आर्य आक्रमण : काही महनीय व्यक्तींचे अभिमत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2020
Total Views |

Aarya Samaj_1  
 
 
 
आर्यांचे आक्रमण अथवा स्थलांतर, या विषयात आतापर्यंत आपण विविध मतप्रवाह आणि त्यात केल्या जाणाऱ्या उलटसुलट मांडणीचा विविध भौतिक पुरावे, शास्त्रीय कसोट्या, सबळ तर्क इत्यादी सामग्रीच्या आधारे तपशीलवार आढावा घेतला. ही सर्व संशोधने अनेक इतिहास अभ्यासक, पुरातत्त्वविद, शास्त्रज्ञ, संशोधक वगैरे लोकांनी केलेली आहेत. ही सर्व मंडळी त्यांच्या त्यांच्या ज्ञानशाखेत वर्षानुवर्षे सखोल अभ्यास करणारे नामवंत लोक आहेत. परंतु, यांच्याखेरीज अनेक नामवंत लोक असेही आहेत, जे प्रचलित दृष्टीने इतिहासकार (Historians), इतिहासाचे संशोधक, पुरातत्त्वविद (Archaeologists), प्राच्यविद्या अभ्यासक (Indologists) वगैरे नाहीत. पण, तरीही त्यांनी या विषयात भरपूर वाचन, चिंतन करून आपले अभिमत बनविले आहे, ते आवश्यक तिथे व्यक्तही केले आहे. अशांपैकी काही निवडक अभिमतांचा एक आढावा या लेखात घेऊया.
 
 
हनुमान प्रसाद पोद्दार
 
 
 
गोरखपूर येथील गीताप्रेसच्या संस्थापकांपैकी एक स्व. हनुमान प्रसाद पोद्दार हे स्व. लोकमान्य टिळकांचे मित्र. त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा चालत. लोकमान्यांच्या निधनाच्या काही काळ आधी ‘आर्यांचे उत्तर ध्रुवीय प्रदेशातले मूलस्थान’ या टिळकांच्या मतावर या दोघांची चर्चा झाली होती. त्याची आठवण देताना हनुमान प्रसादजी म्हणतात, “आर्यों के आदिनिवास के विषय में तिलक महाराजने पुन: एक पुस्तक तैयार की थी, जिसमें उन्होनें अपनी ही पुरानी मान्यताओं का खंडन किया था। उनकी नई मान्यता के अनुसार आर्य भारतवर्ष के ही थे। इस पुस्तक की पांडुलिपी मैंने देखी थी। परंतु, उसे प्रेस में छापने के लिए देने से पहले ही तिलक महाराज का देहान्त हो गया। इसके पश्चात उस पुस्तक की पांडुलिपी का क्या हुआ, कुछ पता नहीं चला। मैंने उनके उत्तराधिकारियों से उस संबंध में पूछताछ की, किंतु कोई समाधान न हो सका।” (भाईजी उर्फ हनुमान प्रसादजी पोद्दार : पावन स्मरण, जीवन यात्रा. लेखक भगवती प्रसाद सिंह, ‘राष्ट्रधर्म’ मासिक, नोव्हेंबर १९९२)
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या Who were the Shudras? या इंग्रजी पुस्तकात आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत अतिशय स्पष्टपणे नाकारलेला आहे. या पुस्तकाचे बहुतेक सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. (मराठी : शूद्र पूर्वी कोण होते, हिंदी : शूद्रों की खोज, इत्यादी) त्यात डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या मतांचे सार थोडक्यात असे : वेदांच्या अभ्यासातून ‘आर्य’ हे एखाद्या जातीचे किंवा वंशाचे नाव होते, हे सिद्ध होत नाही. आर्य बाहेरून आल्याचे सिद्ध करू शकेल, असा एकही उल्लेख ऋग्वेदात नाही. उलट ते भारताचेच रहिवासी असल्याचे त्यातून लक्षात येते. वेदात सात नद्यांची वर्णने आहेत. त्यात ‘माझी गंगा’, ‘माझी यमुना’, माझी सरस्वती’, असे शब्दप्रयोग आहेत. आर्य जर बाहेरून आलेले असते, तर असे म्हणाले नसते. वेदावरून असे कुठेही सिद्ध होत नाही की, आर्यांनी बाहेरून येऊन दास अथवा दस्युंवर विजय मिळवला. ‘आर्य’, ‘दास’, ‘दस्यु’ हे वेगवेगळ्या जातींचे होते, असे सिद्ध करणारा एकही पुरावा वेदांत नाही. आर्यांचा रंग दास किंवा दस्युंपेक्षा वेगळा होता, असे सिद्ध करणारा एकही पुरावा वेदांत नाही.
 
