तपस्वी कलाशिक्षक : प्रा. सुभाष बाभुळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020
Total Views |

Subhash Babhulkar_1  
 
 
 
आजच्या काळात जगणं, हे एक ‘सायन्स’ बनलं आहे. २०२० हे वर्ष पहिले तीनेक महिने वगळले तर फार भयानक गेले. जगण्याची किंमत कळली, मृत्यूची भीतीही वाटायला लागली. नाती समजली, प्रेमाचे महत्त्व कळले आणि ‘जीवन जगणं’ ही एक कला आहे, हे प्रत्येक सजग व्यक्तीला कळले. जीवनाचा अभ्यास हा कलापूर्ण ‘धर्म’ आहे, हेही या काळात समजलं. शाश्वत-अशाश्वत यातील भेद समजला. आयुष्यभर म्हणजे आयुष्याची ऐन उमेदीची वर्षे, शिक्षकी पेशात व्यतित केल्यानंतर विशेषतः कला शिक्षकाच्या बाबतीत, मला अधिक अधिकारवाणीने नव्हे, तर हक्काने सांगता येईल. कला शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे, त्याच्या स्वाध्यायिकांकडे फार बारकाईने पाहावे लागते. कारण, इतर शिक्षण शाखांप्रमाणे कलाशाखेत ‘क्रमिक पुस्तके’ म्हणजे विषयानुसार थेट पुस्तके नसतात. अनेक पुस्तकांचे संदर्भ घेऊन मग अभ्यास करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याचे काम हे भिन्न असते. रंग-ब्रश-पेन्सिली वगैरे साहित्यं जरी समान असली तरी रंगलेपन-सादरीकरण-तंत्रं आणि कौशल्ये ही प्रत्येकाची विभिन्न असतात. अशावेळी त्या त्या स्वाध्यायिकांचं गुणमूल्यांकन करताना खऱ्या-सच्च्या कला शिक्षकाच्या अनुभवाचा कस लागतो. आज कलाशिक्षणासह समस्त शिक्षण क्षेत्रातच, ‘शिक्षक’ हा हद्दपार होत असलेला प्राणी बनलाय.
 
 
 
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाला सेवानिवृत्तीनंतरची ‘पेन्शन’ अर्थात ‘निवृत्ती वेतन’ हातात मिळतामिळता नाकात दम येतो आणि तोंडाला फेस येतो. सेवानिवृत्तीनंतर अशा कटू अनुभवांना सामारे जाताना त्या शिक्षकाच्या मनाला कुणी स्पर्श केला का हो? त्या शिक्षकाच्या वेदनांना मलमपट्टी करण्याची सोय आहे का हो? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. या सेवानिवृत्त झालेल्या कलाध्यापकांच्या जागी म्हणजे रिक्त जागी खरंतर दुसऱ्या कलाध्यापकाची नियुक्ती स्थायी स्वरुपात व्हावयास हवी. पण, दुर्दैवाने तसं होत नाही. त्या रिक्त झालेल्या जागी, हंगामी म्हणजे तात्पुरत्या, कंत्राटी म्हणजे ‘रोहयो’ तत्त्वानुसार आणि ही दोनही प्रकारची पदं भरता आली नाहीच तर ‘व्हिजिटिंग’ म्हणजे अभ्यागत कलाशिक्षक भरती होते. म्हणजे ‘त्या’ शिक्षकाला, ‘नोकरीची’ अधांतरी अवस्थेची शिक्षक भरती होते. म्हणजे ‘त्या’ शिक्षकाला, ‘नोकरीची’ अधांतरी अवस्थेची टांगती तलवार डोक्यावर आणि समोर प्रचलित कायम विद्यार्थी संख्येचा वर्ग, कसं कलाध्यापन करणार? कसं शिकविणार? अशा या कला जीवनाच्या अभ्यासास ‘धर्म’ मानून अनेक कलाशिक्षक हे सेवानिवृत्त जरी होत असले तरी ते त्यांच्या कलासाधनेत आणि कलाउपासनेत कधीच निवृत्त होत नाहीत. ते अखंड आणि अव्याहतपणे कलाधर्माची पूजा करीत असतात.
 
 
 
व्यथेला आणि मानसिक तणावांना, रंग-आकार आणि कल्पना यांच्यामार्फत दूर करण्याचं सामर्थ्य या कला शिक्षकांकडे असतं. हे सामर्थ्य कला शिक्षकांकडे असतं म्हणून त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणं हेही ‘कलम ३०२’ गुन्ह्यास पात्र ठरणाऱ्या गुन्ह्याइतकं असावं, असं एका पोळलेल्या त्रासाने दग्ध झालेल्या कलाध्यापकाने सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी निर्वाणाने म्हटले होते. तसं नाही व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने होतंय. खरं जीवन हे ‘स्वयंभू’ आणि ‘स्वयंसिद्ध’ असतं जे कलाशिक्षकांच्या बाबतीत म्हणता येईल. सेलिब्रेशन मिरवणे, माध्यमांसमोर सराईतपणे जाणे असल्या गुणवत्तेवर स्वयंभू कलासाधना अवलंबून असत नाही. त्यात व्यक्तिगत श्रमाचा आणि तपाचा भाग फार मोठा असतो. अशा एका ‘स्वयंभू’ कलाशिक्षकाचा कलाजीवन प्रवास म्हणजे आजच्या लेखाचं प्रयोजन आहे. नागपूरच्या तत्कालीन शासकीय चित्रकला महाविद्यालयात १९९७ ते २०१९ या काळात अधिव्याख्याता म्हणून कलाध्यापन करणारे जे नुकतेच औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालय सध्याचे अभिकल्प कला महाविद्यालय येथून २०२० मध्ये सेवानिवृत्त झालेले प्रा. सुभाष बाभुळकर यांच्या कलाप्रवासाचा मागोवा. हेच एक कलाचिंतन ठरावे...!
 
