ठाण मांडलेल्या पालिका अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी

    26-Dec-2020
Total Views |

bmc_1  H x W: 0


मुंबईच्या पालकमंत्र्यांनीच आयुक्तांकडे केली मागणी



मुंबई: वर्षानुवर्षे एकाच खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करा, अशी मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आयुक्त काय भूमिका घेतात, अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात की त्यांची उचलबांगडी करतात याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जगभरात ओळख आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत नोकरी करणाऱ्यांची वेगळीच शान आहे. मात्र काही अधिकारी आजही वर्षानुवर्षे एकाच खुर्चीत ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे त्यांचा कारभार मनमानी पद्धतीने चालला असल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महापालिका ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून काही अधिकाऱ्यांच्या नजरेतून पाहिले जाते. आपले हितसंबंध जपत अर्थपूर्ण राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुंबई महापालिकेत बोलबाला आहे. मुंबई महापालिकेत ठराविक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना महानगरपालिकेतील पदाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचे चित्र मुंबई महानगरपालिकेत सर्रास पहायला मिळते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची एक प्रकारे हकालपट्टीच करा, अशी मागणी शेख यांनी केली आहे.


कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करीत असल्याने अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने व काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करावी आणि ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करावी, अशी मागणीही शेख यांनी या पत्रात केली आहे.