्यांना चालता येईना, तेव्हा डॉक्टरांनी तो होल्डॉल उचलला आणि संघस्थान जवळ आल्यावर मात्र मुलांजवळ दिला. मुलांनीच सामान उचलले आहे, असे श्रेयही मुलांना मिळेल असे पाहिले. डॉक्टरांच्या मनातील ही आपुलकीची भावना तात्यांनीही आत्मसात केली होती.
 
हैदराबादच्या भालचंद्र याज्ञिक (८८) यांनी एक आठवण सांगितली. १९५०-५१ मध्ये नागपूरच्या संघशिक्षा वर्गावर मधुकरराव त्यांचे मुख्य शिक्षक होते. कबड्डी खेळताना याज्ञिक यांना खूपच जोराचा मार लागला. दोन दिवस ते झोपून होते, तेव्हा महाजन त्यांच्या तब्येतीची खूपच काळजी घेत होते. पुढे ३५ वर्षांनंतर याज्ञिकांनी एक दिवस सिकंदराबादमधील त्यांच्या शेजारच्या घरात महाजनांचा आवाज ऐकला आणि ते तेथे गेले. मधुकररावांना तेथे पाहून त्यांना खूपच आनंद झाला. आपले नाव सांगताच तात्यांनी नागपूरच्या कबड्डीच्या या खेळाडूला लगेच ओळखले, तेव्हा याज्ञिक चकित झाले. महाजनांचा घनगंभीर आवाज आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व त्यांना नेहमीच प्रेरणादायी वाटत असे. पण, महाजनांनी आपल्याला ओळखले याचे त्यांना आजही कौतुक वाटते. दुसऱ्याची काळजी घेणारे तात्या कितीही शारीरिक वेदना सहन करू शकत होते. “१९५०च्या पुणे संघ शिक्षा वर्गात खेळताना माझ्या काठीचा जोराचा मार सहन करून, शांत राहून, शाखा संपल्यानंतर मधुकरराव रुग्णालयात दाखल झाले. त्यांची सहनशक्ती विलक्षण होती,” असे माजी आमदार वामनराव परब यांनी एका आठवणीत लिहिले आहे.
 
शिस्त आणि संघटनकार्य
आर्य समाजाचे कार्यकर्ते रावळभाई यांची कल्याणचे संघचालक म्हणून डॉक्टरांनी ओळख करून दिली, त्याच दिवशी प्रार्थनेच्या वेळी रावळभाई प्रणाम स्थितीत उभे राहिले नाहीत, हे पाहून हे तरुण स्वयंसेवक खूपच अस्वस्थ झाले आहेत हे लक्षात घेऊन, शाखा संपल्यावर डॉक्टरांनी या मुलांना सांगितले की “संघात शिस्त असते. पण, जबरदस्ती मात्र आपण कोणावर करू शकत नाही. आपल्या नवीन संघचालकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट शिस्त म्हणून स्वयंसेवकांनी मात्र जरूर पाळली पाहिजे. पुढे एक दिवस आपली लहानशी इच्छा तेही आपण होऊन मानतील.” खरोखरच, १०-१५ दिवसांनंतर रावळभाई प्रणाम करून प्रार्थना म्हणू लागले. हा प्रसंग वाचत असताना तात्यांच्या चित्रदर्शी लेखनशैलीचा प्रत्यय येतो. डॉक्टर आपला फोटो कधीही काढून देत नाहीत, हे मुलांना माहीत असूनही एक दिवस तात्यांनी डॉक्टरांना फोटो काढण्यासंबंधी विचारले. डॉक्टरांनी प्रथम नकार दिला. पण, मुलांचा हट्ट पाहून फोटोला मान्यता दिली. धोतर-शर्ट आणि हातात आडवी धरलेली सैनिकी छडी, अशा वेशातील डॉक्टरांचा तो दुर्मीळ फोटो आजही उपलब्ध आहे. त्याच वेळी प्रसिद्धीपराङमुखतेचे धोरण संघवाढीच्या दृष्टीने किती योग्य आहे, हेही डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. माणसे जोडणे हे आपले मुख्य कार्य आहे म्हणून आपल्या धोरणाला किंचित मुरडणे डॉक्टर योग्य मानीत असत. संघात जाणाऱ्या स्वयंसेवकांनी हे माणसे जोडण्याचे व्रत घेतले म्हणूनच एका व्यक्तीने सुरू केलेला हा संघ परिवार आज ९५ वर्षांपासून उत्तरोत्तर अधिकच विस्तारत आहे आणि समाजात त्यांनी स्वतःची ओळखही तयार केली आहे.
 
