बिबट्या गणना अहवाल प्रसिद्ध; बिबट्यांच्या संख्येत देशामध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |
leopard _1  H x


बिबट्यांच्या संख्येत वाढ 

मुंबई (अक्षय मांडवकर) - केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज 'स्टेटस आॅफ लेपर्ड इन इंडिया, २०१८' अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार भारतात १२ हजार ८५२ बिबट्यांचा अधिवास असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बिबट्यांच्या संख्येबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकवर असून राज्यात अंदाजे १ हजार ६९० बिबटे असल्याचे अहवालात म्हटलंय. बिबट्यांची ही गणना व्याघ्र अधिवास क्षेत्रांमध्ये म्हणजेच संरक्षित वनक्षेत्रांमधूनच करण्यात आली आहे. मात्र, संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या संख्येने असल्याने त्यांची एकूण संख्या जास्त असण्याची शक्यता वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 
 
 



देशात बिबट्यांच्या संख्येची माहिती देणारा अहवाल आज नवी दिल्लीमध्ये प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार २०१४ च्या तुलनेत २०१८ साली देशामध्ये बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ साली भारतात ७,९१० बिबट्यांचा अधिवास होता. 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण' (एनटीसी) आणि 'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) यांनी मिळून बिबट्या गणना अहवाल तयार केला आहे. देशात पार पडलेल्या व्याघ्र गणनेच्या कामावेळीच या संस्थांनी बिबट्याचीही गणना केली होती. २०१८ च्या अहवालानुसार देशामध्ये मध्यप्रदेश राज्यात बिबट्यांची सर्वाधिक संख्या (३,४२१) असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक (१,७८३) आणि महाराष्ट्राचा (१,६९०) क्रमांक लागला आहे. देशात वनक्षेत्रांबरोबर शेत जमिनींमध्ये (चहा, काॅफी आणि उसाची शेती) बिबट्यांचा अधिवास आहे. संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बिबट्यांची ही गणना केवळ वाघांचा अधिवास असणाऱ्या संरक्षित वनक्षेत्रांमध्येच पार पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 



महाराष्ट्राच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास यंदा राज्यात १७४ बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. तसेच मानव-बिबट्या संघर्षामध्ये मृत्युमुखी किंवा जखमी झालेल्या माणसांची संख्याही यंदा गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. बिबट्यांच्या मृत्यूची वाढती संख्या पाहता वन विभागाने त्यासंदर्भातील कृती आराखडा (अॅक्शन प्लॅन) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या संख्येने आहे. याबाबत बिबट्यांवर संशोधनाचे काम करणाऱ्या जीवशास्त्रज्ञ डाॅ. विद्या अत्रेय यांनी सांगितले की, "महाराष्ट्रात संरक्षित वनक्षेत्रांबाहेर बिबट्यांची संख्या नक्कीच अधिक आहे. उसाच्या शेतात अधिवास करणाऱ्या बिबट्यांची गणना होत नाही. मात्र, बिबट्यांच्या वाढत्या संख्येकडे मानव-बिबट्या संघर्षाच्या अनुषंगाने पहावयाचे झाल्यास बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत त्यांच्या मानवी हल्ल्यांची संख्या नक्कीच कमी आहे."


महाराष्ट्रात वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा अधिवास असल्याने राज्यातील बिबट्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. बिबट्या संवर्धन आणि संरक्षणसंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले असून त्यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. हा अभ्यास गट वनक्षेत्राबाहेरील वावरणाऱ्या बिबट्यांबाबत उपाययोजनांचा सल्ला देईल - नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
 
 
गणना कशी केली ? 

बिबट्यांची गणना कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून टिपण्यात आलेल्या छायाचित्रांबरोबरच त्यांची विष्टा तपासून करण्यात आली. यासाठी २६ हजार ८३८ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. यामाध्यमातून बिबट्यांची ५१ हजार ३३७ छायाचित्र टिपण्यात आली. या छायाचित्रामधील बिबट्यांच्या शरीरावरील 'रोझेट् पॅटर्नच्या आधारे ५ हजार २४० बिबट्यांची ओळख पटविण्यात आली. प्रत्येक बिबट्यांच्या शरीरावरील 'रोझेट् पॅटर्न' हे वेगवेगळे असतात.

 
@@AUTHORINFO_V1@@