सावध राहा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020
Total Views |

Mumbai_1  H x W
 
 
 
कोरोना विषाणू हा कधीही न संपणारा आणि कायम चर्चेचा विषय ठरला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडी कोरोनाचा विषय असतोच. जानेवारीच्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यापासून मुंबईत कोरोना आटोक्यात येण्याच्या शक्यतेपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. पण, कोरोना काही आटोक्यात येत नाही. कोरोनाचा कहर झाला, तेव्हा मुंबईत दिवसाला २६०० पर्यंत रुग्णसंख्या गेली होती. त्यानंतर २१ डिसेंबरला रुग्णसंख्या ४६३ पर्यंत घसरली असतानाच, २३ डिसेंबरला ती ७४५ पर्यंत वाढली. कोरोनाचा असा चढता-उतरता आलेख असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या प्रकारच्या घातक विषाणूचा संसर्ग होऊ लागला. त्यामुळे तेथे पुन्हा ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आला. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या आवृत्तीचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. भारतासह जगातील २० पेक्षा अधिक देशांनी ब्रिटनसोबतची विमानसेवा बंद केली आहे. या नव्या आवृत्तीच्या कोरोनामध्ये आरोग्यतज्ज्ञांना १७ बदल आढळले. हा नवा विषाणू मानवी पेशींवर चिकटून शरीरात वेगाने आपली संख्या वाढवितो. पहिल्या कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के वेगाने तो पसरतो. या विषाणूचा संक्रमणाचा वेग सर्वाधिक असून, ३०-४० सेकंदांत तो शरीरात संक्रमित होतो. हा नवीन विषाणू आठ वेगवेगळ्या प्रकारे पेशींवर आघात करतो. मात्र, भारताने वेळीच इंग्लंडची विमानसेवा थांबविली आणि आलेल्या प्रवाशांना ‘क्वारंटाईन’ करून नंतर तपासणी केली. मुंबईत चार विमानांतून आलेल्या प्रवाशांपैकी एकही ‘पॉझिटिव्ह’ आढळलेला नाही, ही मुंबईकरांच्या दृष्टीने सुदैवाची बाब आहे. कोरोनाप्रतिबंधासाठी जानेवारीपासून लसीकरण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता ही मुंबईसह भारतासाठी दिलासादायक बाब आहे. भारतातील मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. स्थानिक रहिवाशांपेक्षा येथे आयाराम-गयारामच अधिक आहेत, त्यामुळे ते फार दक्षता घेताना दिसत नाहीत. साध्या मास्क न वापरण्याच्या कारवाईत अन्य प्रांतातून आलेलेच अधिक संख्येने सापडत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई अधिक प्रमाणात चालते. त्यावरून हे अनुमान काढण्यात येत आहे. मास्क वापरणे हे सध्या तरी लसीकरणाइतकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सावधानता महत्त्वाची आहे.
 
 
 
आशेचा लोलक!
 
 
मुंबईची ‘उपनगरीय रेल्वे’ आणि ‘बेस्ट’ बसेस या मुंबईच्या जीवनवाहिन्या समजल्या जातात आणि ते खरेही आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचे जीवन या दोन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहे. यापैकी ‘बेस्ट’चा एक दिवस संप झाला तर लोकलवर किती ताण पडतो आणि लोकलचा एक दिवस संपच कशाला, रेल्वेमार्गात काही बिघाड होऊन दोन-चार तासांसाठी रेल्वेसेवा विस्कळीत झाली तर चाकरमान्यांच्या हालाला पारावारच राहत नाही, हे प्रत्येकाने अनुभवले आहे. अशी ही जीवनवाहिनी कोरोनाप्रतिबंधासाठी ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आल्यानंतर २२ मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झाली ती आजतागायत बंदच आहे. सगळ्यांनाच बंद असलेली लोकल १५ जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आली. ‘अनलॉक’मध्ये लोकल आधी अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी, त्यानंतर वकिलांसाठी आणि त्यानंतर महिलांसाठी सुरू करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही सेवा राज्य सरकारला जे अत्यावश्यक वाटतात, त्या सर्वांसाठी सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य माणूस अजूनही लोकलच्या प्रतीक्षेत आहे. ऑक्टोबर महिन्यात जेव्हा मुंबई लोकल महिलांसाठी सुरू करण्यात आली, तेव्हा लोकल लवकरच सरसकट सगळ्यांसाठी कधी सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतरही दोन महिने उलटले तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दरवाजे बंदच आहेत. घड्याळाचा लोलक झुलत राहतो आणि काटा सेकंदासेकंदाने पुढे सरकत राहतो. त्याप्रमाणे राजकारणी सामान्य माणसाला लोकल सुरू होण्याची आशा दाखवितात. मात्र, दिवस निघून जातात, तरी लोकल सुरू होण्याच्या आशा पूर्णत्वास येत नाहीत. आतासुद्धा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, अशी माहिती दिली. मात्र, ती त्यांनी दाखविलेली आशा आहे. सध्या कोरोना आटोक्यात येईल, असे वाटत असताना अधूनमधून त्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच इंग्लंडमध्ये दुसर्‍या घातक प्रकारच्या कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी दाखविलेली आशा ही घड्याळाच्या लोलकसारखी आहे. तो आशेचा लोलक आहे. मुंबईकरांनी लोकल सुरू होईपर्यंत ‘बेस्ट’ बसेसच्या लांबचलांब रांगेत तिष्ठत राहायचे आहे.
 
 
- अरविंद सुर्वे
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@