स्वामी विवेकानंद
 
स्वामी विवेकानंदांनी विविध भाषणांमध्ये आणि पत्रलेखनातून या सिद्धांताचा खरपूस समाचार घेतलेला आहे. त्यातले एक प्रमुख मत इथे पाहूया : आर्य कुठल्यातरी परदेशातून वावटळीसारखे आले, त्यांनी वनवासींचा प्रदेश जिंकला आणि त्यांचा नाश करून ते भारतात राहिले, असे जे तुमचे पाश्चिमात्य पंडित म्हणतात, ती म्हणजे त्यांची मूर्खपणाची निरर्थक बडबड आहे! आमचे भारतीय विद्वानही त्याला ‘तथास्तु’ म्हणतात, हे खरोखर अत्यंत वाईट आहे! मी स्वत: अज्ञानी आहे, कुठल्याही विद्वत्तेचा दावा मी करीत नाही. परंतु, मला जे समजले, त्यानुसार मी पॅरिसच्या काँग्रेसमध्ये या मतांचा कडाडून विरोध केला. मी या विषयावर भारतीय आणि युरोपियन विद्वानांशी चर्चा करीत आहेच आणि वेळ मिळाल्यास या सिद्धांताला अनेक आक्षेप घेणार आहे आणि मी तुम्हाला आणि आमच्या पंडितांना असे सांगतो की, तुम्ही विद्वान मंडळी आहात, तुमचे प्राचीन ग्रंथ आणि धर्मग्रंथ धुंडाळा आणि कृपया तुम्हीच तुमचे निष्कर्ष काढा. जेथे जेथे युरोपियनांना संधी मिळते, तेथे तेथे ते वनवासींचा नायनाट करून त्यांच्या भूप्रदेशावर आरामात राहू लागतात आणि यावरून ते असा निष्कर्ष काढतात की, आर्यांनीही असेच केले असावे! पण याला पुरावा कोणता? केवळ तर्क? मग तुमच्या या विचित्र कल्पना तुमच्यापाशीच ठेवा! आर्य परदेशातून भारतात आले असे कोणत्या वेदात, कोणत्या सूक्तात म्हटलेले आढळते? त्यांनी जंगली वनवासींची कत्तल केली, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? अशा मूर्ख बडबडीने तुम्ही काय मिळवता? 
(The East And The West, Chapter VII : Progress of Civilisation-Swami Vivekananda)
 
इतर काही मान्यवर
 
Aryan is not a member of a particular race, but a person who accepted a particular type of self-culture, of inward and outward practice, of ideality, of aspiration (Renaissance in India : Sri Aurobindo)
 
ब्रह्मावर्त अथवा ब्रह्मर्षी देश, हीच आर्यांची मूळ भूमी आहे (महामहोपाध्याय गंगानाथ झा : D. R. Bhandarkar Commemorative Volume).
 
There is no evidence of the Aryans having come from outside in any of our text or literature. If the Aryans had indeed come from outside, a historical event of such great significance would have been recorded somewhere in our history (Swami Dayanand Saraswati).
 
Seeing the great dichotomy of spiritualism of India and Materialism of Europe, it is clear that Aryans were indigenous to India, but that they were also the progenitors of the European civilization (Annie Besant, Theosophical Society)
 
 
 
तात्पर्य
 
 
वाचकहो, वर दिलेली काही मान्यवरांची अभिमते फक्त उदाहरणार्थ म्हणून आहेत. याच्याशिवाय इतरही अनेक लेखक, प्राध्यापक, विचारवंत, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, लोकप्रतिनिधी, कलावंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रसंगी विविध निमित्ताने या बिनबुडाच्या सिद्धांताचे वाभाडे काढलेले आहेत. हे सर्व जण काही कुणी प्राच्यविद्या पंडित किंवा इतिहासकार नाहीत, तर पूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीवर काम करणारे असे सामान्य लोक आहेत. समाजाच्या सर्वच थरांमधील लोक आज या भ्रामक सिद्धांतातला फोलपणा जाणतात. परंतु, काही मूठभर लोकांना मात्र हे सर्व माहीत असूनही त्यातले तथ्य नाकारायचे आहे. कारण उघड आहे-या समाजकंटकांचे काही निहित स्वार्थ (vested interests) त्यांना अशा लंगड्या सिद्धांताचा आधार घ्यायला भाग पाडतात. त्यामुळे अशा पद्धतीने गायीचे कातडे पांघरूण वासरात शिरलेल्या या लांडग्यांना ओळखायला आपण शिकले पाहिजे, त्यांचा फुटीरतावाद जागीच ठेचला पाहिजे. त्यासाठीच या लेखमालेचा खटाटोप आहे.
(क्रमश:)
 
- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@