अमर बलिदानी स्वामी श्रद्धानंद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2020
Total Views |

Swamy_1  H x W:
एकोणिसाव्या शतकाने भारताला अनेक महापुरुष दिले. राजा राममोहन राय, महर्षी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, महादेव गोविंद रानडे इ. सुधारकांच्या श्रेयनामावलीत आर्य समाजाचे अमर बलिदानी स्वामी श्रद्धानंदजी यांचाही समावेश होतो. आर्य समाजाच्या पहिल्या पिढीतील दयानंदांच्या या मानसपुत्राने समाजकार्यात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आर्य समाजाच्या रचनात्मक व भरीव कार्यातील ते एक मैलाचा दगड ठरले.
 
पंजाब प्रांताच्या जालंधर जिल्ह्यातील तलवन या गावी २२ फेब्रुवारी, १८५६ या दिवशी एका क्षत्रिय परिवारात स्वामी श्रद्धानंदजींचा जन्म झाला. त्यांचे नाव मुन्शीराम असे ठेवले. पोलीस इन्स्पेक्टर लाला नानकचंदजी हे त्यांचे पिता. चार भाऊ व दोन बहिणी या भावंडांमध्ये मुन्शीराम हे सर्वांत लहान होते. नानकचंदजींना नोकरीच्या काळात बरेली, बदायूं, बनारस, बांदा, मिर्झापूर, बलिया, इ. ठिकाणी राहावे लागले. त्यामुळे मुन्शीरामचे शिक्षणही अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. शालेय शिक्षणानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण बनारस येथील ‘क्वीन्स कॉलेज’मध्ये व इलाहाबादच्या ‘म्योर सेंट्रल कॉलेज’मध्ये झाले. १८८३ ला ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेथे पं. मोतीलालजी हे त्यांचे सहपाठी होते. मुन्शीरामजी स्वैर जीवनामुळ मांस, मदिरा, हुक्का, पान इत्यादी व्यसनांच्या आहारी गेले.
 
यौवनं धनसम्पत्ती प्रभुत्वमविवेकिता।
एकैकमपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्॥
 
अर्थात, तारुण्य, धनसंपत्ती, अधिकार व अविचार, यांतील एक-एक गोष्टही अनर्थास कारण होते. जेथे या चारही एकत्र येतील तेथील अनर्थ काय सांगावा?या सुभाषितात दर्शविल्याप्रमाणे मुन्शीरामजींची अवस्था झाली होती. तरुण वय, भरपूर पैसा-अडका व वडिलांच्या अधिकारपदाचे पाठबळ, या गोष्टी त्यांच्या व्यसनाधीनतेस कारणीभूत ठरल्या.
 
आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे
 
आई-वडिलांच्या धार्मिक व सदाचारी वृत्तीचे संस्कार मुन्शीरामवरही पडले होते. मूर्तिपूजा केल्याशिवाय ते अन्न-जल ग्रहण करत नसत. मात्र, पुढील घटनेने त्यांना नास्तिक बनविले. एकदा मुन्शीराम बनारसमध्ये विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले असता तेथील शिपायांनी त्यांना अडवले. कारण, त्यावेळी मंदिरात रावाँ-नरेशाची राणी दर्शनासाठी गेली होती. ती बाहेर आल्याशिवाय इतर कोणालाही प्रवेशाची आज्ञा नव्हती. देवाच्या दारातील तो भेदभाव मुन्शीरामच्या हृदयास झोंबला. विश्वनाथाच्या दृष्टीने सामान्य जनांपेक्षा राणीच अधिक आदरणीय आहे काय? हा विचार मनात येऊन त्यांनी मूर्तिपूजेकडे कायमची पाठ फिरवली. अशाच आणखी एका घटनेने त्यांच्या मनावर आघात केला. मूर्तिपूजेविषयी अश्रद्धा उत्पन्न झाल्यावर एकदा सहज हिंडत ते रोमन कॅथॅलिक चर्चमध्ये गेले. तेथे फादर जकरिया यांच्याशी त्यांची चर्चा झाली. फादरने अनेक युक्त्या-प्रयुक्त्या करून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अधून-मधून काही दिवस मुन्शीरामही तेथे जात राहिले. मात्र, एके दिवशी फादरच्या अनुपस्थितीत मुन्शीराम तेथे गेले असता तेथील एक नन व एक पाद्री यांना एकत्र, नको त्या अवस्थेत त्यांनी पाहिले. त्याच वेळी त्यांनी ख्रिस्ती मताला कायमचा रामराम ठोकला. अशा प्रकारे आस्तिक मुन्शीराम पक्के नास्तिक बनले.
 
