भगवान बिरसा मुंडा : भाग-३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

Bhagwan Birsa Munda_1&nbs
 
 
 
आपला भारत देश म्हणजे महापुरुषांची खाण! ‘सूर्य वंश’, ‘चंद्र वंश’, ‘नाग वंश’ अशा अनेक पराक्रमी वंशांची परंपरा सांगणारे वीर जसे या देशात जन्माला आले, तसेच सर्वसामान्य घरात जन्माला येऊन प्रेरक जीवन जगणारे असंख्य स्त्री-पुरुषदेखील आले. त्यांच्या जीवनकथा आपल्या समोर आणत आहोत ‘आमचा देश, आमच्या प्रेरणा’ या कथामालिकेच्या माध्यमातून. प्रत्येक रविवारी एकेक कथा आपल्या समोर सादर करणार आहेत नरेंद्र पेंडसे. भगवान बिरसा मुंडा, वीरेंद्र सायसारखे अपरिचित जनजाती वीर, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, लाचित बडफुकन अशा वीरांचे जीवन कथाकथनातून मांडणे हा त्यांचा छंद आहे आणि त्यातूनच या कथामालिकेची निर्मिती झाली आहे. २६ डिसेंबर या दिवशी जनजाती समाजात कार्य करणाऱ्या आपल्या ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेचा वर्धापन दिन असतो. या निमित्ताने चार रविवारी जनजाती समाजातील प्रेरक महापुरुषांच्या कथा आपल्यासमोर सादर करीत आहोत. त्याचाच हा तिसरा भाग...
 
भारतातील जनजाती समाजाची सर्वाधिक वस्ती असलेले क्षेत्र आहे मध्य भारत. येथील छत्तीसगढ, बिहार, झारखंड, ओडिशा अशा मोठ्या क्षेत्रात राहणारी एक महत्त्वाची जनजाती आहे मुंडा जनजाती. मुंडारी नावाने ओळखली जाणारी भाषा ते बोलतात. मुंडारी, करम, सुसून असे विविध नाच ते करतात. त्यांच्या उपासना पद्धतीला सरना असे नाव असल्याने आणि प्रमुख दैवताचे नाव सिंगबोन्गा असल्याने हा वेगळा धर्म असल्याची समजूत होते. परंतु, थोडे खोलात गेल्यावर लक्षात येते की, सिंगबोन्गा म्हणजे सूर्यदेव! सूर्यदेवाची पूजा करणारा त्यांचा धर्म कोणता? अर्थातच हिंदू धर्म. विविध पक्षी, वस्तू, प्राणी यांच्या नावाने विविध कुळे मुंडा समाजात असतात. मासे, भात, मीठ, हंस, चिंच, कावळा यांच्या मुंडारी भाषेतील शब्दांनी ही कुळे ओळखली जातात. समाजातील विधवांचा प्रश्न पुनर्विवाह करून सोडविण्याची प्रगत परंपरा या समाजात आहे. इंग्रजांशी सतत लढत राहिलेल्या अनेक जनजातींपैकी एक महत्त्वाची अशी ही जनजाती आहे. १८५७च्या स्वातंत्र्य समरानंतर अन्य ठिकाणी संघर्ष कमी झाला. मात्र, मुंडा समाजाच्या छोटा नागपूर क्षेत्रात मात्र संघर्ष सुरूच राहिला.
 
 
‘सरदारी लढाई’ नावाने गाजलेल्या या संघर्षाने इंग्रज शासन अस्थिर केले होते. परंतु, ते पूर्ण यशस्वी मात्र झाले नाहीत. याच लढाईतील काही नेते एकदा चाईबासा येथील जर्मन मिशनच्या शाळेत गेले. तेथील पाद्री हेच मुख्याध्यापकही होते. इंग्रजांविरुद्ध लढाईत त्यांची मदत मिळवावी, असा त्यांचा हेतू होता. पाद्रीशी बोलताना भाषेची अडचण येऊ नये म्हणून तिथे शिकणाऱ्या डेव्हिड नावाच्या मुलाला त्यांनी सोबत घेतले. हा डेव्हिड कोण होता?
 
 
उलिहातू गावाच्या सुगना आणि करमी या मुंडा दाम्पत्याचा मुलगा. मग त्याचे नाव डेव्हिड कसे काय? जेव्हा त्याचे आई-वडील त्याला शाळेत प्रवेश घ्यायला आले, तेव्हा पाद्रीने सर्वांचे धर्मांतर करून त्याला हे नाव दिले होते, त्याचे खरे नाव होते बिरसा. सर्व जण पाद्रीकडे गेले तेव्हा, त्याची प्रतिक्रिया बघून सर्वांना धक्का बसला. तो स्वतः जर्मन असला तरी त्याने इंग्रजांची बाजू घेतली. त्याने बिरसाचीही कानउघाडणी केली. मुंडा लोक कसे चोर आहेत, यांच्याबद्दल तो अपमानकारक बोलू लागताच बिरसा खवळला. इंग्रज कसे आक्रमक आहेत, आमचा देश त्यांनी कसा लुटला, आमचा धर्म कसा हिरावला, याबद्दल तो बोलू लागला. पाद्रीने त्याला पकड याचा आदेश दिला आणि बिरसा पळून गेला. त्याने पांडे नावाच्या वीणकराकडे नोकरी पत्करली. पांडेने त्याला वीणकामासोबतच आयुर्वेद आणि रामायणाचे शिक्षण दिले. रामाच्या चरित्राचे अध्ययन केल्यावर त्याला असे वाटू लागले की, आपण समाजाची सेवा केली पाहिजे. नोकरी सोडून तो गावी परत आला. त्याच्या हातच्या औषधांचा गुण, इंग्रज सरकारविरोध आणि रामाचा आदर्श यामुळे त्याची ख्याती पसरू लागली आणि पाद्री लोकांचे यश अपयशात बदलू लागले. त्यांनी तक्रारी करून बिरसाला अटक करायला लावली.
 