 
प्रा. सुभाष बाभुळकर सर म्हणजे अत्यंत तळमळीने, दिखावा न करता, कला विद्यार्थ्यांना कलाध्यापन करणारा प्रामाणिक पारदर्शी कलाध्यापक ! तीन महिने झालेत-सेवानिवृत्त होऊन ‘पेन्शन’ मिळेल तेव्हा मिळेल पण त्यांची कलासाधना मात्र ‘पेन्शन’मध्ये गेलेली नाही. त्यांच्या अखंड कलासाधनेवर त्यांच्या कला उपक्रमशील तंत्र आणि कौशल्यांवर कधी कुणी संबंधितांनीही दखल घेतली नाही वा तसे वाटले नसावे. ना कधी त्यांच्या स्वयंभू शैलीतील कलाकृतींवरही लिखाण, प्रसिद्ध झाले ना कुणी लेख लिहिला. म्हणजे खऱ्या अर्थाने, प्रा. सुभाष बाभुळकर सर हे प्रसिद्धीपासून दूर राहिले. वास्तविक अनेक कार्यशाळा अनेक एकल वा समूह कलाप्रदर्शने आणि उतारवयात कलाक्षेत्रातील विद्यावाचस्पती म्हणजे पीएच.डी. पदवी प्राप्त करणाऱ्या, प्रा. सुभाष बाभुळकर सरांच्या कलाकृतींची, कलाशैलींची उपेक्षा झाली असं मी म्हणणार नाही, मी उलट म्हणेल की, ‘बोल्ड’-पोतांच्या आधारे, स्वच्छ रंग छटांच्या मिश्रणातील ‘होरायझन’ निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक निरीक्षणांना कॅनव्हासवर आशय गर्भतेने व रसास्वाद मिळविण्याची ज्यांची ख्याती आहे, अशा शैलीतील कलाकृती पाहण्यासाठी आतुर असलेल्या सच्च्या कलारसिकाचीच उपेक्षा झाली, असं म्हणावं लागेल. प्रा. सुभाष बाभुळकर हे म्हणूनच ‘तपस्वी कलाशिक्षक’ आहेत.
 
 
प्रा. सुभाष बाभुळकर यांच्या कलाकृतीतील स्त्री-पुरुष, पशु-पक्षी, झाडे-झुडपे आणि निसर्गातील अनेक दृश्यघटक हे फार अनोख्या रुपात व्यक्त झालेले असतात. त्यांची कलाकृती ही कृत्रिम नसून अचानक निर्माण होणाऱ्या मनोवेगाच्या फटकार्‍यांनी व्यक्त होताना दिसते. त्यामुळे त्यांच्या कुंचल्याचे फटकारे हे नैसर्गिक वाटतात. मागे-पुढे असा आभास निर्माण करण्यासाठी ‘बोल्ड टेक्सचर्स’मधील परिणाम त्यांनी साधलेले असतात. त्यामुळे त्यांची प्रत्येक कलाकृती ही रंगाच्या आणि आशयाच्या ‘डायमेंशन’ने शृंगारलेली भासते. त्यामुळे निसर्ग भरभरुन रंगांची उधळण केलेला असा ऐश्वर्यवान मोर पक्षी हा प्रा. बाभुळकरांच्या चित्रमासिकांचा ‘नायक’ ठरला. त्यांच्या कलाकृतीतील मूर्त-अमूर्तांचा लपंडाव, ‘लाईट-बोल्ड टेक्सचर’च्या करामती आणि आशयगर्भतेचं गांभीर्य, ही वैशिष्ट्ये बाणवून त्यांची कलाकृती बनलेली आहे. अनेक शैली आणि तंत्रांच्या अभ्यास त्यांच्या कलाकृतीद्वारे दिसतो, रंगाकरांनी मन भरतं, उत्साह टिकवून ठेवायला प्रा. सुभाष बाभुळकरांच्यावेदना अजूनही धगधगत आहेत, अशा सच्चा कलाध्यापकांच्या कलाकृतीचं पीक जोमाने वाढण्यासाठी त्या कलाकरांना सुदृढ ठेवणं, ‘स्वान्तसुखाय’ वातावरण उपलब्ध करुन देणं हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठीच त्यांच्या अथक कलाप्रवासाला ‘सेवानिवृत्ती’ची विश्रांती जरी मिळालेली असली, तरी असे कलाध्यापक हे अखेरच्या क्षणापर्यंत कलोपासनेत व्यस्त असतात. प्रा. बाभुळकर सरांना सुदृढ, चिंतारहीत, कलापूर्ण आणि निरोगी मन:स्थितीतीचे आयुष्य दीर्घस्वरुपात लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 

- प्रा. गजानन शेपाळ
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@