‘अटल’ स्वयंसेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020
Total Views |

Atal Bihari Vajpayee_1&nb
 
 
१९९८ सालीदेखील १३ महिन्यांच्या रालोआ सरकारचा अवघ्या एका मताने पराभव झाला. मात्र, वाजपेयींनी आपल्या वैचारिक निष्ठा कधीही बदलल्या नाहीत. कारण वाजपेयी आपल्या विचारसरणीसोबत सदैव अटल होते. देशाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असणारे, संसदीय लोकशाहीवर निष्ठा असणारे असे ते अतिशय ठाम विचारांचे स्वयंसेवक होते.
 
एक दिवस आमचा अटल नक्कीच देशाचा पंतप्रधान होईल... असे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे होते. मात्र, दुर्दैवाने ते स्वप्न पूर्ण झालेले पाहण्यापूर्वीच महान समाजसुधारक बाळासाहेब देवरस निवर्तले. मात्र, सामाजिक कुप्रथांविरोधातील बाळासाहेबांची लढाई, समाजातील दुर्बल घटकांपर्यंत सामाजिक आणि आर्थिक विकास पोहोचविण्याची तळमळ आणि भारताला त्याचा गौरव पुन्हा प्राप्त करून देण्याची तळमळ हे सर्व वाजपेयी यांनी एक ध्येय म्हणून स्वीकारले. बाळासाहेब देवरस वाजपेयींसाठी ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ होते. बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना वाजपेयी यांनी त्यांचेच एक वाक्य फार महत्त्वाचे असल्याचे सांगितले होते. ते म्हणजे अस्पृश्यता जर पाप नसेल तर बाकी काहीही पाप नाही...
 
वाजपेयी हे रा. स्व. संघाचे निष्ठावान आणि शिस्तप्रिय स्वयंसेवक होते आणि असा व्यक्ती आपला स्वयंसेवक आहे, याचा संघालाही नितांत अभिमान होता. वाजपेयी हे निःसंशयपणे हुशार राजकारणी, सक्षम प्रशासक आणि उत्तम संसदपटू होते, यात कोणतीही शंका नाही. त्याचप्रमाणे पत्रकार, कवीही ते होतेच; पण त्यापलीकडेही एक माणूस म्हणून ते फार मोठे होते. त्यांचे १६ ऑगस्ट, २०१८ रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यावेळी भारताच्या या थोर सुपुत्राला संपूर्ण जगभरातून आदरांजली अर्पण करण्यात आली. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाविषयी काही मंडळींनी तऱ्हेतऱ्हेच्या वावड्याही उठविल्या. काही वृत्तवाहिन्यांवरील चर्चेमध्ये विशिष्ट व्यक्तींना आमंत्रित करून वाजपेयी आणि रा. स्व. संघाचे संबंध कसे नेहमीच ताणलेले होते, यावर चर्चाही घडविण्यात आल्या. मात्र, वाजपेयींच्या उदात्त व्यक्तिमत्त्वापुढे त्यांचे हे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. कारण असे प्रयत्न भूतकाळातही झाले आहेत. असो.
 
लोकसभेमध्ये १९९६ साली वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये अनेक बिगर भाजप नेत्यांनी वाजपेयींना डिवचले होते. “तुम्ही अयोग्य पक्षातील योग्य व्यक्ती आहात,” असे सांगून वाजपेयींनी रा. स्व. संघाच्या विचारसरणीपासून अंतर राखावे, असे सुचविले होते. मात्र, वाजपेयींनी त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. म्हणूनच १९९८ सालीदेखील १३ महिन्यांच्या रालोआ सरकारचा अवघ्या एका मताने पराभव झाला. मात्र, वाजपेयींनी आपल्या वैचारिक निष्ठा कधीही बदलल्या नाहीत. कारण वाजपेयी आपल्या विचारसरणीसोबत सदैव अटल होते. देशाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असणारे, संसदीय लोकशाहीवर निष्ठा असणारे असे ते अतिशय ठाम विचारांचे स्वयंसेवक होते. संसदेमध्ये वाजपेयी रा. स्व. संघाचा आवाज होते, प्रतिनिधी होते. म्हणजे १९७७ साली मोरारजी देसाई सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होण्यापूर्वी आणि नंतर तीन वेळा पंतप्रधान म्हणून कारभार करण्यापूर्वीपासूनच त्यांनी संसदीय राजकारणामध्ये रा. स्व. संघाच्या विचारसरणीची मुळे रोवण्यास प्रारंभ केला होता. लोकसभेमध्ये त्यांनी १९९६ साली १३ दिवसांच्या सरकारविरोधात आलेल्या अविश्वास ठरावादरम्यान रा. स्व. संघाच्या टीकाकारांना अतिशय जोरदारपणे प्रत्युत्तर दिले होते.
 
