एकाची डोळेझाक, तर दुसऱ्याची कारवाई
विभाग अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
मुंबई: मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा ऐकायला येतात. मात्र एका विभाग अधिकाऱ्याच्या काळात अनधिकृत बांधकामे होतात, तर दुसऱ्या विभाग अधिकाऱ्याच्या काळात ती तोडली जातात, असा अजब कारभारही चालतो. त्यामुळे डोळेझाक करणाऱ्या विभाग अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांकडून देण्यात आले आहेत.
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला २२ ऑक्टोबरला आग लागली होती. या मॉलमध्ये अनेक गाळे बेकायदा बांधण्यात आल्याचे उघड झाले. या बांधकामामुळे आणि ज्वलनशील वस्तूंमुळे आग लागल्याचे समोर आले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याचा अहवाल अजूनही स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलेला नाही. विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, डी विभागाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी या मॉलमधील सुमारे २०० अनधिकृत गाळ्यांवर हातोडा चालवला. मात्र तत्कालीन विभाग अधिकारी विश्वास मोटे यांनी या बांधकामांकडे दुर्लक्ष केले. या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.

या अनधिकृत गाळ्यांच्या बांधकाम प्रकरणी दीड वर्षापूर्वी नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस देऊन दुर्लक्ष करण्यात आले. डी वॉर्डच्या प्लॅनमध्ये २०० गाळे आहेत. मग इतर गाळ्यांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न समाजवादीचे रईस शेख यांनी उपस्थित केला. "त्या मॉलमध्ये अग्निरोधक साहित्य नाही. मात्र त्याबाबत अग्निशमनदल नोंदच घेत नाही. मागणी करूनही स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही. आता स्ट्रक्चरल ऑडिट होत आहे. त्या मॉलची एनओसी आता रद्द करण्यात येत आहे. आपण त्या मॉलमधील बेकायदा बांधकामाबाबत सीआयडी चौकशी मागितली आहे." आमदार असलेले नगरसेवक रईस शेख यांनी सांगितले. या मॉलची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल देण्यात यावा, अशी मागणी रईस शेख यांनी केली.