वैदिक सणांचे योग रहस्य - भाग-९

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020
Total Views |

fest_1  H x W:
 
 
 
निरोगी आणि दीर्घ जीवनाकरिता आवळ्याचे महत्त्व आयुर्वेदात फार आहे. याच आवळ्याचा उपयोग पुढे द्वादशीला तुळशी विवाहात करतात. याच आवळ्याचे प्राशन करून च्यवन भार्गव ऋषीला तारूण्य प्राप्त झाले होते. 'च्यवनप्राश' उत्तम आणि दीर्घ जीवनाकरिता वापरतात. त्याच दिवशी गोपाष्टमी साजरी करतात. कृष्ण आठवा, योगमार्ग आठ भागांचा आणि त्यामुळे जो याचा अवलंब करून आत्मज्ञान प्राप्त करेल तोच पुढे भगवान श्रीकृष्ण होऊ शकेल. इंद्रियातील गुप्तशक्तींना साक्ष ठेवून भगवान श्रीकृष्ण बनायचे, हा हेतू गोपाष्टमी साजरी करण्यात आहे. एकादशीला 'विष्णू प्रबोधिनी' एकादशी असते. मागे शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवान श्रीविष्णू आज जागृत होतात म्हणून या एकादशीला 'विष्णू प्रबोधिनी एकादशी' म्हणतात. 'विष्णुप्रबोधनोत्सवा'च्या दिवशी पंढरपूरची यात्रा असते. एकादशीला जागृत झालेल्या भगवंतांचा विवाह द्वादशीला तुळशीशी लागतो.
 
तुलसी विवाह आणि चातुर्मास्य समाप्ती
 
 
द्वादशीला चातुर्मास्य समाप्ती होऊन तुळशीचा विवाह भगवान श्रीकृष्णासोबत लावण्यात येतो. श्रीकृष्णाचा विवाह तुळशीसोबत का लावतात, याचे रहस्य माहीत नसल्यामुळे परकीय लोक तर तुळशी विवाहाची थट्टा करतात व आमच्या धार्मिक उत्सवाच्या बाबतीतील आमच्या माहितीला आव्हान देतात आणि खरेच आहे. नरकासुराचा वध करून त्याच्या १६,१०० बायकांशी (योगनाड्यांशी)लग्न लावल्यानंतर आता भगवंताला तुळशीशी विवाह करण्याची आवश्यकताच काय? तुळशी विवाहानंतर हिंदूंच्या लग्नांच्या तिथ्या मोकळ्या होतात. ही तुळस कोणी मानव होती की तुळशीचे झाडच आहे? वैदिक लोकांना पशु, पक्षी, वनस्पती आणि जड वस्तू यांत भेद नसतो, असे तुळशी विवाहाबद्दल काहीजण सांगतात. सगळ्यांना जर सारखेच मानायचे तर मग आम्हीसुद्धा मानव वंशातील स्त्री जातीशी लग्न न लावता झाडांशीच लग्न का करू नये? अशा वृत्तीने सत्यजीवनाची प्राप्ती तर होणार नाहीच, पण सत्यशोधनसुद्धा व्हायचे नाही. तुलसी विवाहात काय रहस्य आहे हे पाहिल्याशिवाय भगवंतांनी तुळशीसारख्या एका वनस्पतीशी लग्न का लावले, याचा बोध होणार नाही आणि तुलसी विवाहावर टीका करणाऱ्यांना समर्पक उत्तर देता येणार नाही.
 
 
तुलसी विवाह समजण्याकरिता आणखी एक कथा समजणे आवश्यक आहे. एकदा भगवान श्रीकृष्णाची तुला झाली. एका पारड्यात भगवंत, तर दुसऱ्या पारड्यात सुवर्णाच्या राशी! पृथ्वीवरील सारे सुवर्ण दुसऱ्या पारड्यात ओतले, पण भगवंताची तुला होईना. अनंत कोटी ब्रह्मांडनायकाची तुला कोण आणि कशाने करणार? आता भगवान श्रीकृष्णाला तुल्य काय आहे? शेवटी रूक्मिणीने एक तुलसीदल दुसऱ्या पारड्यात टाकले आणि भगवंताची तुला झाली. भगवंतांना तोलणारी तुल्यशक्ती म्हणजे रूपकात्मक अशी तुलसी. तुलसी म्हणजे भगवंताची शक्ती. भगवंताला जसे अस्तित्व आहे तद्वत भगवंताच्या शक्तीलाही आहे. ही तुल्यशक्ती स्त्रीरूप मानल्यामुळेच प्रत्येक हिंदू देवांना स्त्रिया कल्पिल्या आहेत. वास्तविक जड शरीर सोडल्यास लिंगभेद कोठेच नाही. सूक्ष्मशरीर आणि आत्म्याच्याही पलीकडे परमेश्वर अवस्था आहे. भगवान रामकृष्ण म्हणतात, चालणारा व वेटोळे घालून बसलेला नाग जसा एकच, तद्वतपुरुष आणि प्रकृती दोन्ही एकच आहेत. म्हणून द्वादशीला तुळशीचे लग्न श्रीकृष्णाशी लावतात.
 