राष्ट्रोत्थानासाठी सदैव कार्यरत असलेल्या या राष्ट्रवादी विचारांच्या संघटनेविषयी विरोधी पक्षातील काही नामवंत नेत्यांनी केलेल्या बिनबुडाच्या टीकेला वाजपेयींनी सप्रमाण खोडून काढले होते. लोकसभेत त्यांनी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी 1962च्या चीन युद्धादरम्यान रा. स्व. संघाने केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आमंत्रण दिल्याचे उदाहरण दिले, पुढे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी १९६५च्या भारत-पाक युद्धावेळी दिल्लीची वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी संघाला जबाबदारी दिल्याची घटना सांगितली. एवढेच नव्हे, तर २६ जून, १९९५ रोजी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांनी आणीबाणीविरोधात बोलताना रा. स्व. संघाचा कसा गौरव केला आणि रा. स्व. संघ ही एक निष्कलंक संघटना असल्याचे देवेगौडा यांचे वाक्यही आपल्या भाषणात उद्धृत केले. पंतप्रधान कार्यालयातील त्यांचा सहकारी या नात्याने मी त्यांच्यासोबत २७ ऑगस्ट, २००० रोजी नागपूर येथे रा. स्व. संघाच्या मुख्यालयात गेलो होते. औचित्य होते ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे. तेथे वाजपेयी त्यांचे मेंटॉर आणि ज्येष्ठ प्रचारक नारायणराव तर्टे यांना आवर्जून भेटले. तर्टे यांनीच ग्वाव्हेर येथे १९३९ साली १५ वर्षांच्या वाजपेयी यांना संघाच्या शाखेशी ओळख करून दिली होती. वाजपेयी त्यांचा उल्लेख ‘तर्टे मामू’ असा करीत असत.
 
वाजपेयींवर संघाचे विचारवंत पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा प्रचंड प्रभाव होता, त्यांनी वाजपेयींना पत्रकारितेमध्ये जाण्याची प्रेरणा दिली. मग पुढे वाजपेयींनी राजकारणात जाण्यापूर्वी ‘राष्ट्रधर्म’, ‘पांचजन्य’, ‘स्वदेश’ अशा रा. स्व. संघाशी संबंधित नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केले. वाजपेयींच्या संपादकीयांमध्ये समाजातील वंचित घटकांचे कल्याण करण्याची रा. स्व. संघाची तळमळ नेहमीच अधोरेखित होत असे. लखनऊमध्ये ‘राष्ट्रधर्म’ या प्रकाशनाचे संपादक ते होते. त्यावेळी ते अग्रलेखही लिहायचे, मजकुराचे मुद्रितशोधनही करायचे, अक्षरजुळणीही करायचे, छपाई व्यवस्था बघायचे आणि सायकलवर बसून प्रतींचे वाटपही करायचे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाचे काम करा, असा आदेश मिळण्यापूर्वी वाजपेयी संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. रा. स्व. संघाच्या विचारसरणीविषयी वाजपेयी अगदी ठाम होते. अनेक लिखाणांमध्ये त्याचे प्रतिबिंब उतरले आहे, त्यांच्या २०१२ सालच्या एका लेखात त्यांनी म्हटले होते - मला संघाची विचारसरणी तर भावतेच. पण, त्याहून महत्त्वाचे म्हणजे जनतेप्रति रा. स्व. संघाचा दृष्टिकोन मला अधिक महत्त्वाचा वाटतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो केवळ याच संघटनेत बघावयास मिळतो. केवळ व्यक्ती नव्हे, तर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी रा. स्व. संघ काम करतो. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीनुसारच संघाची कार्यपद्धती आहे.
 
अटलजी ज्या ज्या वेळी आपल्या लोकसभा मतदारसंघाला भेट देत असत, त्या त्या वेळी संघ कार्यालय आणि तेथील वरिष्ठ अधिकारी मंडळींना अगदी आठवणीने भेटायला जात असत. पुढे पंतप्रधानपदाच्या काळामध्ये संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांना आपल्या अधिकृत निवासस्थानी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करणे आणि देशहिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करणे, ही त्यांची सवयच होती. त्यामध्ये एच. व्ही. शेषाद्री, मदनदास देवी आणि अन्य पदाधिकार्यांचा समावेश असे. रा. स्व. संघाची ओळख लपविण्याचा प्रकार वाजपेयींनी कधीही केला नाही. रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव उपाख्य गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास ते उपस्थित होते. त्यानंतर सरसंघचालक रज्जू भैय्यांच्या अंत्यसंस्कारासही ते पुण्यात उपस्थित होते. आपल्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यात वाजपेयी हे एक निष्ठावान स्वयंसेवक होते, यात कोणतीही शंका नाही. त्यांचे निष्कलंक चारित्र्य हे विद्यमान आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत असे आहे. त्यामुळे भारतीय राजकीय इतिहासातील एक सुवर्णपर्व म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळाचे मूल्यमापन करणे सर्वथा योग्य ठरेल.
 
 
- अशोक टंडन
(लेखक पंतप्रधान कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्यरत होते.)
(अनुवाद : पार्थ कपोले)
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@