सन्मार्ग, सत्कर्म, दातृत्वाची त्रिवेणी!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020
Total Views |

s_1  H x W: 0 x
 
 
 
मा प्र गाम पथो वयं मा यज्ञादिन्द्र सोमिन:।
मान्त: स्थुर्नो अरातय:॥
 
 
(ऋग्वेद - १०.५७.१, अथर्ववेद- १३.१.५९)
 
 
अन्वयार्थ
 
 
(इन्द्र) हे ऐश्वर्यशाली परमेश्वरा! (वयं) आम्ही सर्वजण (पथ:) सन्मार्गावरून (मा प्र गाम) कधीही विचलित होता कामा नये. (सोमिन:) ऐश्वर्याने परिपूर्ण होत आम्ही (यज्ञात्) यज्ञादी परोपकारी मार्गावरून (मा) कदापी दूर होता नये. (न: अन्त:) आम्हा सर्वांच्या अंत:करणात (अरातय:) दानहीनता, कंजूष व चेंगटवृत्तींचे (मा स्थु:) अस्तित्व अजिबात असू नये.
 
 
विवेचन
 
 
वेदांनी नेहमीच चांगल्या व कल्याणकारी विचारांबाबत विधेयात्मक तर वाईट व अनिष्ट गोष्टींबाबत निषेधात्मक विचार मांडले आहेत. यामागचा एकमेव उद्देश हाच की, मानव हा खऱ्या अर्थाने मानव बनावा व त्याचे सर्व दृष्टीने कल्याण साधावे! याच अनुषंगाने उपरोक्त मंत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे. आम्ही सदैव सन्मार्ग अंगीकारत पवित्र अशा मंगलमय कार्यात व्यस्त राहावे आणि ज्या काही अनिष्ट वृत्ती आहेत, त्यांपासून दूर राहावे. हा दिव्य संदेश जगातील प्रत्येक मानवाच्या हृदयात उतरला, तर सारे विश्व शाश्वत सुखाने मार्गक्रमण करीत राहील.
 
 
मंत्रात तीन वेळा माया नकारात्मक वचनाचा प्रयोग झाला आहे. आज्ञार्थ वाक्यांशी नकारार्थी भाव जोडावयाचा असेल तर क्रियापदाच्या पूर्वी ‘मा’ (नको) या शब्दाचा उपयोग केला जातो. ईश्वराचा परम भक्त स्वतःला अनिष्ट वृत्तींपासून दूर राहण्याकरिता व्याकूळ अंतःकरणाने व दीनहीन भावनेने काहीतरी मागत आहे. ज्याच्याकडे मागावयाचे, तो लहान-सहान असता नये. जो स्वतः दरिद्र असतो, तो दुसऱ्यांना काय देणार? म्हणूनच इथे परमेश्वरासाठी ‘इंद्र’ हे संबोधन आले आहे. ‘इदि परमैश्वर्ये’ या धातूला ‘रन्’ हा प्रत्यय जोडल्याने इंद्र शब्द तयार होतो. इंद्र या शब्दाची व्याख्या करताना प्रख्यात वेदज्ञ महर्षी दयानंद आपल्या ‘सत्यार्थप्रकाश’ या ग्रंथात म्हणतात - य: इन्दति परमैश्वर्यवान् भवति, स: इंद्र: परमेश्वर:। म्हणजेच जो स्वतः महान अशा ऐश्वर्यभावनेने परिपूर्ण तसेच जो सर्व दृष्टीने श्रीमंत आहे आणि जो आपल्या शक्तीने समग्र जगावर आध्यात्मिक व भौतिक ऐश्वर्याचा वर्षाव करतो, असा परमात्मा इंद्र आहे. अशा परमेश्वराचे आपल्या इंद्र या एकमेव इष्ट देवतेकडे श्रद्धेने आळवणी करीत आहेत. त्यांची ही उत्कट याचना तीन भागात विभागली गेली आहे.
 
 
१) मा प्र गाम पथ:।
२) मा प्र गाम यज्ञात्!
३) मा अन्तः स्थूर्नो अरातय:!
 
