तेव्हा रेल्वेतील सुरक्षा रक्षक कुठे होते ? : चित्रा वाघ

    25-Dec-2020
Total Views |

chitra wagh_1  



नवी मुंबई :
वाशी रेल्वे पुलाजवळ एक तरुणीला रेल्वेतून खाली फेकून देण्याची घटना दि.२२ डिसेंबर, २०२० रोजी उघड झाली. यात पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जबर मारहाण केल्याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला.पीडित महिला वाशी खाडी पुलावरील रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत आढळून आली. मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक यांनी रेल्वे स्थानकापासून अडीच किमी अंतरावर वाशी खाडी पुलावरील रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या महिलेबाबत रेल्वे पोलिसांना कळवले. ही माहिती मिळताच जीआरपीचे कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेला उपचारासाठी वाशी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी पीडित महिलेच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा असल्याचं दिसून आले. यानंतर तरुणीला जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले असल्याचे कळते आहे.


जर महिला डब्यात सुरक्षा रक्षक असतात तर मग ही घटना घडली तेव्हा सुरक्षा रक्षक कुठे होते ? : चित्रा वाघ


याआधी जेव्हा अशा घटना रेल्वेमध्ये घडल्या तेव्हा जीआरपी आणि सीआरपीएफमार्फत सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यावेळेला अशा काही घटना घडतात तेव्हा नियम ठरविले जातात. त्याच्यावर चर्चा होते मात्र या नियमांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मग हे तपासण्याची जबाबदारी कोणाची ?आणि जर महिला डब्यात पोलीस असतात तर मग ही घटना घडली तेव्हा पोलीस कुठे होते ? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना उपस्थित केला.


प्रत्येक महिला डब्यात सुरक्षा रक्षक असतात : वाशी रेल्वे पोलीस


वाशी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक महिला डब्यात सुरक्षा रक्षक असतात, मात्र रात्रीच्यावेळी केवळ रेल्वे स्थानकावर सुरक्षा रक्षक असतात महिला डब्यात नसतात असा अनुभव काही महिलानी सांगितले.


"रेल्वे पोलिसांनी पीडित महिलेला वाशी जीआरपी स्थानकात आणले. पीडित महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने तिला प्राथमिक उपचार करुन वाशीतील एनएमएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली आणि उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या. तिला केवळ आपले नाव सांगता आले आणि ती टिटवाळा येथील निवासी आहे" असे टाइम्स ऑफ इंडियाने वाशी जीआरपचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांच्या हवाल्याने म्हटले आहे.





विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल


याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच, पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मदत आणि समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीडित मुलीवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने अद्यापपर्यंत जबाब घेण्यात आला नाही. तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे सेनगावकर यांनी डॉ.गोऱ्हे यांना सांगितले. सेनगावकर व रेल्वे पोलिसांनी यांनी तत्परतेने केलेली कार्यवाही समाधानकारक आहे. त्याचप्रमाणे या घटने संदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले. तसेच पीडित तरुणीला मदत मिळण्याबाबत काही सूचना सेनगावकर यांना दिल्या असन पोलीस महासंचालकांना पत्रही पाठविण्यात आले आहे.

◆ पीडितेला मदत मिळण्याबाबत मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तात्काळ विधी व न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठविण्यात यावा.

◆ आरोपींला शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात यावेत.

◆ पिडीत तरुणीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन होण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी. सदरील पीडितेच्या लढयात शिवसेना महिला आघाडी आणि स्त्री आधार केंद्रच्या कार्यकर्त्या त्यांना न्यायालयीन मदत, सामाजिक स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. उपसभापती कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी डॉ.अर्चना पाटील यांनी देखील घटनेचा तपशील जाणून हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी संवाद साधून डॉ.गोऱ्हे यांच्यावतीने पीडितेच्या तब्येतीची चौकशी केली आहे.