दयानंदांचा परीसस्पर्श
 
१८७७ मध्ये जालंधरचे प्रसिद्ध श्रेष्ठी लाला शालिग्राम यांची कन्या शीवदेवी हिच्याशी मुन्शीरामांचा विवाह झाला. तेव्हा त्यांचे शिक्षण चालू होते. युरोपच्या नास्तिकांच्या ग्रंथांनी त्यांना पक्के नास्तिक बनविले होते. तशातच बरेली येथे स्वामी दयानंद प्रचार करत आले होते. तेथे मुन्शीरामची व त्यांची पहिली भेट झाली. दयानंदांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची युक्तिपूर्ण उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले. तेव्हा मुन्शीरामजींनी त्यांना म्हटले, “महाराज! आपण मला निरुत्तर तर केलेत, पण अजूनही माझ्या हृदयात ईश्वराविषयी श्रद्धा उत्पन्न होत नाही.” त्यावर दयानंदांनी म्हटले, “आपल्यावर ईश्वराची कृपा झाल्यावरच आपली ईश्वरावर श्रद्धा बसेल.” अशा प्रकारे दयानंदरूपी परिसाचा स्पर्श झाल्यामुळे मुन्शीरामच्या नास्तिकरूपी लोहाचे सोने व्हायला सुरुवात झाली. पुढे त्यांच्या अनेक भेटी झाल्या. त्या काळात मुन्शीरामजींनी अनेक वैदिक ग्रंथ वाचून त्यावर चिंतन-मनन केले. मध्यंतरी लाहोरमध्ये असताना आर्यसमाजचे प्रधान लाला साईंदाव व मुनिवर गुरुदत्त यांच्या संपर्कात येऊन ते पूर्ण आस्तिक बनले. हळूहळू दारू, मांस, हुक्का इ. व्यसने सुटत गेली.
 
गुरुकुल शिक्षण प्रणालीचा पुनरुद्धार
 
१९८० मध्ये मुन्शीरामांना नायब तहसीलदाराची नोकरी लागली. परंतु, थोड्याच दिवसांत ती कायमची सोडून वकिली करण्याचा विचार केला. १८८५ मध्ये ते लाहोर आर्यसमाजचे सदस्य बनले. १८९२ ते १८९६ पर्यंत त्यांनी आर्य प्रतिनिधी सभा पंजाबचे प्रधानपद भूषविले. ३१ ऑगस्ट, १८८५ ला त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्या वेळी ते ३९ वर्षांचे होते. पुनर्विवाहाबद्दल दडपण आलेतरी त्यांनी ते झुगारून दिले. तेव्हा त्यांना २ मुले व २ मुली होत्या. वैदिक तत्त्वांवर आधारित प्राचीन गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुन्शीरामजींनी वैदिक गुरुकुल स्थापण्याचा संकल्प १८९८ मध्ये केला. त्यानुसार २ मार्च, १९०२ रोजी हरिद्वारजवळील कांगडी येथे जंगलात गुरुकुलाची स्थापना केली. सुरुवातीस आपली दोन्ही मुले हरिश्चंद्र व इंद्र यांना गुरुकुलात प्रविष्ट केले. पुढे विद्यार्थी संख्या वाढत गेली. मधल्या काळात १८९१ मध्ये जालंधर येथे कन्या शाळेची स्थापना केली. त्याचेच रूपांतर पुढे चालून कन्या महाविद्यालयात झाले. आर्य समाजाचा विस्तार व प्रचार-प्रसार करत असताना त्यांनी आपली सर्व संपत्ती या कामी सत्कारणी लावली. आपले मुद्रणालय व पुस्तकालय गुरुकुल कांगडीस भेट दिले. गुरुकुलाच्या दहाव्या वार्षिकोत्सवाप्रसंगी आपली राहती कोठी (वाडा) विकून ती रक्कम गुरुकुलास दिली.
 
