...तर ‘जकात’ अभियान चालवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |

Ram mandir_1  H
 
 
श्रीराम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहत असेल, तर शिवसेनेने भोकाड पसरू नये. उलट जास्तच त्रास होत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंगड्यात तंगडी घालणाऱ्या शिवसेनेने दाह शमनासाठी अयोध्येतच बांधल्या जाणाऱ्या मशिदीसाठी एखादे ‘जकात’ अभियान चालवावे. जेणेकरून शिवसेनेला दिल्ली आणि बारामतीला खूशही करता येईल नि आपल्या सेक्युलॅरिझमला बळकटीही देता येईल.
 
 
विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकवर्गणीतून बांधायची घोषणा केली आणि सत्तेसाठी स्वतःच्या हिंदुत्ववादी प्रतिमेचा सौदा करणाऱ्या शिवसेनेच्या पोटात मुरडा आला. हिंदूंना दहशतवादी आणि जिहाद्यांना शांतिदूत ठरवायला निघालेल्या दिल्लीच्या मातोश्री आणि बारामतीच्या काकाश्रींशी संधान बांधून सत्ता बळकावलेल्या शिवसेनेला श्रीराम मंदिर उभारणीत प्रत्येक हिंदू व्यक्तीचा सहभाग नकोसा वाटला. वर्गणीच्या नावाखाली १२ कोटी कुटुंबांशी संपर्क साधणारे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील, तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल, असे लिहित शिवसेनेने चिंता व्यक्त केली. तसेच श्रीराम अयोध्येचा राजा होते, श्रीराम मंदिरासाठी युद्ध झाले, शेकडोंनी रक्त सांडले, बलिदान दिले, त्या श्रीरामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे का, असा सवालही शिवसेनेने केला. इतकेच नव्हे तर मंदिरासाठीचे ‘संपर्क अभियान’ म्हणजे श्रीरामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार असल्याची टीकाही शिवसेनेने केली; अर्थात खंडणी आणि टक्केवारीवरच आजपर्यंत गुजराण केलेल्या शिवेसेनेला लोकवर्गणी कशी माहिती असेल? गल्ली-बोळ ते चौक आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक-उद्योजक अशा प्रत्येकाकडून केवळ वसुली आणि वसुलीगिरी करणाऱ्या शिवसेनेला श्रीराम मंदिराची निर्मितीही तशीच व्हावी, असे वाटत असेल. पण, श्रीराम भारताची राष्ट्रीय अस्मिता आहेत नि त्यांच्या मंदिराच्या निर्मितीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी प्रत्येक हिंदूची भावना आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराशी भारतातील प्रत्येक हिंदूचा आत्मा जोडलेला आहे नि त्यांना त्यात आपले योगदान द्यायचे आहे. ती संधी संपर्क अभियानातून मिळेल. पण, कोट्यवधी हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या-आस्थेच्या विषयात ‘१०, जनपथ’ आणि ‘सिल्व्हर ओक’समोर आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अर्पण केलेल्या शिवसेनेने मिठाचा खडा टाकण्याचे काम सुरू केले; अर्थात सत्ययुगातही श्रीरामासमोर रावण होताच, आताही शिवसेनेच्या मुखातून रावण बोलत असेल, तर तो कलियुगाचा महिमा!
 
 
 
दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समस्त हिंदूंना ब्रिटिशांच्या जुलूमशाहीविरोधात एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आजही हिंदूंवर हिंदुद्रोही ताकदींचे संकट कायम आहे व त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश होतो. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी शिवसेनेने अशा हिंदुविरोधी पक्षांशी आघाडी केल्याने तिची जातकुळीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसहून निराळी राहिली नाही. या पार्श्वभूमीवर जे जे हिंदुविरोधी असतील, त्यांना धडा शिकविण्यासाठी सर्वच हिंदूंनी एक होणे काळाची गरज आहे व ते काम श्रीराम मंदिराच्या निर्मितीतून होत असेल, तर त्याचे नक्कीच सर्वांनी स्वागत केले पाहिजे. हिंदूंमध्ये जवळपास प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम लोकवर्गणीतून करण्याची प्रथा आहे. कन्याकुमारीतील विवेकानंद शिला स्मारक त्याचे अलीकडच्या काळातले प्रख्यात उदाहरण आणि त्याच धर्तीवर श्रीराम मंदिरासारखे राष्ट्रीय अस्मितेचे, अभिमानाचे प्रतीक लोकवर्गणीतून उभे राहत असेल तर शिवसेनेने भोकाड पसरू नये; अन्यथा आता श्रीराम मंदिराला विरोध करणारे रामाला प्रिय होण्यास वेळ लागणार नाही. पण, श्रीराम मंदिराला विरोध केल्यावाचून शिवसेना थांबणार नाही, कारण उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री ही खुर्ची सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. तेव्हा आपल्या दोन्हीकडच्या नव्या मालकांना खूश करण्याचे, त्यांच्या पायाशी लोटांगण घालण्याचे शिवसेनेचे उद्योग सुरू आहेत नि त्यानुसारच शिवसेनेने श्रीराम मंदिरासाठीच्या लोकवर्गणीवर संशय घेतला, टीका केली.
 
