मुंबई : मुंबई क्रिकेटमधील नामवंत माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र विजय शिर्के यांचे कोरोनामुळे निधन झाले. मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांचे नाव होते. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळत होते. आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाने भावूक झालेल्या सचिनने ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली.
विजय शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी विजय शिर्के हे मुंबईवरुन ठाण्यात स्थायिक झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १७ वर्षाखालील उन्हाळी शिबीरांमध्ये दोन वर्ष शिर्के यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. मुंबई आणि स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये विजय शिर्के हे उत्तम गोलंदाज करत होते. नैसर्गिकरित्या चेंडू स्विंग करणे ही त्यांची खास शैली होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटने एका चांगल्या खेळाडूला गमावल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.