पाकिस्तानचा भविष्यकाळ दक्षिण सुदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020   
Total Views |

Sudan_1  H x W:
 
 
“माझी दोन बालकं म्हणत होती की, आई, आम्हाला खायला दे. पण, मी कुठून देणार खायला. मी, त्यांना सांगितले की, झोपा बाळांनो, उद्या देते काहीतरी. पण, दुसऱ्या दिवशी एक पाच वर्षांचा आणि एक सात वर्षांचा, अशी माझी दोन्ही बाळं उठलीच नाहीत. कित्येक दिवस अन्नाचा कण शरीरात गेला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण, त्यांना पुरण्याचेही बळ माझ्याकडे नव्हते. मग मी, दोन्ही मुलांना गवताच्या गंजीत गुंडाळले आणि जंगलामध्ये सोडून आले,” असे कैलीन केलेंग या दक्षिण सुदानमधली महिलेने तिकडे गेलेल्या काही प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितले. भुकेने तडफडणारी बालकं आणि त्यातच त्यांचा अंत झाल्यावर हतबल झालेल्या मातेने त्या मृत बालकांवर अंतिम संस्कारही न करता जंगलात टाकून येणे, ही घटना कधीची असावी? फार पूर्वीची का? तर नाही, ही घटना आहे डिसेंबर २०२० ची. या महिन्यात जवळ जवळ १७ बालकांचा भूकबळी गेला आहे. २०१३ सालच्या सर्वेक्षणामध्ये दक्षिण सुदानचा मानव विकास एकांक हा -०.४७३ होता. यावरूनच दक्षिण सुदानमध्ये काय परिस्थिती असेल हे कळते.
 
 
 
 
असो, कैलीन केलेंगच्या वक्तव्यामुळे मात्र जगाचे लक्ष दक्षिण सुदानकडे वळले. यावर प्रशासनाने सांगितले की, देशात केवळ ११ हजार लोकांनाच अन्न तुटवडा आहे. त्यांच्यासंदर्भात भूकबळीचा धोका होऊ शकतो. मात्र, खाद्य सुरक्षा तज्ज्ञांच्या मते दक्षिण सुदान प्रशासन सत्य लपवत आहे. दक्षिण सुदानमध्ये अशी परिस्थिती का यावी? तर तिथल्या आपसातील गृहकलहामुळे दक्षिण सुदान सर्वच बाबतीत अस्थिर आहे. दक्षिण सुदान निर्माण व्हावा, ही खरे तर ब्रिटिशांची आंतरिक इच्छा होती. दक्षिण सुदानचा इतिहास पाहूया, १९५६ साली सुदान ब्रिटिशांपासून मुक्त झाला. मात्र, इंग्रजांच्या नीतीमुळे सुदानमधली जनता विविध जनसमूहात वाटली गेली. असे म्हटले जाते की, १९व्या शतकाच्या मध्यात मिस्त्रच्या शासकाने-मोहम्मद अली याने लोकांना सांगितले होते की, दक्षिण सुदानला जाऊन तिथून सोने, हत्तीचे दात आणि गुलाम घेऊन या. तेव्हापासून उत्तर सुदान आणि दक्षिण सुदानमध्ये संघर्ष आहे. इंग्रजांनी हा संघर्ष अजून तीव्र व्हावा, यासाठी खतपाणी घातले. इंग्रजांनी दक्षिण सुदान अविकसित आणि अन्यायग्रस्त घोषित केला. दक्षिण सुदान प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. मात्र, येशूच्या प्रचारकांना तिथे जाण्यास बंदी नव्हती. त्यामुळे दक्षिण सुदान ख्रिस्तीकरणाकडे वेगाने वळला. दक्षिण सुदानमध्ये प्रगतीच्या आणि वांशिक सुरक्षिततेच्या आड ब्रिटिशांनी उत्तर सुदानमधील लोकांना जाण्यासाठी नियमावली केली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि उत्तर सुदान आणि दक्षिण सुदानमध्ये टोकाचे भेद निर्माण झाले.
 
 
१९५६ साली इंग्रजांनी आपले चंबुगबाळे सुदानमधून आवरले. सुदान सोडून जाताना इंग्रजांनी साळसूदपणे सांगितले की, सुदानची कोणत्याही प्रकारची फाळणी न करता, विभागणी न करता आम्ही सुदान सोडत आहोत. मात्र, हे खोटे होते. कारण इंग्रज गेल्या गेल्या सुदानमध्ये गृहयुद्घच सुरू झाले. उत्तर सुदानमध्ये अरबी आणि न्यूबियन वंशाचे लोक जास्त राहतात. तर दक्षिण सुदानमध्ये ख्रिस्ती आणि एनिमिस्ट निलोट्स वंशाचे लोक प्रामुख्याने राहतात. उत्तर आणि दक्षिण सुदानचे आपसात कधीच पटले नाही. १९८९ साली कर्नल उमर अल बशिर यांनी देशात सत्ता स्थापन केली. बशिर यांनी सुदानचे गृहयुद्ध थांबावे, यासाठी व्यापक मोहीमच हातात घेतली. त्यानुसार २०११ साली सुदानमध्ये विद्रोही गटांनाही मर्यादित स्वरूपात स्वायत्तता देण्यात यावी का आणि दक्षिण सुदानला स्वतंत्रता द्यावी का, यासाठीचे जनमत संग्रहित केले. मात्र, दक्षिण सुदान हा स्वतंत्र देश निर्माण व्हावा, यासाठी या जनमताचा कौल गेला. मग १९ जुलै, २०११ रोजी सुदानची फाळणी होऊन दक्षिण सुदान हा देश निर्माण झाला. सुदानमधील अभ्यासकांचे म्हणणे आहे की, पाश्चिमात्य देशाच्या मर्जीनुसार आणि त्यांच्या दबावाला बळी पडून सुदानच्या प्रशासकाने अल बशिरने सुदानची फाळणी केली. आज दक्षिण सुदानकडे पाहिल्यावर वाटत राहते की, धर्माच्या आणि वंशाच्या नावावर फाळणी करून निर्माण होणारा देश खरंच प्रगती करू शकतो का? नाही. याचे उदाहरण पाकिस्तान आहेच!
 
 
@@AUTHORINFO_V1@@