पनवेल-तळोज्यात वायू प्रदूषणाची पातळी चौपट; 'माॅर्निंग वाॅक'ही घातक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |
pollution _1  H


वातावरण संस्थेचा अभ्यास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - खारघर,तळोजा आणि पनवेलमधील वाढत्या वायू प्रदूषणामुळे येथील नागरिकांना सकाळची प्रभातफेरी आरोग्याला घातक ठरणार असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या भागात महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केल्यानंतर 'वातावरण' या संस्थेने या निरीक्षणाची नोंद केली आहे. या अभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी विहीत प्रदूषण पातळीच्या मर्यादेपेक्षा चौप्पट नोंदवण्यात आली आहे. 
 
 
हवेतील 'पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट्स', विशेषतः पीएम २.५ हे कण खूप सूक्ष्म असतात. हे कण सहजगत्या मानवी फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारक ठरतात. पीएम. २.५ ची उच्च पातळी कमी दृश्यमानता आणि धुरक्यांच्या निर्मितीसही कारक ठरते. 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा'च्या नियमांनुसार हवेतील पीएम २.५ कणांची पातळी ही ६० मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर इतकी असणे आवश्यक आहे. मात्र, तळोजा, खारघर आणि पनवेलमधील हवेच्या प्रदूषणाने ही पातळी ओलांडली असल्याचा अभ्यास समोर आला आहे. वातावरण या संस्थेने या तिन्ही परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान केला. यासाठी त्यांनी एमआयडीसी तळोजा, सेक्टर १३ पनवेल, सेक्टर ३६ खारघर, नावडे, तळोजा आणि सेक्टर ७ खारघर याठिकाणी 'रिअल टाईम एअर क्वालिटी मॉनिटर्स' बसविले होते. त्यामाध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार पीएम २.५ ची सर्वाधिक पातळी १४१.१ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर (पाच उपकरणांच्या आकडेवारीची सरासरी) सकाळी सात वाजता नोंदली गेली आहे.
 
 
 
या पाचही ठिकाणांच्या आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्या फराह ठाकूर यांना सांगितले की, या ३१ दिवसांमध्ये पनवेल परिसरात पीएम २.५ ची पातळी सरासरी १०१.१२ इतकी होती. ही पातळी भारतीय मानकांच्या (६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत १.७ पटींनी तर 'डब्ल्यूएच'ओ मानकांच्या (२५ मायक्राेग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत चार पटींनी जास्त आहे. यासंदर्भात वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट म्हणाले की, या अभ्यासामागचे महत्त्वाचे कारण केवळ खारघर-पनवेल-तळोजा भागातील रहिवाशी श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता तपासणे एवढेच नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्या-त्या वेळच्या हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा बसविण्यातलं अपयश अधोरेखित करणारे आहे. या परिसरांमध्ये पीएम २.५ ची सर्वाधिक पातळी सकाळच्या काही तासांमध्ये नोंदली गेली असली, तरी दिवसातील १७ तास इथले रहिवाशी प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. 'वातावरण' या अभ्यासाचा विस्तृत अहवाल पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना, लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करणार आहे.
 
 
पीएम २.५ ची (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) सरासरी
एमआयडीसी, तळोजा १९७.४
नावडे १३०.५
सेक्टर 36, खारघर १३६.४
सेक्टर ७, खारघर १२८.३
सेक्टर १३, पनवेल ११३.१
सरासरी १४१.१
 
 
अभ्यासाअंती केलेल्या शिफारशी 
१) नेमक्या वेळेची प्रदूषणाची आकडेवारी उपलब्ध होण्यासाठी पनवेल परिसरात हवेची गुणवत्ता नियमितपणे तपासणारी केंद्रे सुरू करणे
२) पनवेलकेंद्री स्वच्छ हवा कृती कार्यक्रमासाठी आवश्यक 
३) उत्सर्जन कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी औद्योगिक उत्सर्जन रोखणे, रस्त्यावरील धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे व्यवस्थापन आणि पनवेलला शून्य कचरा जाळणारे शहर तयार करणे महत्त्वाचे 
 
 
“वातावरण ने केलेल्या या पाहणीनुसार पनवेलमधील पाच लाख लोक सतत पार्टिक्युलेट मॅटर या वायुप्रदूषकांचा सामना करत आहेत. याचा मुख्य स्त्रोत वाहतूक असून त्या खालोखाल औद्योगिक उत्सर्जन व रस्त्यावरील धूळ असल्याचे दिसत आहे. या प्रदूषकांमुळे वारंवार फुप्फुसांचा संसर्ग, दमा, दीर्घकाळ टिकणारे श्वसनसंस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात. आता स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने वायुप्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.” - डॉ. संदीप साळवी, संचालक पल्मोकेअर रिसर्च अँड एज्यूकेशन फाउंडेशन, पुणे  
@@AUTHORINFO_V1@@