अंत्योदयाचा ‘सूर्योदय’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2020   
Total Views |

Suryoday Fou_1  

‘सूर्योदय फाऊंडेशन’

‘सूर्योदय फाऊंडेशन’ हे सेवाव्रती संस्थांच्या वर्तुळातले प्रमुख नाव आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा, यासाठी अभ्यास करून त्यानुसार कार्य करणारी संस्था. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी, गोरगरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी संस्था भागिरथ प्रयत्न करते. पाण्याचे दुर्भीक्ष संपून गावे विकसित व्हावीत, यासाठी ‘सूर्योदय फाऊंडेशन’ने नांदेडमधली दहा गावे दत्तक घेतली. ‘निसर्ग’ वादळाने उन्मळून पडलेल्या कोकणाला मदतीचा हात दिला. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या ‘सूर्योदय फाऊंडेशन’च्या सर्वेसर्वा आहेत. ‘सूर्योदय फाऊंडेशन’च्या कार्याचा घेतलेला आढावा...
माझा मुलगा मला म्हणाला की, "आपण बाबांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी लोकोपयोगी उपक्रम करतो. यावेळेस ‘कोरोना योद्ध्यां’ना सन्मान आणि साथ देणे गरजेचे आहे. सगळे जग कोरोनामुळे घाबरले. पण पोलीस आणि नर्सेस त्यांचे काम व्रत समजून करत आहेत." त्यामुळे कोरोना काळात ‘सूर्योदय फाऊंडेशन’ने या खऱ्या योद्ध्यांचा सेवाव्रतींचा सत्कार केला. प्रसन्न चित्ताने अनुराधा पौडवाल सांगत होत्या. अनुराधा यांच्या गुणी मुलाचे नुकतेच निधन झाले होते. हा विचार मनात आला आणि अनुराधा यांच्या डोळ्यात पाहिले की, त्यांच्या मनात काय भाव असतील. पण तिथे केवळ नितळ निर्मळता होती. वैयक्तिक सुखदु:खाच्या पल्याड जाऊन सेवा करणाऱ्या सेवाव्रतींचे मांगल्य त्या डोळ्यांत होते. अनुराधा पौडवाल यांनी वैयक्तिक दु:खाचा उल्लेख टाळला होता. त्यामुळे याबाबत काहीही न विचारता केवळ त्यांच्या सामाजिक कार्याबाबत माहिती करून घ्यायचे निश्चित केले.
कित्येक कलाकारांना, साहित्यिकांना सरकारी पुरस्कार मिळतात. खरे म्हटले तर हे पुरस्कार अभिनेत्यांना, साहित्यकांना वगैरे मिळणे याबाबत जनमत निष्क्रियच असते. सरकारची एक खानापूर्ती म्हणूनच या घटनेकडे पाहिले जाते. अनुराधा पौडवाल यांनाही २०१७ साली भारत सरकारचा ‘पद्मश्री पुरस्कार’ मिळाला. त्यावेळी इतके वर्ष गानसाधना केली म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला असावा, असे कित्येकांना वाटले असेल. पण अनुराधा पौडवाल यांची गानसाधना जितकी आहे तितकीच त्यांची समाजशीलताही असाधारण आणि महत्त्वाची आहे. त्यातही ते समाजकार्य ‘पेज 3’ वरची केवळ मुलामा केलेली चकाकी नव्हती, तर ते कार्य होते भारतीय समाजाच्या सर्वांगिण विकासासाठीचे, ग्रामीण बांधवांच्या जगण्यासाठीचे. त्यासाठी त्यांनी ‘सूर्योदय फाऊंडेशन’ची स्थापना केली. या कार्यात त्यांची मुलगी कविता पौडवालही तन-मन-धनाने सहभागी आहे. तसेच सेवाभावी वृत्तीचे सहकारीही यामध्ये सहभागी झाले.
सिनेसृष्टीतली प्रसिद्ध गायिका सेवाकार्याकडे का वळली तर त्याला एक घटना कारणीभूत आहे. साधारण ८०चे दशक होते. अनुराधा पौडवाल यांनी एका कन्यारत्नाला जन्म दिला. मात्र, तिचा मृत्यू झाला. ते दु:ख अनुराधा यांना पचवणे अवघड होते. ती त्यांच्या डोळ्यांसमोर सारखी यायची. तिला विसरणे शक्य नव्हते. त्यांच्या मनात प्रश्न आला की, आपण सधन-संपन्न आणि आरोग्याची पूर्णपणे सुरक्षा राखूनही आपल्या मुलीला वाचवू शकलो नाही. मग ज्यांच्या घरी आर्थिक समस्या आहे, दोन वेळचे अन्न मिळवण्याची मुश्किल आहे, अशा घरातल्या मुलांच्या आरोग्याचे काय होत असेल? या मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे. साधारण ऐंशीचे दशक होते ते. मनातला विचार मग त्यांनी प्रत्यक्षात आणला. त्यांनी मग नानावटी हॉस्पिटलमध्ये ‘निओनताल केअर सेंटर’ निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी आर्थिक साहाय्य केले. तसेच ‘कुपर हॉस्पिटल’मध्ये सोनोग्राफी सेंटरही अनुराधा यांच्या सहकार्याने सुरू झाले. आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या रूग्णांच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी त्या आर्थिक मदत करू लागल्या. त्यावेळी डॉ. नीतू मांडके यांच्यासोबत आरोग्यसंदर्भातल्या कामामध्ये सहभागी होत्या. गरजू वस्तींमध्ये आरोग्य शिबिरे भरवणे, आरोग्य संदर्भात मदत करणे ही सगळी सेवाकार्य त्यांची सुरूच होती.
त्यानंतर जलसंधारण क्षेत्रात अनुराधा यांच्या समाजकार्याची सुरुवात कशी झाली? काही वर्षांपूर्वी अनुराधा पौडवाल काही कामानिमित्त इंदौर येथे भैय्यूजी महाराजांना भेटल्या होत्या. अनुराधा यांनी सामाजिक कार्याविषयी भैय्यूजी महाराजांशी चर्चा केली. भैय्यूजी म्हणाले, "महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा कहर झाला आहे. त्यांच्या समस्या समजून त्यावर खरे काम केले पाहिजे. सरकार तर आपल्या परीने काम करते. पण त्यापलीकडे जाऊन शेतकरी बांधवांसाठी काम केले पाहिजे. जगाचा पोशिंदा आत्महत्या करतोय. तुम्ही त्यावर काम करा." त्यानंतर अनुराधा यांची समाजकार्याची दिशा निश्चित झाली. ‘सूर्योदय फाऊंडेशन’ची स्थापना झाली.
 