शर्टची कॉलर पोलो कॉलरप्रमाणे ताठ ठेवणे, हे संघाच्या गणवेशाच्या शिस्तीत बसत नव्हते, हे सांगूनही यशवंत विद्वांस यांनी कॉलर दुमडली नाही, तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्याने यशवंतला संघातून काढून टाकले. तात्यांना ही गोष्ट योग्य वाटली नाही आणि त्यांनी धीर करून डॉक्टरांच्या कानावर हा प्रसंग घातला. डॉक्टरांनी यशवंतला त्याच्या पद्धतीने कॉलर ताठ ठेवून संघात येण्यास परवानगी दिली. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, “शिस्त हवीच; पण आपण माणसे जोडावयास निघालो आहोत, माणसे तोडणारी शिस्त आपल्याला कशी चालणार. संघात एकदा आलेला स्वयंसेवक संघाबाहेर घालवून द्यायचा अधिकार कोणालाही नाही, अगदी सरसंघचालकांनाही नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणालाही न दुखावता आपला मुद्दा नेमकेपणे सांगण्याचे कसब डॉक्टरांकडे होते. संघाची शिस्त आणि सर्व सर्वसमावेशकता याबद्दल तात्यांच्या कल्पना म्हणूनच अगदी स्पष्ट होत्या.
 
सत्याग्रह आणि संघ
मुसलमानांच्या तक्रारीवरून ब्रिटिश सरकारने हिंदूंच्या देवळातील घंटानादावर निर्बंध घातले होते, म्हणून मे १९३७ मध्ये पुण्याला २१ दिवस सोन्या मारुती सत्याग्रह चालू होता. सक्षम समाज निर्माण करणे हेच संघाचे ध्येय असून, तात्पुरती उपाययोजना म्हणून सत्याग्रहाचा मार्ग मानून डॉक्टरांनी सत्याग्रहात भाग घेतला. पुस्तकातील या आठवणीप्रमाणेच, १९४६ मध्ये मा. आप्पाजी जोशी यांच्या बौद्धिकच्या तात्यांनी काढलेल्या टिपणांमध्ये डॉक्टर व आप्पाजींनी १९३० मध्ये केलेल्या सत्याग्रहाची माहिती मिळते.
 
राष्ट्राच्या कल्याणार्थ
३० एप्रिल, १९३८ रोजी हिंदू युवक परिषदेमध्ये झालेल्या डॉक्टरांच्या भाषणाचे व मिरवणुकीचेही वर्णन करून, डॉक्टरांची कर्तृत्वशक्ती सकृतदर्शनी न जाणविणारी; परंतु प्रचंड होती, असे सांगताना डॉक्टरांच्या वक्तृत्वशैलीचेही वेगळेपण ‘केशवायनम:’ मध्ये नोंदविले आहे. ‘राष्ट्र व समाज यांच्याशी जो तन्मय होतो तोच खरा राष्ट्रसेवक असतो,’ हे डॉक्टरांचे बोल तात्यांनी आयुष्यभर मनात रुजवले आणि आम्हालाही त्यांनी हेच सांगितले.
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या २९ नोव्हेंबर, २०२० अंकातील लेख वाचून, ‘या अलौकिक तपस्वी कार्यकर्त्या नेत्याचा जीवनाला स्पर्श झाला होता.’ असे नमूद करून शिरूर येथील सुधाकर पोटे कळवतात, १९७८ मध्ये रामभाऊ म्हाळगी यांच्या घरी अपरिचित मधुकरारावांशी अचानक झालेल्या १५ मिनिटांच्या भेटीत, त्यांनी सर्वव्यापी संपर्क आणि प्रभाव कसा निर्माण करावा याचा कानमंत्र दिला. भजनी मंडळे व अन्य सांप्रदायिक यांच्याशी संपर्क ठेवून संघगीतांबरोबर संतांचे १०-१२ अभंग, पसायदान व हरिपाठ हवे, असे सांगितले. त्यांनी सुचवलेल्या अन्य गोष्टीही लक्षात ठेवल्यानंतर २२ गावांत नित्य शाखा आणि दहा गावांत नियमित संपर्क वाढला. तात्या बापट यांना महाजन भेटीबद्दल सांगितल्यावर ते म्हणाले, “फार मोठ्या कार्यकर्त्याचा तुला आशीर्वाद मिळाला आहे.”
 
मधुकररावांसारखे अनेक निष्ठावान स्वयंसेवक आणि कुशल संघटक आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत भारताच्या अस्मितेसाठी, विकासासाठी, स्वजनांच्या उत्थानासाठी निरंतर झटत आहेत. द्रष्ट्या आणि प्रेरणादायी संघसंस्थापक महानायकाला, त्यांचे माघारी देशभक्तीचे विचार रुजविणाऱ्या संघटनेला आणि कार्यकर्त्यांना शतशः प्रणाम! केशवायनम:!!
 
- डॉ. विद्या देवधर
@@AUTHORINFO_V1@@