'बुलेट ट्रेन'ला मिळाला 'थांबा'!

    24-Dec-2020
Total Views |
bullet train_1  




ठाणे महापालिकेने प्रकल्पाच्या प्रस्तावाला दिली पुन्हा बगल

मुंबई: कांजुरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरून वातावरण तापलेले असताना त्याचे पडसाद ठाणे महापालिकेच्या महासभेत उमटलेले दिसून आले. कारण बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने गुंडाळला आहे.



केंद्र सरकारच्या महात्त्वाकांक्षी 'बुलेट ट्रेन'च्या प्रकल्पाला ठाणे महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेने खोडा घातला, अशा चर्चा रंगताना दिसतायेत. बुधवार दि. २३ डिसेंबर रोजी पुन्हा मंजुरीसाठी आलेला बुलेट ट्रेनचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी दप्तरी दाखल केला. या मुद्द्यावर भाजप नगरसेवकांनी शांत बसणे पसंद केले असले, तरी शिवसेनेची ही भूमिका दुटप्पी असल्याचे मत भाजप गटनेते संजय वाघुले यांनी व्यक्त केले आहे. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले, "बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाकडून आला होता. त्यामुळे विकासाला भाजपकडून नेहमीच सहकार्य असते. मात्र, हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करून शिवसेनेने विकासात खोडा घातला. एकीकडे ‘टीएमटी’च्या 200 बसेससाठी केंद्राकडे झोळी पसरतात आणि केंद्राच्या प्रकल्पाला विरोध करतात, ही सेनेची दुटप्पी भूमिका आहे."



दरम्यान, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला, तरी राज्यात सुरू असलेल्या ‘मेट्रो’ कारशेडच्या वादावरून या प्रकल्पास शिवसेनेकडूनही विरोधी भूमिका घेण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे. बुलेट भूसंपादनावरून ठाण्यातील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. परंतु हा शेतकर्‍यांचा विरोध आता हळूहळू कमी झाल्याने प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे. ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून तयार होणार्‍या या प्रकल्पासाठी महसूल विभागाकडून भूसंपादन करण्यात येत आहे.