Suryoday Fou 1_1 &nb 
 
 
‘सूर्योदय फाऊंडेशन’च्या मदतीने ‘मानवतेचा महाकुंभ’ उपक्रम सुरू केला. पाऊस नाही पडला तर मग उभ्या शेताची हानी ठरलेली. त्यामुळे शेतावर विसंबलेल्या शेतकऱ्यांचेही आयुष्य बरबादच. हतबल झालेला शेतकरी मग आत्महत्येकडे वळतो. याच विचाराने ’मानवतेचा महाकुंभ’ उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना पशुधन देण्यात आले. शेतीची अवजारे, बी-बियाणे खत पुरवण्यात आले. त्यांना शेतकीसंदर्भातले आधुनिक ज्ञान देण्यात आले. या सेवाकार्याची सुरुवात मराठवाडा येथे झाली. हजारो शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. उद्ध्वस्त होऊ पाहणारी घरं यामुळे सावरली गेली.
पुढे जलसंधारणाची कामे सुरू झाली. यामध्ये रेणुका देवीच्या पायथ्याशी असलेल्या ‘मातृतीर्था’पासून सुरुवात केली गेली. आपल्याला ‘मातृतीर्था’ची आख्यायिका माहिती आहे की, रेणुका देवी परशुरामाच्या आई. माता रेणुका देवी माहुर ठिकाणी स्थिरावली. त्यावेळी परशुरामांनी गडाच्या पायथ्याशी बाण मारला आणि ‘मातृतीर्थ’ तयार झाले. तिथे अस्पर्शित पवित्र पाण्याचा उगम झाला. पण कालौघात ‘मातृतीर्थ’ आणि ‘सर्वतीर्थ’ गाळाने बुजले गेले. अनुराधा पौडवाल या धार्मिक प्रवृत्तीच्या आहेत. त्या म्हणतात की, जिथे जिथे आपल्या देवी-देवतांची मोठी मंदिरं किंवा तीर्थक्षेत्रं आहेत, त्यांचे वैशिष्ट्य एकच आहे की, त्या ठिकाणी अग्नी किंवा पाणी असणारच. त्यामुळे ‘मातृतीर्थ’ या धार्मिक स्थळीही पाणी असणारच. ‘मातृतीर्थ’ मोकळे केले. त्यातील गाळ काढला तर नांदेडच्या लोकांना त्याचा फायदा होईल. पाण्याचे दुर्भीक्ष थांबेल. अनुराधा यांच्या वक्तव्याला अनेकांनी भावनेचा भर असे म्हटले. पण अनुराधा ठाम होत्या. त्यांनी काम सुरू केले. काय आश्चर्य! गाळ काढल्यानंतर ‘मातृतीर्था’ला पाणी लागले. अनुराधा म्हणतात, हा रेणुकामातेचा अनुग्रह आहे.
गावातल्या बायाबापड्या अनुराधा यांना सांगू लागल्या की, आमच्या गावातही पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे. पाण्यासाठी मैलोनमैल चालावे लागते, पण पाणी मिळत नाही. हालहाल होत आहेत. या भगिनींचे म्हणणे ऐकून अनुराधा यांनी ‘सूर्योदय फाऊंडेशन’च्या मदतीने नांदेडची दहा गावे दत्तकच घेतली. या गावाला पाणी कसे मिळेल, यासाठी एक अभ्यासू गटच तयार केला. त्यांच्या माध्यमातून गावाचे प्रश्न कळले. गावातले नैसर्गिक पाण्याचे स्रोत्र बुजले होते. पाऊस पडला तरी ते पाणी मुरण्याची व्यवस्था नव्हती. वाडेपुरी, कलंबर, भीलू नायक तांडा, रूपला तांडा, कामजळगेवाडी, पोलीसवाडी, पोखरभोसी, दापशेड उमला तांडा, रूपसिंग तांडा, विठोबा तांडा, हरिश्चंद्र तांडा, नडू तांडा वगैरे गावांमध्ये समविचारी लोकांना सोबतीला घेऊन ‘सूर्योदय फाऊंडेशन’ने जलसंधारणाचे काम सुरू केले. नांदेड येथीन २४६ नाले, तर उस्मानाबाद येथील २०० नाल्यांचे रूंदीकरण आणि खोलीकरण केले आहे. आज त्या गावांचा चेहरामोहरा बदलला आहे. या गावातल्या आयाबाया अनुराधा यांना आता ‘पाणीवाली देवी’ म्हणतात. यातच सर्वकाही आले.