संघटन कुशल स्वामी श्रद्धानंदजी
 
मुन्शीरामजींकडे उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य होते. या बळावरच त्यांनी भारतातील संपूर्ण आर्य समाजाचे एक केंद्रीय संघटन ‘सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा’ या नावाने १९०९ मध्ये स्थापन केले. प्रधानपदावर त्यांची निवड झाली. १२ एप्रिल, १९१७ रोजी विधीनुसार संन्यास ग्रहण करून ‘स्वामी श्रद्धानंद’ हे नाव धारण केले. पुढे चालून गढवाल येथील दुष्काळग्रस्तांची सेवा (१९१८), अमृतसर काँग्रेसचे स्वागताध्यक्ष (१९१९), असहयोग आंदोलनामध्ये सहभाग (१९२१), दलितोद्धार सभेची स्थापना (१९२३), शुद्धी-आंदोलन, दक्षिण भारतातील अस्पृश्यता निवारण कार्य (१९२४), दयानंद जन्मशताब्दीचे नेतृत्व (१९२५), अशी विविधांगी कार्ये करून समाजात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण केले. हे सर्व करत असतानाच त्यांची साहित्य साधनाही चालूच होती. ‘सद्धर्म प्रचारक’, ‘शुद्धि-समाचार’, ‘सत्यवादी’, ‘अर्जुन’, ‘लिबरेटर’ इत्यादी नियतकालिके चालवून प्रचारकार्य केले. तसेच ‘कल्याण मार्ग का पथिक’, ‘बन्दीघर के विचित्र अनुभव’, ‘आर्य पथिक पण्डित लेखराम’, ‘आचार, अनाचार और छुआछूत’, ‘जाति के दीनों को मत त्यागो’, ‘वर्तमान मुख्य समस्या अछूतपन के कलंक को दूर करो’ इ. लहान-मोठे ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत.
 
अमर बलिदान
 
 
२५ मार्च, १९२६ रोजी असगरी बेगम या मुस्लीम महिलेने स्वतः होऊन इस्लामचा त्याग केला व वैदिक धर्म स्वीकारला. दिल्ली आर्य समाजात तिच्यासह तिची दोन मुले व पुतण्या यांचा शुद्धिसंस्कार झाला. तिचे नाव शांतिदेवी व मुलांची नावे धर्मपाल, अर्जुन तसेच पुतण्याचे नाव अमरसिंह असे ठेवले. नंतर तिला वनिता आश्रमात पाठवले. पुढे तीन महिन्यांनंतर ही बातमी तिच्या नातलगांना समजली ते तिला परत नेण्यासाठी आले असताना तिने जाण्यास नकार दिला. ही बातमी मुस्लीम समाजात वाऱ्यासारखी पसरून त्यांच्याकडून जबरदस्त विरोध होऊ लागला. या सर्व घटनाक्रमात कट-कारस्थाने होऊन एका माथेफिरू मुसलमानाने प्रश्न विचारण्याच्या व चर्चा करण्याच्या बहाण्याने स्वामीजींच्या खोलीत प्रवेश केला. त्या माथेफिरूने स्वामीजींवर तीन गोळ्या झाडल्या. स्वामीजी तेथेच कोसळले. तो दिवस होता २३ डिसेंबर, १९२६. अशा या निःस्वार्थ सेवक, राष्ट्रनायक, भारतीय संस्कृतीचे पुनरुद्धारक, दलितोद्धारक, राष्ट्रासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या अमर बलिदानी, निर्भीक संन्यासी स्वामी श्रद्धानंदांना शत-शत नमन.
- ज्ञानकुमार आर्य
(लेखक महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा,
सीतारामनगर, लातूरचे पुस्तकाध्यक्ष आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@