‘अटल कार्यकर्ता’, ‘अटल नेता...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020
Total Views |

Atal Bihari vajpayee_1&nb
 
 
 
माजी पंतप्रधान, ‘भारतरत्न’ अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. देशाच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या अटलजींचे व्यक्तिमत्त्व अतिशय उत्तुंग होते. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी त्यांचे १९५७ सालापासूनचे खास मित्र, राष्ट्रीय विधी आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ एन. एम. उपाख्य आप्पासाहेब घटाटे यांनी दिलेला उजाळा.
 
 
 
अटल बिहारी वाजपेयी यांना मी पहिल्यांदा भेटलो ते १९५७ साली. त्यावेळी मी नागपूरहून दिल्लीला वकिलीच्या शिक्षणासाठी आलो होतो आणि अटलजी प्रथमच लोकसभेत निवडून गेले होते. तसे अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी मी नागपूरमध्ये असल्यापासूनच ऐकले होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना त्यांच्याविषयी असलेला विश्वासही मला ठाऊक होता. त्यानंतर दिल्लीमध्ये मी त्यांची लोकसभेतील भाषणे ऐकली, त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे एकप्रकारची वैचारिक मेजवानीच असे. अटलजी त्यावेळी दिल्लीत ३, राजेंद्र प्रसाद रोडवर राहत असत. मी एके दिवशी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितले की, “मी, तुमचे प्रत्येक भाषण ऐकले आहे.” तेव्हापासून माझी त्यांच्यासोबत अगदी घनिष्ठ मैत्री झाली. खरे तर मी त्यांच्यापेक्षा वयाने जवळपास १३ वर्षांनी लहान होतो. मात्र, अटलजींनी त्याचा कधीही विचार केला नाही. ते अगदी मनमोकळेपणाने माझ्याशी संवाद साधत असत, त्यामुळे मलादेखील त्यांच्यासोबत बोलताना कधी संकोच किंवा भीतीही वाटली नाही. अटलजींच्या सुरुवातीच्या भाषणांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते तेव्हा प्रत्येक विषयावर बोलत असत. कारण तो काळ म्हणजे पं. जवाहरलाल नेहरू यांच्या करिष्म्याने भारलेला होता. त्यामुळे आपोआपच अन्य राजकीय पक्षांना तेव्हा फार काही करायची संधी मिळत नसे. त्यात भारतीय जनसंघ संख्येच्या बाबतीत तर अगदीच नगण्य. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हेच एक प्रमुख नाव होते, त्यामुळे भारताचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था, परराष्ट्र धोरण, संरक्षण अशा सर्व विषयांवर बोलण्याची जबाबदारी आपोआपच त्यांच्यावर येत असे, त्यामुळे अटलजींचे वाचनही चौफेर होते, हिंदीसह इंग्रजी साहित्यही हे खूप वाचत असत. त्यामुळे त्यांच्या भाषणांमध्ये संदर्भ, काही वेगळे किस्से ऐकायला मिळत असत.
 
 
परराष्ट्र धोरणावर अटलजींचा विशेष अभ्यास होता. त्यावर लोकसभेत केलेल्या त्यांच्या भाषणांचे नेहमीच कौतुक व्हायचे, एक ते दोन वेळा तर खुद्द पंतप्रधान पं. नेहरूंनीही अटलजींच्या भाषणांचा कौतुकाने उल्लेख केला होता. लोकसभेतला एक प्रसंग तर फारच हृदयस्पर्शी आहे - अटलजींनी १९५८ साली एकदा परराष्ट्र धोरणावर अगदी शुद्ध हिंदीमध्ये भाषण केले, लोकसभेतला प्रत्येक सदस्य अगदी तल्लीनतेने ते ऐकत होता. पंतप्रधान पं. नेहरू यांनीही त्या भाषणाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, अटलजींच्या भाषणाला उत्तर देण्यासाठी हिंदीमध्ये भाषण करण्याची परवानगी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे मागितली होती आणि पंडितजींनीही हिंदीमध्ये आपले भाषण केले होते. यावरून अटलजींच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. जनसंघाचे तेव्हा फक्त चार खासदार लोकसभेत निवडून आले होते. त्यामुळे जनसंघाची भूमिका प्रस्थापित करणे, देशाच्या धोरणांविषयी बोलणे आणि काँग्रेसला एक पर्यायही तयार करणे, अशी तिहेरी जबाबदारी अटलजींवर होती; अर्थात आव्हान स्वीकारण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने ही जबाबदारी त्यांनी अगदी लीलया पेलली. तेव्हा संसदेमध्ये प्रत्येक विषयावर अगदी सविस्तर चर्चा होत असे, अतिशय उत्तमोत्तम भाषणे त्याकाळी ऐकायला मिळत असत. त्यात अटलजींचे भाषण वेगळे ठरे, तेव्हापासूनच अटलजी आणि वक्तृत्व हे समीकरण तयार झाले.
 
