चिरतरुण पर्यावरणप्रेमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020
Total Views |

Vijaykumar Katti_1 &
 
 
 
वय वाढले की, कामे झेपत नाहीत, जगणे असह्य होते, अशा तक्रारी ज्येष्ठ नागरिक करतात. परंतु, साठी उलटलेले चिरतरुण पर्यावरणप्रेमी विजयकुमार कट्टी उमेदीने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा हा आढावा...
 
 
 
ठाण्यातील बाळकुम परिसरातील बहुमजली इमारतीत २८व्या मजल्यावर पूर्व-पश्चिम दिशेच्या नैसर्गिक प्रकाशमान घरात पत्नी व मुलासोबत विजयकुमार कट्टी राहतात. गेली अनेक वर्षे ते तरुणांना लाजवेल अशा जोशात पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त शहरे यावर काम करत आहेत.
 
 
मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये इंच इंच जागेला सोन्याचे मोल आहे. अनेकांना घरासमोर बाग हवी असते, तर काहींना निसर्गाच्या सान्निध्यात निवारा हवा असतो.घर कितीही मोठे असले, तरी जागा कमीच पडते. असं असतानाही ठाण्यातील साठी उलटलेले वयोवृद्ध पर्यावरणप्रेमी विजयकुमार कट्टी यांनी घरातच भली मोठी बाग फुलवली आहे. आतापर्यंत घराच्या गॅलरीमध्ये किंवा किचनमध्ये झाडे लावलेली पाहिले असेल.पण, कट्टी यांनी चक्क आपल्या बेडरूम आणि गॅलरीमध्ये बाग तयार केली आहे. या बागेत २७५ छोटी-मोठी, फळाफुलांची, सुगंधी, औषधी, मनिप्लांट अशी निरनिराळ्या प्रकारची झाडे एखाद्या बागेत लावतात, तशी बेडरूममध्ये लावली आहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते एक-एक झाड जमवून शक्यतो मातीच्या कुंड्यांमध्ये लावतात. यातील काही कुंड्या त्यांनी टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केल्या आहेत.
 
लोकांनी रस्त्यावर फेकलेल्या झाडांच्या फांद्या किंवा झाड कटिंग करून त्याच ठिकाणी टाकलेल्या फांद्या जमवून ते घरी आणून घरातीत बागेत लावतात. कोरोना ‘लॉकडाऊन’ काळात अनेकांनी आपला वेळ इतर कामांसाठी व्यर्थ घालवला असेल. पण, कट्टी यांनी चक्क झाड जमवून घरातच बाग फुलविली. त्यांचे असेही म्हणणे आहे की, “घरी असल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यासारखे वाटते. सकाळी झोपेतून उठल्यावर निसर्गाच्या कवेत मन अगदी प्रसन्न होऊन जाते. त्यामुळेच, या कोरोनाच्या काळात ताण-तणावमुक्त जीवन जगता आले.” सूर्यप्रकाशाची गरज नसलेल्या प्रजातीतील अनेक रोपटी व झाडे त्यांच्या या बागेत आहेत. मनिप्लांटच्या १७ पैकी सहा प्रजाती कट्टी यांच्या घरात जोमाने वाढत आहेत.
 
वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली जात असली, तरी नागरी विकासकामे अथवा इतर कामासाठी झाडांची बेसुमार कत्तल होतच असते. वही-पुस्तकासाठी लागणारा कागदही झाडे नष्ट करूनच बनवला जातो. १५ ते २० आयुर्मान असलेल्या एका वृक्षापासून साधारणतः ५५ किलो कागदाची निर्मिती होते. अध्ययनासाठी लागणारी वह्या-पुस्तकांची निर्मिती करताना तर मोठ्या प्रमाणात लाकूडफाटा लागतो, त्यासाठी अनेकदा लहान-मोठ्या वृक्षांचा बळी दिला जातो. आताच्या संगणकीय युगातदेखील शाळा-महाविद्यालयात वही आणि पुस्तकांना तेवढंच महत्त्व आहे. चित्रकला, गणित आदी विषयांच्या सरावासाठी रफ कागद (वही) लागत असताना याला पर्यायी वॉटरप्रूफ इकोफ्रेंडली कागद पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी तयार केला आहे. ९० टक्के उसाचे चिपाड, इतर पर्यावरणपूरक वस्तू आणि पाच टक्के प्लास्टिक आदी साहित्य मिश्रण करून त्यांनी या कागदाची घरच्या घरी निर्मिती केली आहे. या इकोफ्रेंडली कागदावर वॉटर कलर किंवा स्केचपेनने रेखाटलेले काहीही, कागदावर पाणी टाकले की स्वच्छ पुसले जाते.
 
‘ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण वाढले...’ अशी टीका करण्यापेक्षा प्रत्येकानेच झाडे लावून ती जगविल्यास निसर्गाचा र्‍हास थांबण्यास मदत होईल. झाडं लावल्याने काही अंशी तरी ऑक्सिजनची निर्मिती आपण करू शकतो. झाडे लावण्यामागे प्रदूषण कमी करणे, झाडांमुळे पशू-पक्ष्यांसह मानवालाही अन्नधान्य पुरवठा होतो, तसेच आपल्या शेतीप्रधान देशाची संस्कृती जपली जाते, अशी त्रिसूत्री सांगणाऱ्या कट्टी यांच्या उपक्रमांची कीर्ती सातासमुद्रापार पसरत असून समाजात पर्यावरणप्रेमाचे बीज अंकुरावे! यासाठी वेबिनार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
 
‘विसॅक फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून नित्यनेमाने पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या कट्टी यांनी कोरोनाकाळातही मोलाची कामगिरी बजावली आहे. कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस स्वच्छता आणि सामाजिक अंतर राखण्याचा संदेश देत असताना कट्टी मात्र पोलिसांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी झटत होते. ‘लॉकडाऊन’मध्ये सर्व जण जेव्हा घरात बसले होते, तेव्हा कट्टी आपल्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन पोलिसांच्या गाड्या निर्जंतुकीकरण करून स्वच्छ करण्यासाठी शहरात वणवण करीत होते. पोलीस ठाणे, रुग्णालय, सोसायटीमध्ये जाऊन वाहनांसह परिसरही निर्जंतुकीकरण करीत होते. सिल्व्हर हायड्रोजन पॅरॉक्साईडचे मिश्रण प्रेशरने फवारणी केल्यास विषाणूसह बुरशी, बॅक्टेरिया नष्ट होतात. तेव्हा, प्रत्येकानेच आपापल्या परिसरात स्वच्छता राखल्यास कोरोना आपले काहीच बिघडवू शकणार नाही, असा संदेशच कट्टी यांनी समाजात पोहोचविण्याचे काम केले.
 
सध्या विजयकुमार कट्टी हे प्लास्टिक विरोधी मोहिमेवर काम करीत आहेत. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील प्लास्टिक वेष्टने रस्त्यावर फेकली जातात. या प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्याबाबत समाजस्तरावर जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत ते व्यक्त करतात. छोट्या-छोट्या मातीच्या कुल्हडमधून हल्ली पदार्थ मिळतात, हे कुल्हडही नागरिक कचऱ्यात फेकून देतात. त्यापेक्षा ‘कुल्हड घेऊन या आणि झाडं घेऊन जा,’ असं आवाहनही कट्टी करतात. त्यांच्या पर्यावरणीय उपक्रमाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
- दिपक शेलार
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@