२०२० मध्ये ‘निसर्ग’ वादळाने कोकणात हाहाकार उडवला. यावेळी ‘सूर्योदय फाऊंडेशन’ने कोकणातील शाळांचा सर्व्हे केला. ज्या शाळांना जी मदत हवी त्याची यादी केली. त्यातूनच मग ‘निसर्ग’ वादळाने कोलमडलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या. या कामात त्यांना अनेक सेवाभावी व्यक्तींनी सहकार्य केले, असे त्या आठवणीने नमुद करतात. तसेच विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही केला. पुढे कोरोना सुरू झाला. यावेळी त्यांनी कोरोना काळात न घाबरता डगमगता काम करणाऱ्या पोलीस, नर्स आणि सफाई कामगारांचा सत्कार केला. त्यांना धीर दिला. त्यांचा गौरव केला. ‘फूल ना फुलाची पाकळी’अशी आर्थिक भेट दिली. तसेच मुख्य इस्पितळांमध्ये ‘पीपीई किट’ दिले. याच काळात शेकडो गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे वितरणही केले. या काळात केलेल्या कार्याची यादी लांबतच जाणार आहे. दु:खी व्यक्तीने दु:खापुढे लोटांगण घालू नये. निराशेपोटी आत्महत्या करू नये, यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी समुपदेशन केले. सधन आणि संपन्न कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करू लागले. का? याचा अभ्यास अनुराधा यांनी केला. समुपदेशनात त्या सांगू लागल्या, "चकाकते ते सगळे सोने नसते. एखादी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते. तेव्हा त्याच्या सभोवतीची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. आपले यश, आपली संपत्ती आणि मुख्यत: आपली ‘इमेज’ कायम राहावी यासाठी व्यक्ती अक्षरक्ष: मर मरते.
जेव्हा मिळालेली ‘इमेज’ टिकवता येत नाही तेव्हा त्या ‘इमेज’साठी व्यक्ती आत्महत्या करते. त्यामुळे ‘इमेज’, यश आणि भौतिकता या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. जीवंत असू तर त्या पुन्हा मिळवता येतात. त्यांच्यासाठी जीवन संपवणे यासारखा वेडेपणा नाही." कित्येक संपन्न-सधन गटांसमोर अनुराधा पौडवाल असं समुपदेशन करतात. ‘सूर्योदय फाऊंडशेन’चे सेवाकार्य असे विविध आयामांतून सुरू आहे. ‘सूर्योदय फाऊंडेशन’ला अनेक समाजशील व्यक्ती आणि संस्था स्वत:हूून जोडल्या जात आहेत. ‘सूर्योदय फाऊंडेशन’ म्हणजे ‘अंत्योदयाचा सूर्योदय’ आहे.
@@AUTHORINFO_V1@@