 
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यावरही त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अटलजी अगदी शांत होते. कारण आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे त्यांच्या डोक्यात पक्के होते. आणीबाणी लादल्यावर इंदिराविरोधी नेत्यांना तत्काळ अटक करण्यात आली होती. त्यात अटलजी, आडवाणीजीही होते. त्यावेळी मला आडवाणीजींची तार आली की, मी तातडीने बंगळुरूला यावे. कारण त्यांना तेथेच अटक करून तुरुंगात टाकले होते. तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते, मी त्यांना भेटायला गेलो तर अटलजी तुरुंगाचे गरम कपडे घालून अगदी निवांत बसले होते. मी विचारले की, “आता पुढे काय?” तर त्यावर त्यांच्या मिश्किल स्वभावाला अनुसरून म्हणाले, “कुछ नहीं, अब इंदिरा गांधी खाना खिलाएगी और इंदिरा गांधी कपडा देगी। हमें कुछ खर्च नहीं करना हैं।” आणीबाणीमध्ये पुढे काय होणार, याचेही अटलजींचे आडाखे अगदी तंतोतंत खरे ठरले होते. पुढे आडवाणीजी म्हणाले की, “आता लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले की सर्वांची सुटका होईल.” मात्र, तेव्हाच अटलजी स्पष्ट म्हणाले होते की, “असे काहीही होणार नाही, पुढे बराच काळ तुरुंगात काढायची आता तयारी ठेवा.”
 
 
मात्र, तुरुंगात असतानाही अटलजींनी पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष केले नाही, हे विशेष. कारण त्यामुळेच पुढे निवडणुकीत जनसंघ उल्लेखनीय कामगिरी करू शकला. त्यावेळी अटलजींच्या नेतृत्वाची कसोटी होती आणि त्यात ते अगदी यशस्वी ठरले. कारण आणीबाणी कधी संपणार, कार्यकर्ते-नेत्यांना कधी सोडणार, याची काहीही शाश्वती नव्हती. एकूणच सगळीकडे प्रचंड नैराश्याचे वातावरण होते. त्यावेळी माफी मागून आपण तुरुंगातून सुटका करून घ्यावी, असाही एक सूर होता; अर्थात तेव्हा माफी मागून सुटले असते तर अनेक नेत्यांची राजकीय कारकिर्द तेव्हाच संपली असती. त्यामुळे हा विचार अर्थातच पुढे जाऊ शकला नाही. मात्र, अटलजींनी तुरुंगात असलेले नेते-कार्यकर्ते यांच्या कुटुंबीयांची काळजी घेतली. त्यांनी त्यासाठी मला निरोप पाठविला आणि सांगितले की, “आपल्या भूमिगत नेत्यांना पैसे गोळा करायला सांगा आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या घरात पैसे बरोबर पोहोचतात की नाही, हे बघा.” कारण आणीबाणीमध्ये तुरुंगात असलेली मंडळी काही आर्थिकदृष्ट्या संपन्न नव्हती आणि घरातील कर्ता व्यक्तीच तुरुंगात असल्यावर घराचे किती हाल होत असतील, याची जाणीव अटलजींना होती. यावरून अटलजी हे केवळ पक्षप्रमुख नव्हते, तर एक कुटुंबप्रमुख होते, हे दिसून येते. त्यामुळेच कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कुटुंबीयांचेही पक्षासोबत एक अतुट नाते निर्माण झाले.
 
 
त्याचप्रमाणे पक्ष संघटना कशी सांभाळायची, पक्ष संघटनेला कशी दिशा द्यायची, याविषयी अटलजींचे नेतृत्व अगदी समर्थ होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना वास्तवाची जाणीव होती. त्यामुळे त्यांना एकदा त्यांचे सहकारी मलकानी यांना, विद्याचरण शुक्ला, ओम मेहता यांच्याकडे पाठवून आणखी किती काळ हे चालणार, अशी विचारणा करायला सांगितले. तेव्हा कृष्णकांत वगैरे मंडळींनी मला विचारले की, “अटलजींनी असा एकतर्फी संवाद कसा सुरू केला?” मग मी त्यांना अटलजींकडे भेटायला घेऊन गेलो. अटलजींनी सर्व ऐकून घेतले आणि अगदी स्पष्टपणे म्हणाले, “मी, काही हौस म्हणून संवाद सुरू केला नाही. पण, आमच्या पक्षाचे २० हजार कार्यकर्ते तुरुंगात आहेत, तुमचे फार फार तर हजार-दोन हजार. त्यामुळे तुरुंगात किती काळ राहायचे याला मर्यादा आहेत. एकदा तुरुंगातून बाहेर पडलो की, पुन्हा नव्याने राजकारणाचा डाव मांडता येईल. त्यामुळे अगोदर तुरुंगातून बाहेर येणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.”
 
