‘वनवासी कल्याण आश्रम’ एका दृष्टिक्षेपात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020
Total Views |

vanvasi 1_1  H
 
 
 
‘उराँव’ जनजातीतील सहा बालकांना शिकवण्यासाठी घेऊन वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची १९५२ मध्ये जशपूरमध्ये स्थापना झाली. दि. २६ डिसेंबर हा ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा स्थापना दिवस आहे. आज जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक आयामातून ‘वनवासी कल्याण आश्रम’ जनजाती समाजापर्यंत पोहोचतो आहे.
 
 
 
जनजाती समाजाला समजून घेऊन, विश्वास देऊन विविध प्रकल्पाच्या माध्यमातून मदतीचा व मार्गदर्शनाचा हात देत त्यांना समाजाच्या विकसित प्रवाहात सामावून घेण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम काम करत आहे. जनजाती समाजाचा सर्वांगीण विकास व संस्कृती परंपरा यांचे रक्षण करणे हा उद्देश समोर ठेऊन त्याचबरोबर जनजाती समाजाला संघटित करण्याचे काम ‘वनवासी कल्याण आश्रम’ करतो आहे. स्वातंत्र्यानंतर अजूनही अनेक आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजनैतिक प्रकारच्या शोषणाला हा समाज बळी पडतो आहे. मध्य प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल हे स्वातंत्र्यानंतर आपल्या जनतेला भेटण्यासाठी प्रवास करत असताना जेव्हा जशपूर भागामध्ये गेले तेव्हा त्यांना शेकडो धर्मांतरित वनवासींनी काळे झेंडे दाखवून व ‘जय येशू’ अशा घोषणा देऊन, ‘शुक्लाजी वापस जाव’ असे फलक दाखविले. या प्रकाराची सरदार वल्लभभाई पटेल यांनी गंभीर दाखल घेतली आणि महात्मा गांधींचे ज्येष्ठ सहकारी ठक्कर बाप्पा यांच्याशी विचार-विनिमय करून यात लक्ष घालून उपाय सुचविण्याची विनंती केली. ठक्कर बाप्पांनी प्रत्यक्ष पाहणी करून रविशंकर शुक्ल यांना सांगितले की, झाल्याप्रकाराचे कारण म्हणजे गेल्या काही दशकांत ब्रिटिशधार्जिण्या मिशनऱ्यांनी वनवासींना दिलेली शिकवण हेच आहे. त्यावर उपाय म्हणजे या भागात राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शासकीय शाळांचे जाळे विणले पाहिजे. त्यासाठी स्वयंसेवी वृत्तीच्या एखाद्या निर्भीड तरुणाची नियुक्ती आवश्यक आहे. ठक्कर बाप्पांचे एक विश्वसनीय सहकारी पी. जी. वणीकर यांनी त्यांना रमाकांत केशव उर्फ बाळासाहेब देशपांडे या तरुणाचे नाव सुचविले. लगेचच मुख्यमंत्र्यांनी ‘रुरल डेव्हलपमेंट’च्या अंतर्गत बाळासाहेब देशपांडे यांची ‘एरिया ऑर्गनायझेशन’ म्हणून नियुक्ती केली. पहिल्या वर्षांतच (१९४९) झंझावाती प्रवास करीत आणि मिशनऱ्यांचा विरोध मोडून काढत त्यांनी १०० पेक्षा जास्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करुन दाखविल्या व ठक्कर बाप्पा यांना थक्क केले.
 
