‘मंजिरीयन्स’ना घडविणारी नृत्यालंकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

Vaishali Dudhe _1 &n
 
 
 
“संगीत तो बहुत गहिरी चीज हैं, अभी तो हम कुछ ऊपर-ऊपर के चीजें हाथों मे ले चुके हैं, अभी तो असली मोती ढूंढने बाकी है” भारतीय संस्कृतीतील संगीत परंपरांविषयी ही भावना ठेवणार्‍या नृत्यालंकार वैशाली दुधे यांच्याविषयी...
 
 
 
 
वैशाली यांचे बालपण ठाण्यात गेले. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण सुरू केले. गेली ४०वर्षे त्या कथ्थकची अथक साधना करीत आहेत. नृत्यालंकार डॉ. मंजिरी देव यांच्या त्या ज्येष्ठ शिष्या आहेत. ‘गणेश नृत्यकला मंदिरा’तून सर्वप्रथम त्यांनी नृत्यविशारद पदवी प्राप्त करण्याचा सन्मान मिळविला. वाणिज्य शाखेतील पदवी घेत असतानाच १९८९ साली ‘नृत्यालंकार’ प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्या. संसाराच्या जबाबदारीमुळे त्यांचे शिक्षण थांबले.
 
 
नृत्यकलेतील अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांनी २०१२ मध्ये पूर्ण केले. ‘नृत्यालंकार’ या पदवीत प्रथम श्रेणीत यश संपादन केले. त्यांनी कवी कुलगुरू कलिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथून ‘नृत्य’ विषयात रौप्य पदकासहित एम.ए. पदवी प्राप्त केली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई येथून संगीताचार्य अंतर्गत कथ्थक नृत्यशैलीमधील बोल रचनांमध्ये ‘तिहाई’चे महत्त्व आणि वैविध्य या विषयात प्रबंध लेखन केले. यावर त्यांना पीएच.डी मिळाली आहे. सरकारी अधिकार्‍यांच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण सरकारी नोकरी असावी, अशा पद्धतीचे होते.
 
घरातील मंडळींच्या आग्रहाखातर त्यांनी पदवीनंतर काही परीक्षा दिल्या. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नेव्ही विभागातून कामाला सुरूवात केली. कला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या सातव्या वर्षी सुरू झालेला नृत्यकलेचा त्यांचा प्रवास आजतागायत अथकपणे सुरू आहे. नोकरीत फारसे मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकून ९ ऑगस्ट १९९०रोजी डोंबिवली शहरातील प्रथम कथ्थक प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. ‘मंजिरी नृत्यकला मंदिर’ या नावाने ही संस्था आज हजारो विद्यार्थी घडवित आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपली कला परदेशातही पोहोचविण्याचे काम केले जात आहे.
 
संस्थेतील अनेक विद्यार्थिनी ‘नृत्यविशारद’ तसेच ‘नृत्यालंकार’ असून सुमारे १२ विद्यार्थिनींच्या देश-विदेशात विविध शहरांमध्ये कथ्थक प्रशिक्षण संस्था आहेत. ‘मंजिरी नृत्यकला मंदिर’ संस्थेतील विद्यार्थिनी ‘मंजिरीयन्स’ म्हणून ओळखल्या जातात. वैशाली आणि त्यांच्या विद्यार्थिनी अनेक ठिकाणी कथ्थक नृत्याचे कार्यक्रम करीत असतात. संस्थेच्या विद्यार्थिनींना हिंदी, मराठी चित्रपटामधून तसेच चित्रपट पुरस्कार सोहळ्यामधून कथ्थक नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. कथ्थक नृत्याचा प्रसार करण्यासाठी संस्था वेळोवेळी कथ्थक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत असते.
 