 
भक्त म्हणतात, “आमची वाट चुकता कामा नये. आम्ही पवित्र व सुयोग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न करू. आमची भटकंती ही आम्हास दुःखाच्या खाईत लोटणारी आहे. मुबलक धन जरी मिळाले किंवा जगण्याची साधने जरी उपलब्ध झाली, पण पोहोचण्याचे अंतिम श्रेष्ठ ठिकाण किंवा कर्मस्थळ जर मिळालेच नाही, तर काय उपयोग? समजा, एखाद्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने विकसित झालेले कार-वाहन असेल, पण त्यात बसणाऱ्या वाहनमालकाचा प्रवास हा विपरीत दिशेने होत असेल तर तो कदापि आपले इप्सित स्थान व साध्य प्राप्त करू शकणार नाही. तसेच त्याला खऱ्या अर्थाने सुख पण मिळू शकणार नाही. आजच्या माणसाची अवस्था अशीच झाली आहे. सर्व काही मिळूनदेखील माणसे अशांत व दु:खी आहेत. कारण, शाश्वत सुखाचा व अध्यात्माचा सुयोग्य असा रस्ताच मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा प्रवास हा दुःखाचे कारण ठरतोय. यासाठीच आळवणी आहे, “हे देवा! वयं (दु:) पंथ: मा प्र गाम!” आम्ही आमच्या जीवनाचा रस्ता विसरता नये. वाईट मार्गापासून आम्ही सदैव दूर राहोत. भगवंताच्या उपासकांनी पुन्हा मागितले आहे, “वयं यज्ञात् मा प्र गाम !” आम्ही श्रेष्ठ कर्मांपासून दूर राहता नये. यज्ञ म्हणजेच पवित्र शुभ कर्म! शतपथ ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे - “यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्मम्!” या जगात यज्ञासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ कार्य होऊ शकत नाही.
 
 
यज् देवपूजादानं संगतिकरणम्! या जगात जे चेतन (माता, पिता, गुरु आचार्य, संत, ज्ञानी, विद्वान) व जड (सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश आदी) दिव्य तत्त्वे आहेत, त्यांचा यथोचित सन्मान व आदर करणे म्हणजेच यज्ञ होय. आपल्या पवित्र हातांनी गोरगरिबांना किंवा दीन-दुःखितांना जे काही देता येईल अथवा आपल्या ज्ञान व विद्येच्या कमाईतून जगाला प्रदान करता येईल, यालाच ‘यज्ञ’ असे म्हणतात. साधु, संत, थोर, महात्मे किंवा ज्ञानीजनांच्या संगतीत राहून आपल्या जीवनाला सार्थक करणे, म्हणजेच नेहमी सत्संग करणे यालादेखील ‘यज्ञ’ म्हणतात. त्याचबरोबर परोपकाराच्या भावनेने जितके काही चांगले करता येईल, मग ते समाज, राष्ट्र किंवा विश्वाच्या कल्याणासाठी असेल, तेदेखील यज्ञच होय. अशा या यज्ञकार्यापासून आम्ही कदापि वंचित असता नये. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर पवित्र अंतःकरणाने व परोपकाराच्या भावनेने शुभ कर्म! विविध प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी गोघृत, औषधी वनस्पतींच्या समिधा आणि विविध द्रव्य पदार्थांची म्हणजेच शुद्ध सामग्रीची देण्यात येणारी आहुती हादेखील यज्ञ होय. अशा या यज्ञकार्यांपासून आम्ही कधीही दूर होता कामा नये. सामूहिक रुपाने हे समाज व राष्ट्राचे यज्ञकार्य सतत अखंडितपणे प्रज्वलित राहावयास हवे. अन्यथा यज्ञाविना त्या राष्ट्राची हानी झाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
भगवंताने मानवाला बुद्धीचे सर्वश्रेष्ठ वरदान दिले आहे. याच बुद्धीच्या बळावर तो आपल्यासह इतर जीवसृष्टीचे कल्याण साधतो. यासाठी माध्यम ठरते ती दानशीलता! इतर प्राण्यांखेरीज दातृत्व भावना हा महत्त्वाचा गुणधर्म आहे. याच दानीवृत्तीमुळे त्याची श्रेष्ठता व ज्येष्ठता सिद्ध होते. पण स्वार्थाच्या वशीभूत होऊन मानव कंजुष व चेंगट बनतो. याकरिता मंत्रात ‘अरातिहा’ शब्द आला आहे. जो कधीही देत नाही. त्याचे सर्व प्रकारचे धन हे असून नसल्यासारखेच! म्हणूनच दान हा माणसाचा सर्वात मोठा अलंकार होय. आचार्य भर्तृहरी म्हणतात,
 
 
“दानेन भूतानि वशी भवन्ति,
दानेन वैराण्यपि यान्ति नाशम्।
परोऽपि बन्धुत्वमुपैति दानै:,
दानं हि सर्व व्यसनानि हन्ति॥”
 
 
इतका दानाचा महिमा वर्णिला आहे. मग आम्ही याबाबत आळस व प्रमाद का करावा? आपल्यातील कंजुष भावनेला दूर सारावे आणि ते सतत इतरांना वितरीत करीत राहावे. म्हणूनच वेदमंत्र म्हणतो -
 
 
‘मान्त: स्थूर्णो अरातय:!’
 
 
आम्हा सर्वांमध्ये दानहीनतेची भावना कदापि असता नये. आम्ही सतत इतरांसाठी काहीना काही देत राहावे. मंत्रातील वरील तीन प्रार्थना आमचे जीवन यशस्वी करण्याकरिता अतिशय उपयोगी ठरोत, हीच कामना!
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@