 
 
१९५० मध्ये ठक्कर बाप्पांच्या निधनाने बाळासाहेबांचा मुख्य आधारच नाहीसा झाला. सरकारी नोकरीतील कुरबुरींना कंटाळून बाळासाहेबांनी नोकरीचा राजीनामा दिला व ते रामटेकला जाऊन पूर्वीप्रमाणे वकिली करण्याचा विचार करू लागले. जशपूर सोडण्याच्या विचारात असताना रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांनी बाळासाहेबांंनी जशपूरला राहूनच कुटुंब पोषणासाठी वकिली करावी आणि गेल्या दोन वर्षांतील वनवासी समाजातील कार्यानुभवाचा उपयोग करून तेच कार्य चालू ठेवावे, असे सुचविले. बाळासाहेबांनी ते लगेच मान्य केले. ‘उराँव’ जनजातीतील सहा बालकांना शिकवण्यासाठी घेऊन वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची १९५२ मध्ये जशपूरमध्ये स्थापना केली. दि. २६ डिसेंबर हा ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा स्थापना दिवस आहे. आज जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक आयामातून ‘वनवासी कल्याण आश्रम’ जनजाती समाजापर्यंत पोहोचतो आहे.
 
 
‘वनवासी कल्याण आश्रमा’चे आयाम
 
 
१) शिक्षण : सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. परंतु, आजही जनजाती क्षेत्रात शिक्षणाचे मोठे दुर्भिक्ष पाहावयास मिळत आहे. विद्यालयांची संख्या व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव दिसतो आहे. म्हणून बालवाडी, संस्कार केंद्रे, रात्र शाळा, एकल विद्यालये, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अभ्यासिका, पुस्तकालये इत्यादींच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम ‘वनवासी कल्याण आश्रम’ करत आहे. सध्या देशभरात २,१९८ एकल विद्यालये चालू आहेत.
 
 
२) छात्रावास : ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना ही एका छात्रावासाच्या माध्यमातून झाली. ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या माध्यमातून महाराष्ट्रात १९ ठिकाणी छात्रावास चालवले जातात तर देशभरात २१९ छात्रावास आहेत. यात ४३ मुलींसाठीचे छात्रावास आहेत. नाशिक जिल्ह्यातील गुही व रायगड जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी दोन अनुदानित आश्रम शाळा चालवल्या जातात. या सर्व ठिकाणी १४०० मुले व मुली शिक्षण व संस्कार ग्रहण करत आहेत.
 
 
३) आरोग्य रक्षक योजना: वनवासी क्षेत्रात आजही बऱ्याच भागात आरोग्याची सुविधा पोहोचलेली नाही. त्यावर उपाय म्हणून ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने आरोग्य रक्षक योजना सुरु केली. जनजाती क्षेत्रात आजही आरोग्य सुविधेसाठी कितीतरी दूर पायी प्रवास करून एखादी वैद्यकीय सुविधा मिळते. म्हणून छोटे चिकित्सा केंद्र, मोबाईल मेडिकल युनिट, आरोग्य तपासणी शिबीर व आरोग्य रक्षक योजना या माध्यमातून लाखो जनजाती बंधू-भगिनींना आरोग्य सुविधा करून दिली जाते आहे. महाराष्ट्रात जवळपास ८०० ठिकाणी आरोग्य रक्षक कार्यरत आहेत.
 
 
४) महिला कार्य : आपल्या देशात महिला शक्तिस्वरूप मानल्या जातात. घराचा आधार महिला असते. जनजाती समाजात महिला घरही सांभाळते व शेतीतही पुरुषाबरोबर काम करते. ग्रामीण भागात बाजारहाट महिलाच करतात. ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या स्थापनेपासून महिलांचं योगदान हे महत्त्वपूर्ण राहिले आहे. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, हितरक्षा अशा अनेक आयामांतून महिला प्राधान्याने काम करत आहेत.
 
 
५) खेलकूद : जनजाती बंधूंमध्ये शारीरिक क्षमता व कौशल्य मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. दूर गावागावात जाऊन खेळाडूंचा शोध घेणे व त्यांना प्रशिक्षण देणे, हे काम या ‘आयामा’च्या माध्यमातून केले जाते. यातून ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने अनेक प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेतला आहे. दर चार वर्षांनी राष्ट्रीय पातळीवर खेलकूद स्पर्धांचे आयोजन केले जाते. सर्वात पहिली खेलकूद स्पर्धा १९८८ साली मुंबईत झाली. या देशातील १५ प्रांत सहभागी झाले होते. ३९२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. सध्या ४०० दैनिक खेलकूद केंद्रे सुरु आहेत व २ हजार ४५ साप्ताहिक केंद्रे.
 