 
कल्याण-डोंबिवली ते अगदी कर्जतपर्यंत उगवत्या कथ्थक नृत्यांगनांसाठी संस्थेचे विविध उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. ‘मंजिरी नृत्यकला मंदिर’रूपी रोपट्याची पाळेमुळे खोलवर रूजली असून या वृक्षाच्या फांद्या दूरवर विस्तारत आहेत. संस्थेमधून नृत्यप्रशिक्षण घेतलेल्या सुनीला पोतदार, श्रद्धा भिडे, अमृता साळवी, प्रिया जळगावकर, अश्विनी शिरवळकर, ऋतुजा करमरकर, पूजा भणगे, अदिती भट, क्षमा कुलकर्णी, सुजाता जोशी, सुगंधा कुळकर्णी, मनाली कुलकर्णी, मयुरा खटावकर, स्वरदा पै, राजश्री साठे, लीना जामसंडेकर या विद्यार्थिनी आपल्या स्वत:च्या नृत्यसंस्थेच्या माध्यमातून कथ्थक नृत्यशिक्षणाचा गुरूवर्या डॉ. मंजिरी देव आणि आपल्या गुरू वैशाली दुधे यांचा नृत्यवारसा जतन करीत कथ्थक नृत्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत.
 
 
वैशाली यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे. ‘अष्टनायिका’, ‘पदन्यास’, ‘पोहोपाजुरी’ या कथ्थक अभ्यासकांसाठी उपयुक्त ध्वनिमुद्रिकांचे निर्मिती दिग्दर्शन केले आहे. कथ्थक नृत्यातील गतनिकास, तिहाई, अर्ध्या मात्रेची किमया, अष्टनायिका अशा विविध विषयांवरील कार्यशाळांमधून त्या मार्गदर्शन करीत असतात. ‘कथ्थक नृत्याचा इतिहास’, ‘ताल के दस प्राण’ अशा अनेक संगीत विषयांवरील व्याख्यानांमधून त्यांनी भारतीय संगीतविषयक शास्त्राचा परिचय रसिकांना करून दिला आहे. नवोदित कलाकारांना उत्तेजन मिळावे, तसेच कथ्थक शिकणार्‍या विद्यार्थिनींना उत्तम कथ्थक नृत्याचे कार्यक्रम पाहता यावेत, या हेतूने त्या ‘मंजिरी नृत्यकला मंदिर’ या संस्थेतर्फे डोंबिवली शहरात ‘अथक कथ्थक’ या त्रैमासिक नृत्यशृंखलेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना संगीतशास्त्राचे उत्तम आकलन व्हावे, म्हणून त्यांनी मासिक सांगीतिक व्याख्यानमाला सुरू केली आहे.
 
 
वैशाली या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षक असून ‘आदर्श डोंबिवलीकर’, ‘जिजाऊ पुरस्कार’, ‘आदर्श शिक्षिका’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘मराठा तितुका मेळावावा’ या धरतीवर ‘कथक प्रेमी तितुका मेळावा’ असा विश्वास मनाशी बाळगत ‘मंजिरी नृत्यकला मंदिर’ आपल्या परिसरातील सर्व कथ्थक शिक्षण संस्थांना एकत्र आणण्यात नेहमीच प्रयत्नशील असतात. एखादा कार्यक्रम असो किंवा गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी संस्थेची जागा उपलब्ध करून देणे असो, या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘मंजिरी नृत्यकला मंदिर’ करीत असते.
 
 
‘मंजिरी नृत्यकला मंदिरा’च्या या प्रयत्नांना कथ्थक नृत्यांगनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. कथ्थक शिकविताना विद्यार्थिनींना संपूर्ण इतिहास शिकविला जातो. आपल्या इतिहासाचे धडे विद्यार्थिनींसोबत त्यांच्या पालकांनाही समजतात. संगीतातून विविधांगी अभ्यास होत असतो. व्यक्तिमत्त्व विकासाचे शिक्षण मिळते. संगीत हे गणिताशी निगडित आहे. त्यामुळे बंदिश कशा बसावाव्यात, यासाठी गणिताचा अभ्यास करावा लागतो. साहित्याचे तत्त्वज्ञानही त्यातून मिळते. नृत्य मूककला असल्याने अंगी अभिनयातून एका शब्दांचे दहा अर्थ सांगावे लागतात. आयुष्याच्या सर्व अंगांना ही कला स्पर्श करते. कितीही आक्रमणे आली तरी भारतीय संगीत टिकून आहे. शास्त्रीय नृत्याला पर्याय नाही. अनेक लाटा येतात. पण विरून जातात. हे संगीत म्हणजे अथांग सागर आहे. ते कायम टिकून राहणार असल्याचे दुधे यांनी सांगितले.
 

- जान्हवी मोर्ये 
 
 
@@AUTHORINFO_V1@@