 
 
आणीबाणीनंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी तयार करायचे ठरविले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर इंदिरा गांधींनी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. त्यात अटलजी म्हणाले की, “आमच्या कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका केल्याशिवाय आम्ही निवडणूक लढणार तरी कशी?” त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या की, “हळूहळू कार्यकर्त्यांचीही सुटका होईल.” मात्र, त्या बैठकीत अटलजी अगदी स्पष्ट शब्दांत म्हणाले, “ज्या चतुराईने तुम्ही एका दिवसात हजारो कार्यकर्त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकले, तसेच आता एका दिवसातही त्यांना सोडता येईलच.” अर्थात, पुढे जनता पक्षामध्ये मोरारजी देसाई, चंद्रशेखर वगैरे मंडळींनी विनाकारण दुहेरी निष्ठेचा मुद्दा उकरून काढला. कारण जनसंघाचे त्यात असलेले प्राबल्य या मंडळींना रुचत नव्हते. अर्थात, जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. कारण त्यामुळेच मग पुन्हा अटलजींच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना होऊ शकली.
 
 
भाजपला अटलजींनी खास आपल्या पद्धतीने आकार दिला. पुढे अटलजी पंतप्रधान झाले, तेव्हाचा काळ भारतासाठीही अतिशय महत्त्वाचा होता. अटलजींनी परराष्ट्र, संरक्षण, अर्थ या विषयांवर एक वेगळा विचार प्रस्थापित केला. त्यांनी राबविलेल्या योजना म्हणजे महामार्ग बांधणी, सुवर्ण चतुष्कोन योजना, सागरमाला योजना, नदीजोड प्रकल्प हे तर अतिशय महत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते. त्यांच्या काळात प्रशासनालाही त्यांनी गती देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारीदेखील अतिशय तोलामोलाचे होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते, म्हणजे पंतप्रधान म्हणून अंतिम निर्णय अटलजींचा असला, तरीही मंत्र्यांच्या निर्णयांमध्ये त्यांनी ढवळाढवळ केली नाही. विशेष म्हणजे, तब्बल २३ पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालविणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, तब्बल ५० वर्षे अटलजी सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. ते काही दरबारी राजकारणी नव्हते, त्यामुळे ५० वर्षांत त्यांनी देशाचा कानाकोपरा पालथा घातला होता. देशातल्या प्रत्येक भागातल्या प्रश्नांची त्यांना जाण होती आणि तो प्रश्न सोडविण्यासाठी काय करायचे, हेदेखील त्यांना माहिती होते. त्याचप्रमाणे बदलत्या परिस्थितीसोबतही त्यांनी देशाला जोडून घ्यायचे काम केले. देशात झालेली संचारक्रांती-मोबाईल क्रांती ही अटलजींच्या काळातच झाली, हे विसरून चालणार नाही.
 
 
अटलजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक प्रकारची चुंबकीय शक्ती होती. प्रत्येक व्यक्तीला ते आपलेसे करून घ्यायचे, प्रत्येक विषय कमीत कमी वेळात समजून घ्यायचे. त्यावेळीही आणि आताही अटलजींएवढा देशाच्या सामाजिक - राजकीय परिस्थितीचा अभ्यास असणारा नेता होणे नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव उपाख्य गोळवलकर गुरुजी यांचा त्यांच्या नेतृत्व गुणांविषयी ठाम विश्वास होता. गुरुजींनी अगदी थेट तसे कधी दाखविले नाही. अगदी सुरुवातीपासून म्हणजे १९५७ सालापासून प्रत्येक निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी यांचेच छायाचित्र प्रमुख असे. त्यांनाच नेता म्हणून पुढे करण्यात येत असे. त्यामुळे अटलजींना देशाचा नेता म्हणून तयार करण्याचा गुरुजींचा मानस होता, असे मला वाटते. विशेष जनसंघ आणि पुढे भाजपमध्येही नानाजी देशमुख, कुशाभाऊ ठाकरे, लालकृष्ण आडवाणी आदी मोठे नेते होतेच. मात्र, ज्यावेळी नेतृत्वाचा प्रश्न येत असे, तेव्हा ही सर्व मंडळी एकमुखाने अटलजींना पाठिंबा देत असत. त्याचे मुख्य कारण म्हणजे, अटलजींचा देशाचा अभ्यास आणि अगदी प्रत्येकासोबत संवाद साधू शकण्याची हातोटी. त्यामुळेच स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासाचा विचार करता अटलजींसारखे नेतृत्व फारच दुर्मीळ आहे, असे माझे ठाम मत आहे.
 
 
 
- एन. एम. घटाटे
(शब्दांकन : पार्थ कपोले)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@