 
रांचीच्या तुरुंगात त्याला ठेवण्यात आले. इंग्रजांचे बळ त्याच्या लक्षात आले. ‘टोपी टोपी एक हैं’ म्हणजेच शाळा चालविणारे, धर्मांतर करणारे पाद्री आणि अत्याचारी राज्य करणारे अधिकारी, आतून एकमेकांना सामील आहेत हे त्यांच्या लक्षात आले. याविरुद्ध सामोपचाराने यश येणार नाही, सशस्त्र संघर्ष करावा लागेल असा निष्कर्ष त्यांनी काढला. वरवर चांगले वर्तन ठेवून त्यांनी सुटका करून घेतली. गावी येऊन पुन्हा आयुर्वेदाच्या माध्यमातून सेवा सुरू केली. समाज संघटित करण्यासाठी जगण्याचे नियम ठरवून एक नवा पंथ सुरू केला. जगन्नाथावर श्रद्धा ठेवून चंदन लावणारा, तुळशीला पूज्य मानणारा हा पंथ होता. या पंथाचे अनुयायी सर्वदूर निर्माण झाले. ते या पंथाला ‘बिरसायत’ आणि भगवान बिरसाला ‘धरती का आबा’ म्हणू लागले. आता भगवान बिरसाने सशस्त्र लढाईचा मंत्र सर्वांना दिला. शस्त्रे जमवणे सुरू झाले, ‘सरदारी लढाई’तील उरलेले नेते त्यांना येऊन मिळाले. ‘अबुआ दिशुं अबुआ राज’ म्हणजे ‘आमचा देश, आमचे राज्य’ अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या उठावाचे नाव होते उलगुलान!
 
 
छोटा नागपूर क्षेत्रातील इंग्रज ठाणी उद्ध्वस्त करण्यात आली. हे सर्व क्षेत्र १८९७ ते १९०० अशी तीन वर्षे इंग्रजी अमलापासून मुक्त राहिले. डुंबारी या पहाडीवर पुढील नियोजनासाठी एक मोठा मेळावा भगवान बिरसांनी बोलावला होता, ज्याला त्यांचे सुमारे पाच हजार सैनिक आले होते. भारताचे दुर्दैव म्हणजे फितुरी, ती इथेसुद्धा आड आली आणि इंग्रजांनी पहाडीला वेढा दिला. हवेत मारलेल्या गोळ्यांनी सुरुवात झाली. परंतु, मुंडा सेना शरण आली नाही. तीर-कमान घेऊन लढणाऱ्या सैनिकांना इंग्रजांनी गोळ्या घालून ठार केले आणि डुंबारी पहाडीवरून देशभक्तांच्या रक्ताचे ओहळ खाली येऊ लागले. भगवान बिरसांच्या सहकाऱ्यांनी त्यांना या वेढ्यातून कसेबसे बाहेर काढले. त्यांच्या पाठलागावर इंग्रज होतेच. विश्रांतीसाठी ते एका घरात थांबले असता त्यांना पकडण्यात इंग्रजांना यश आले. हातात बेड्या घालून चालत त्यांना रांचीला नेण्यात आले. तुरुंगात विष देऊन त्यांना मारण्यात आले आणि कोणालाही समजू न देता सुवर्णरेखा नदीच्या तीरावर त्यांच्या पवित्र देहाला अग्निदेवतेच्या स्वाधीन करण्यात आले. इतकी गुप्तता पाळली तरी भगवान बिरसांच्या बलिदानाचे वृत्त सर्वत्र पसरले. त्यांनी स्वतःला मिळालेल्या १८७५ ते १९०० या केवळ २५ वर्षांच्या संघर्षमय जीवनातून दिलेली प्रेरणा छोटा नागपूरला स्वातंत्र्य मिळेपर्यंत पुढची ५० वर्षे पुरली. हे क्षेत्र इंग्रजांशी सतत लढा देत राहिले. हे जीवन आजही आपल्याला समाजासाठी जगण्याची, लढण्याची, मारण्याची आणि मरण्याची प्रेरणा देत आहे.
 
 
- नरेंद्र पेंडसे
@@AUTHORINFO_V1@@