 
चातुर्मास्य समाप्ती
 
 
शयनी एकादशीला भगवंत क्षीरसागरात शयन करते झाले. प्रबोधनी एकादशीला जागे झाले, आता तर त्यांचे लग्न झाले. आता संयमाची द्वारे उघडी व्हायला नको का? चातुर्मास्याचे सारे संयम आता मोकळे होतात. भगवंताच्या विवाहात आवळे वाहिल्यानंतर कांदे-वांगे आता काय विकार करणार? आवळा म्हणजे रसायनेश्वर! त्यापुढे कांदे-वांग्याचे काय चालणार? चातुर्मास्य संपतो आणि नित्य जीवन चालू होते. सर्व प्राप्त झाल्यानंतर चातुर्मास्याची आवश्यकताच नसते.
 
 
धनत्रयोदशी आणि वैकुंठ चतुर्दशी
 
 
त्रयोदशीला धनतेरस करतात. आजच्या दिवशी सर्व गोधनाचे पूजन करतात. तुलसी विवाहाच्या रूपाने भगवंताला त्याची तुल्यशक्ती प्राप्त झाल्यानंतर देहातील गौ म्हणजे इंद्रियांची पूजा करून त्यात ती दिव्यशक्ती ओतायची नाही का? म्हणून हे 'गोधनपूजन' होय. या दिवशी गुराढोरांचीसुद्धा पूजा करतात. चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी येते. तुकाराम महाराज याच वैकुंठाला गेले होते. शास्त्रात वैकुंठाची व्याख्या दोन प्रकारे दिली आहे. पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. 'विगतः कुंठ: अस्य वैकुंठः' आणि 'जीवानाम् अयं नियंता ज्ञानदः वैकुण्ठ:।' जेथे गति कुंठित होते ते वैकुंठ होय. ज्ञानाने गती विगत होते. ज्ञानाने स्थिरत्व प्राप्त होते. ज्ञानाने जन्म-मृत्यूची चक्रगती बंद पडते. ती परमज्ञानवस्था म्हणजे वैकुंठ होय. ही वैकुंठावस्था चतुर्दशीलाच येते. समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर निघतात. ज्ञानप्राप्ती झाल्यावर गणेशाचे जे विसर्जन करायचे तेसुद्धा चतुर्दशीलाच. १४ आकड्याला वैदिक परंपरेत फार महत्त्व दिसते. विद्याही १४ च आहेत आणि वैकुंठावस्था चतुर्दशीलाच येते. आपल्या शरीरातील गोधनाची पूजा केल्यास साधकाला सर्व ज्ञान प्राप्त होणारच. 'एकेन ज्ञात सर्व ज्ञातं भवति निश्चितम्'। एक साधल्यास सर्व साधते. १४ विद्या पूर्ण प्राप्त झाल्यावर ज्ञानप्राप्ती होणारच आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर मग काय उरले? काही शिल्लक उरले नाही. 'यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धां परमं मम्'। 'तुका म्हणे न ये परते तुझ्या दर्शने मागुते' अशी परम ज्ञानावस्था म्हणजे मुक्ती, म्हणजेच वैकुंठ होय. जगाचे सारे अस्तित्व ओतप्रोताच्या गतीमुळे असते. ओतप्रोत विगत झाले की मग हे जग कुठले? सारी माया आटोपली! हेच वैकुंठ होय. या परम अवस्थेकरिताच साधकाची सारी धडपड असते. ते वैकुंठ आजच्या दिवशी साधकाला प्राप्त होते. त्या परममंगल अवस्थेचे स्मरण म्हणून आजचा दिवस उत्सव साजरा करून मानतात.
 
 
वैकुंठ चतुर्दशीला रात्री विष्णूला तुळस आणि शिवाला बिल्वपत्र वाहून उपवास करायचा असतो. पहाटेस विष्णूला बिल्वपत्र आणि महादेवाला तुलसीदल वाहायचे असते. वैकुंठ प्राप्त झाल्यावर आता भेद कसला? सर्व तत्त्वरूपी देवता असल्या श्रेष्ठ साधनेकरिता सारख्याच असतात. भगवान शिव आणि विष्णू तत्त्वदर्शक देवता आहेत. साधक सर्व भेदाच्या वर अमृतावस्थेत जात असल्याने तत्त्व साधनेचे जे नियम आहेत ते त्याच्याकरिता सारखेच असतात. म्हणून महादेवाला बिल्वपत्रे न वाहता तो तुलसी वाहतो आणि विष्णूला तुलसीऐवजी बिल्वपत्रे वाहतो. जीव-शिव एक झाल्यावर भेद कसला?
 
 
क्रमशः
 
 
- योगिराज हरकरे
शब्दांकन - राजेश कोल्हापुरे
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@