 
श्रीराम मंदिराचा विषय साधा नाही, तर तो राजकीय आहे, हा तर्क मान्य केला तरी हिंदुहिताचे राजकारण करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखले आहे? पण, असे करण्यापेक्षा शिवसेनेला हिंदुविरोधाचेच धोरण गोड वाटते. वस्तुतः २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण, अशी घोषणा एकेकाळी शिवसेनेने केली होती. पण, जसजशी सत्तास्थाने मिळत गेली, तसतशी शिवसेनेची ही भूमिका बदलली आणि आता तर शिवसेना १०० टक्के राजकारणच करू लागली, म्हणूनच श्रीराम मंदिराच्या उभारणीतही शिवसेनेला राजकारण दिसले व हा २०२४ चा निवडणूक प्रचार असल्याचे तिने म्हटले. सत्तेची धुंदी चढली की असेच होते, राष्ट्राच्या अस्तित्वाला कारण ठरणाऱ्या बाबींतही राजकारणाचा वास येऊ लागतो नि शिवसेनेचे बडबडणे पाहता, त्याची खात्री पटते. पण, राजकारणापलीकडेही जग असते, जिथे सर्वसामान्य माणसे आपल्या भावविश्वात जीवन जगत असतात व श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी आपलाही हातभार लागत असल्याचे पाहून त्यांना अतीव आनंद, समाधान लाभते. साहजिकच हिरवी चादर ओढलेल्या शिवसेनेला त्याची जाणीव असणार नाही व म्हणूनच तिने लोकवर्गणीला विरोध केला. पण, हे करताना रामलल्लाच्या बँक खात्यात आपण एक कोटीचे दान दिल्याचा उल्लेख शिवसेनेने केला. खरे म्हणजे, शिवसेनेकडे कोणी दान मागायला गेले नव्हते नि शिवसेनेने केलेले दान कष्ट करून कमावले असेल, असेही नाही, त्यामुळे त्याचे फार कौतुक करण्याची आवश्यकता नाही. तसेच हिंदू धर्मात आपण केलेल्या दानाची वाच्यता करू नये, असे म्हणतात. शिवसेनेला मात्र दानाचा उल्लेख करण्याचा मोह आवरता आला नाही. पण, यामुळे श्रीराम मंदिरासाठी प्राणार्पण केलेल्या श्रीरामभक्तांचा अवमान झाला नसेल का? कारण शिवसेनेने आपण एक कोटींचे दान दिले, हे सांगण्यामागे श्रद्धेपेक्षा राजकारणच अधिक आहे. मतदार आपल्यापासून दुरावू नये यासाठी दान केले, हे सांगण्याचा खटाटोप शिवसेनेने केलेला आहे.
 
 
दरम्यान, श्रीराम राजकारणाचा विषय का असू नये? याचेही उत्तर शिवसेनेने द्यावे. मराठी, शिवाजी महाराज, मावळे, भगवा, हिंदुत्व आदींचा वापर शिवसेनेने आतापर्यंत राजकारणासाठी केला की विकासासाठी? नक्कीच राजकारणासाठी, कारण विकासमधला ‘वि’सुद्धा शिवसेनेला माहिती नव्हता व अजूनही माहिती नाही. पण, हिंदुत्ववादी शक्ती ‘हिंदुत्व’ आणि ‘विकास’ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हातात घेऊन चालत असतील, तर शिवसेनेने विरोध करण्याचे कारण नाही. छद्म धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली इथल्या हिंदूंनी प्रचंड त्रास सहन केला नि दाढी कुरवाळू राजकारणाने हिंदूंच्या अनेक पिढ्यांचा घात केला. त्या सर्वांना योग्य न्याय मिळण्यासाठी श्रीराम, हिंदुत्व राजकारणाचा विषय झाले तरी बेहत्तर; पण हिंदुविरोधी ताकदी वरचढ व्हायला नकोत. कारण हिंदुत्वनिष्ठा, राष्ट्रनिष्ठेत भारताचे पंचप्राण आहेत, तेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचेही स्मारक उभारू न शकणाऱ्या शिवसेनेच्या बाटग्यांनी श्रीराम राजकारणाचा विषय होतील, यावर किंचाळू नये. उलट जास्तच त्रास होत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंगड्यात तंगडी घालणाऱ्या शिवसेनेने दाह शमनासाठी अयोध्येतच पाच एकरात बांधल्या जाणाऱ्या मशिदीसाठी एखादे ‘जकात’ अभियान चालवावे. जेणेकरून शिवसेनेला दिल्ली आणि बारामतीला खूशही करता येईल नि आपल्या सेक्युलॅरिझमला बळकटीही देता येईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@