 
६) श्रद्धा जागरण: जनजाती समाज बंधू आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांचा आपल्या धर्म-संस्कृती यांच्याप्रति श्रद्धाभाव कायम राहिला आहे. त्यांच्या श्रद्धा-आस्था अधिक दृढ व्हाव्यात, यासाठी श्रद्धाजागरण या आयामाची सुरुवात झाली. अनेक ठिकाणी, भजन-सत्संग केंद्रे चालवली जातात. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात संत महात्मे मार्गदर्शन करतात. त्यामुळे मतांतरण, धर्मांतरणाच्या गोष्टींना आळा बसला आहे. जनजाती समाजाला आपल्या श्रद्धा, अस्मितेच्याप्रति जागृत करणे हे या आयामाचे काम आहे.
 
 
७) हितरक्षा : वर्षानुवर्षे जनजाती समाजावर अन्याय होत आहे. त्यांचे शोषण होत आहे. त्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने हा आयाम सुरु झाला. कोर्टकचेरी, सरकारी कामे कमी पैशांत करुन घेणे, कामाचा मोबदला न देणे, सरकारी कार्यालयात अर्ज देणे, सभा-संमेलनाच्या माध्यमातून प्रबोधन करणे, आपल्या अधिकारासाठी सिद्ध करणे.
 
 
८) ग्रामविकास : ‘भारत बसता हैं गावों मैं’ असे म्हणतात. गावांचे विश्व झाले, तरच देश विकसित होईल. जनजाती समाज, गावात, पाड्यात, वाडी-वस्तीत, डोंगर-दऱ्यांत आहेत, जनजाती समाजाचा विकास हे आमचे लक्ष्य असेल, तर ‘ग्रामविकास’ या माध्यमातून हा मार्ग प्रत्यक्षात येतो म्हणून ग्रामविकास हा आपला आयाम आहे. ‘रोल मॉडेल’ म्हणून बारीपाड्याकडे पाहिले जाते. अन्यही गावांमध्ये हे प्रयोग चालू आहेत.
 
 
 
vanvasi 2_1  H
 
 
९) नगरिय कार्य : शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास अशा अनेक गोष्टींची कमतरता जनजाती क्षेत्रात दिसते, जर नगरिय समाज-जनजातीबंधूच्याप्रति सक्रिय झाला असता तर वेगळे स्थित्यंतर दिसले असते. परंतु, नगरिय समाजातील लोकांचा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उपेक्षित राहिल्याने अनेक विघटनवादी शक्ती जनजाती क्षेत्रात आपली पाळेमुळे घट्ट बसवत आहेत व त्याची शिकार हा समाज बनला आहे. वनबंधू व नगरिय बंधू यांमध्ये आत्मीय संपर्क, संबंध प्रस्तावित व्हावेत या व अन्य माध्यमांतून नगरिय कार्य आयामाची सुरुवात झाली.
 
 
१०) नगरिय जनजाती संपर्क: स्वातंत्र्यानंतर जनजाती बंधू योजनांच्या लाभातून शहरात वास्तव्याला आहे. नगरात वास्तव्याला असलेल्या जनजाती बंधूंच्या संपर्काची व्यवस्था असली पाहिजे. यातून या आयामाला सुरुवात झाली. ग्रामीण बंधूंचा थोडाफार विकास झाला पाहिजे, यासाठी प्रवृत्त करणे.
 
 
११) संपर्क : चर्चासत्रे, परिसंवाद, संमेलने, संस्था संपर्क जनजाती क्षेत्रात कार्य करते आहे. तशा काही जनजाती बंधूंची संघटनाही कार्यरत आहेत. काही सकारात्मक कार्य करत आहेत, तर काही भ्रमित विचार पसरले जातात. सज्जनशक्तीला संघटित करुन समाजहितासाठी प्रवृत्त करणे, कार्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे हे संपर्क आयामाचे सूत्र आहे.
 
