जयदेवी जयदेवी जय भगवद्गीते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020
Total Views |

geeta jayanti_1 &nbs
 
 
ज्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते, असा विश्वातील एकमात्र धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता! आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला म्हणजेच मोक्षदा एकादशीला ‘गीता जयंती’ साजरी केली जाते. त्यानिमित्ताने...
गीता मे हृदयं पार्थ गीता मे सारमुत्तमम्।
गीता मे ज्ञानमत्युग्रं गीता मेज्ञानमव्ययम्॥
गीता मे चोत्तमं स्थानं गीता मे परमं पदम्।
गीता मे परमं गुह्यं गीता मे परमो गुरुः॥
 
गीता माझे हृदय, गीता माझे सार आहे. गीता माझे अतिउग्रज्ञान आहे. गीता माझे अविनाशी ज्ञान आणि श्रेष्ठ निवासस्थान आहे. गीता माझे परमपद आणि परमरहस्य आहे. गीता परमगुरू आहे, असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेची महती गाताना म्हणतात. महर्षी वेदव्यास गीतामाहात्म्य वर्णन करताना म्हणतात...
 
गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता॥
 
जी स्वतःच भगवान श्रीविष्णूंच्या मुखकमलातून प्रसुत झाली आहे, अशी गीता कंठस्थ करायला हवी. अन्य शास्त्रांच्या विस्ताराने काय लाभ?
 
गीतायाश्चैव माहात्म्यं यथावत्सुत मे वद।
पुराणमुनिना प्रोक्तं व्यासेन श्रुतिनोदितम्॥
 
शौनक आदी ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, पुराणकाळात श्रीव्यासांनी आणि श्रुतींमध्ये वर्णित श्रीगीतेचे माहात्म्य मला सांगावे, तेव्हा सुतांनी म्हटले,
 
यस्माद्धर्ममयी गीता सर्वज्ञानप्रयोजिका।
सर्वशास्त्रमयी गीता तस्माद् गीता विशिष्यते॥
 
गीता धर्ममय, सर्वज्ञान प्रयोजक, सर्व शास्त्रमय अर्थात सर्वशास्त्रांचे सार आहे. गीता श्रेष्ठ आहे. योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून स्रवलेली गीता हे ईश्वराचे वाङ्मयी स्वरूप आहे. गोपाळकृष्णाने मुरलीने जसे गोकुळवासीयांना मंत्रमुग्ध केले तसेच, योगेश्वर श्रीकृष्णांनी ज्ञानमुरलीने विश्वाला मोहित केले. माया-मोहाने व्याप्त आणि हताश झालेल्या कुरुक्षेत्रावरील किंकर्तव्यमूढ अर्जुनाला विषादातून मुक्त करून ‘युद्धाय कृतनिश्चय’ असा महामंत्र देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय. त्याकाळी अर्जुनाला गीता ज्ञानाने युद्धास प्रवृत्त व्हावे लागले, तेव्हापासून आजतागायत अनेकविध ज्ञानी, विद्वत्जन, कर्मयोगी, ऋषिमुनी, संत, समाजसेवक देशकाल परिस्थितीनुरूप जगतातील सर्वांना गीताज्ञानाने कायम आकर्षित केले आहे. गीता अक्षरब्रह्म असून त्याद्वारे मनुष्याला जीवन जगण्याचे कौशल्य प्राप्त होते.
 
क्रोधात्भवतिसम्मोहः सम्मोहात्स्मृति-विभ्रमः।
स्मृति-भ्रंशात्बुद्धि-नाशः बुद्धि- नाशात्प्रणश्यति॥
 
गीता सांगते, क्रोधामुळे संभ्रम होतो. संभ्रमामुळे स्मरणशक्ती जाते. स्मरणशक्ती गेल्याने विवेकबुद्धी नष्ट होते आणि विवेकबुद्धी नष्ट झाल्याने विनाश होतो. पण, एक संयमी आत्मा, जो या सगळ्यांच्यात वावरत असतो, आपुलकी किंवा घृणा या दोन्हीपासून अलिप्त, त्यालाच चिरंतन शांती प्राप्त होते. मनुष्यजीवन हे कुरुक्षेत्राहून वेगळे नाही. मनुष्य जीवन मोह, संमोह, विवेकबुद्धीचा र्‍हास आणि संयमाच्या कुरुक्षेत्रावर गीतेचे तत्त्वज्ञान प्राप्त होणे ही नियंत्याची योजना आहे. योगेश्वराने अर्जुनाला ‘निमित्तमात्र भव सव्यसा’ची असे म्हणून समस्त मानवतेला गीताज्ञान देऊन हताश मनुष्याला जीवनाभिमुख करण्याचा अक्षय प्रयत्न केला आहे. गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे. जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी मानली जाणारी गीता, ही आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखविणारी दिशादर्शक आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता.श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेले ज्ञान, तत्त्वज्ञान हे सर्व गीतेत उलगडत जाते. गीता ज्ञान म्हणजे अखंड आशा, दुर्दम्य आत्मविश्वास आणि चिरंतन प्रत्यत्नांचे भांडार आहे. व्यक्तिविकास आणि जीवनातील कमी-अधिक परिस्थितीत मानवमात्रांची हिंमत बांधून त्यांना विपरीत क्षणातही उभे करणे हे गीतेचे फलित आहे. खरंतर गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा हिंदू धर्मग्रंथ म्हणून मानला जात असला तरी अखंड मानवजातीला प्रेरणापथ दर्शविणारा हा विश्वग्रंथ आहे. समर्थ सद्गुरू देवनाथ महाराज भगवद्गीतेला परमामृत संबोधतात.
 
जयदेवी जयदेवी जय भगवद्गीते
परमामृतरसभरिते अगणित गुणचरिते ॥
भववारण संवारण तारणअघसिंधु
त्वद्गुणश्रवणे पठणे स्वमना उद्बोधु ॥
घडवी उडवी भ्रांती श्रीपती दीनबंधू
अखंड अंतरबाहेर हरि ब्रह्मानंदू ॥
 
कोणत्याही जाती, धर्म व पंथांचा उल्लेख नसलेल्या श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांत सकळ कर्म आणि धर्माचे (‘कर्तव्य’ या अर्थाने)संचित साठलेले आहे.
 
शूर महातेजस्वी रणपंडित योद्धे।
दुर्धर भवभयतारक अष्टादश आध्ये॥
श्रवणे पठणे मनने ज्याचे मन वेधे।
त्याते मिळवी स्वरूप निजात्मनिजबोधे॥
 
शूर, महान, तेजस्वी, रणांमध्ये पंडित, योद्धे अशा सर्वांना दुर्धर भवभयापासून तारणारा महामंत्र म्हणजे १८ अध्यायाच्या माध्यमातून प्रसवलेली गीता होय. ज्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते, असा विश्वातील एकमात्र धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता! मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला म्हणजेच मोक्षदा एकादशीला ‘गीता जयंती’ साजरी केली जाते. सद्सद्विवेकबुद्धीचे जागरण करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचे पठण, मनन आणि चिंतन. पाच हजार वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान जगातील प्रत्येक ठिकाणी लागू होते. गीतेत एकूण १८ अध्याय असून ७०० श्लोक आहेत. यातील ५७४ श्लोक ‘भगवान उवाच’ म्हणजेच श्रीकृष्णांच्या नावे आहेत. अर्जुनाने ८५, संजयाने ४०, तर धृतराष्ट्राने १ श्लोक म्हटला आहे. संजयाने दिव्यदृष्टीच्या साहाय्याने महालात बसून भगवद्गीता आणि महाभारत युद्धाच्या अहवालाचे थेट प्रसारण स्वतः पाहून धृतराष्ट्राला ऐकवले होते. अर्जुनाच्या आधी गीतेचे हे तत्त्वज्ञान सूर्यनारायणाला प्राप्त झाले होते. गीतेला ‘गीतोपनिषद’ असेही म्हणतात. अर्जुनाशिवाय गीता ज्यांनी श्रवण केली ते म्हणजे भक्तराज श्रीहनुमंत, घटोत्कच आणि नागकन्या अहिलावती यांचा पुत्र म्हणजेच भीमाचा नातु बर्बरीक तसेच संजय व त्यांच्याकरवी धृतराष्ट्र. मूळ गीता संस्कृतमध्ये असली, तरी आज जगातील १७५ हून अधिक भाषांमध्ये गीतेचे भाषांतर झालेले आहे. गीतेचे ज्ञान अनंत आणि अविनाशी आहे. म्हणतात ना... ‘हरी अनंत हरिकथा अनंता’ ते श्रीमद्भगवद्गीतेला तंतोतंत लागू होते. आज जगातील अनेक देशात गीतेच्या तत्त्वज्ञानावर संशोधन सुरूच आहे. आज श्री गीता जयंतीच्या पावनदिनी आपण अर्जुनासारखे संकल्पबद्ध होऊन जीवनाचे लक्ष्य ईश्वरप्रदत्त कर्तव्याने पूर्ण करण्याचा शुभसंकल्प करूया...
 
विश्वोद्धारे सारे अद्भुत तव महिमा
वर्णन करिता शिणले शेषश्रुतीब्रह्मा
त्वदर्थग्रहणे दाविसी निजात्मनिजवर्मा
जडतो देवनाथ जननी पदपद्मा
जयदेवी जयदेवी जयभगवद्गीते
परमामृतरसभरिते अगणित गुणचरिते
 

- डॉ. भालचंद्र हरदास
@@AUTHORINFO_V1@@