 
१२) प्रचार-प्रसार : विचारांचा प्रसार करणे, आपले विचार, गतिविधी, उपक्रम, कार्यक्रम इ. प्रचार-प्रसार होणे आवश्यक असते. त्याचबरोबर जनजाती क्षेत्रात कोणत्या समस्या आहेत, त्यांची माहिती करुन घेणे. हे इंटरनेटचे युग आहे. पत्रिका प्रकाशित करणे, विक्री, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वेबसाईट इ. माध्यमांतून आपण समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
 
एक विशाल दृष्टीकोन घेऊन विविध सेवाकार्याच्या माध्यमातून कार्याची सुरुवात झाली. शिक्षण, आऱोग्य, विकास, श्रद्धाजागरण, संस्कार इ. विषय घेऊन हजारो सेवा प्रकल्प उभे राहिले. या साऱ्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशभरातील वनवासी क्षेत्रात आज एक प्रचंड शक्ती निर्माण झाली आहे. बाळासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नातील प्रत्येक गोष्ट सत्यात उतरली आहे. भूतकाळात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेला वनवासी समाज आज नव्या तेजाने तळपताना दिसू लागला आहे.
 
 
 
कोरोना महामारीच्या काळात वनवासी कल्याण आश्रमाचे देशव्यापी राहत कार्य
 
 
 
> देशात सर्व राज्यात संघटन असल्याने या महामारीदरम्यान २१ राज्य, २०८ जिल्हे, ३६०० गावांत कार्य केले गेले.
> अन्य धान्य देण्याचे काम ४४८ तालुक्यांत ३ अतिमागास जनजाती, १७० जनजातीत, ७७,६१४ परिवारांना अन्नधान्य दिले.
> पुरुष २००० कार्यकर्ते व ४५० महिला कार्यकर्ते
> ४२८ केंद्रस्थानी मास्क तयार करण्याचे काम महिलांनी केले.
> शहरात ६३ हजार मास्क बनवून त्याचे वितरण वेगवेगळ्या गावात केले.
> नेपाळमध्येही पाच जिल्ह्यांत-१८०० परिवारांपर्यंत राहत कार्य
> अंदमानमध्येही ७५ गावांत एक हजार परिवारांना या राहत कार्याचा लाभ
> दहा राज्यांना हेल्पलाईन सुरु केल्या होत्या.
> ‘नॉर्थ ईस्ट’मधील ज्या विद्यार्थ्यांनी (नागालँड, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश) फोन केले त्यांना मदत केली. एकूण ६३६ विद्यार्थ्यांना मदत
> या ‘लॉकडाऊन’च्या काळात अडकले होते त्यांना मदत.
> लोकांना सरकारकडून मिळणारी मदत योग्यप्रकारे मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन, शासनाकडून मिळावी म्हणून प्रयत्न.
> हे सगळं काम समाजाच्या सहभागावर करतो आहोत.
> वेगवेगळ्या संस्था, संघटना, नगरातील लोकांचे मोठे योगदान.
> चक्रीवादळात राहत कार्य - बंगालमध्ये ‘अॅम्फन’ चक्रीवादळामुळे सुंदरबन भागात मोठे नुकसान झाले. यावेळी ६५ परिवाराची राहण्याची व्यवस्था, तर १५३ परिवारासाठी भोजनाची सोय केली.
> कोकण प्रांतातही रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळात २५ घरे बांधून देण्याची व्यवस्था केली
> आश्रमाकडून स्पर्धा परीक्षा केंद्रे चालवली जातात.
> ऑनलाईन अध्यापनाचे काम चालू आहे.
 
- शरद शेळके
 
 
(लेखक वनवासी कल्याण आश्रम,
पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@