आत्मशोधाची जेथे प्रचिती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |

Self_1  H x W:
 
आपला दृष्टिकोन आपली जगण्याची कथा किती विधायक असावी, हे ठरवणार! या जगात सगळंच काही भव्यदिव्य, अतिआरामदायी आहे, असे नाही. किंबहुना, खाचखळगेच अधिक आहेत. आपण आपल्या वृत्तीतील आणि बाह्यजगातील अनेक पिशाच्च्यांबरोबर जगत आहोत. आयुष्यात काळोख आतही आहे आणि बाहेरही आहे. पण, आत एक सकारात्मकतेचा दिवा मात्र सदैव तेवत असतो.
 
आपल्या आयुष्यात तशी पाहिली तर स्थिरता असेलच असे नाही. किंबहुना, अनेक चढ-उतारांनी भरलेल्या व घटनांनी व्याप्त अशा आयुष्यात स्थिरावण्यासाठी खूप काही करावे लागते. त्यानंतरही स्थैर्य येईल की नाही, याची खात्री काही देता येणार नाही. कारण, आयुष्य हे तसे पाहिले तर अनेक आव्हानांनी भरलेले आहे. ही आव्हाने केवळ शारीरिक नाही, तर ती बौद्धिक आहेत, नात्यांमधील आहेत, पुढारीपणाची आहेत व आध्यात्मिकसुद्धा आहेत. अशा प्रकारची आव्हाने जी आपली रस्सीखेच करतात, आपल्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करतात, आपला त्याग, निष्ठा व कर्तृत्वतत्परतेची परीक्षा घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी आव्हाने आपल्या ’कम्फर्ट झोन’ला ’बाय बाय’ करायला शिकवतात. आयुष्य सदैव सुखासीन नसते, पण आपल्याला तरीही जगायला शिकविते.
 
आपण खरोखरच जीव मुठीत घेऊन जगतो आणि ’झाकली मूठ सव्वा लाखाची’ सांभाळतो. कारण, आपण आपल्या जीवाला घाबरतो. सभोवताली दिसणार्‍या भयानक वेदनादायी बातम्यांमुळे आपल्याला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले प्रेत आपण जीवंत असताना दिसायला लागते. गोष्ट नुसती प्रेतावरच थांबत नाही. आपल्याला धाय मोकलून रडणारे, स्वतःला आवरू न शकणारे, धडाधड कोसळणारे आपले गणगोत दिसायला लागतात. वृद्धत्वाने खालावलेले कमजोर आईवडील डोळ्यांसमोर तरळायला लागतात. रोज साडी आणि दागिन्यांची भांडून भांडून मागणी करणारी पत्नी पांढर्‍या कपाळाने समोर उभी राहते. बागडून बागडून घर डोक्यावर घेणारी मुलं तहान-भुकेने व्याकूळ झालेली आपण पाहतो. छान छान स्वप्नांनी रंगविलेल्या संसाराच्या डोलार्‍याची राखरांगोळी झालेली दिसू लागते. हे सगळं असं उद्ध्वस्त सोडून जायला मन जाणूनबुजून कसं तयार होणार? मग आपल्याला हे घर असं मोडायला द्यायचं नसतं. भरल्या पानावरून उठून जायचं, बोलायला सोपं आहे. पण, करणं किती अवघड आहे? मुद्दाम कसं काय असं कोणी सगळं वार्‍यावर सोडून जाणार? म्हणून तर ’मला हा आजार होऊ नये,’ अशी प्रत्येकाची अपरिहार्य इच्छा असते. अशा लोकांना आपण क्रूर, आपमतलबी, स्वार्थी, अप्पलपोटे, दूराग्रही म्हणून संबोधणे योग्य नाही. खूपच कमी लोक असे लबाड व आपमतलबी असूही शकतात. पण वेदना, व्यथा आणि भोग हसत हसत झेलणे हे काही येर्‍यागबाळ्याचे काम नाही.
 
आव्हाने आपल्याला परिस्थितीशी दोन हात करायला शिकवतात. आपण सर्वसामान्यपणे बिकट परिस्थितीमुळे बिथरलेले असतो. पण, जेव्हा आपले धाडस बळावते, तेव्हा आपण स्वत:च्या मनावर आणि बिकट परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो. आपली आंतरिक ऊर्जा आपल्याला साथ द्यायला लागते. आपण युद्धात उतरलेल्या सैनिकांचा जोम व निष्ठा घेऊन कठीण समस्येशी झुंजायला सुरुवात करतो. आव्हानात्मक वातावरण मानसिक प्राबल्य वाढविते. ती एक साधी व मनाला पटण्यासारखी गोष्ट आहे. यश हे मनात घडायला लागते. बरीचशी ऐतिहासिक युद्धे आधी मनात जिंकली गेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण याबाबत सर्वात महत्त्वाचे आहे. आव्हानांचे अस्तित्व जेव्हा व्यक्ती पेलण्याचे ठरविते, तेव्हा आव्हानाला एक पोषक अशी पार्श्वभूमी आपोआप घडायला लागते. ज्यामुळे मानसिक सामर्थ्याचा उपयोग त्या व्यक्तीला करता येतो. आपल्या पूर्ण आत्मिक बळाचा वापर त्या व्यक्तीला करता येतो. एकदा का तुम्ही आव्हानाला झेलायचे निश्चित केले की, तुम्ही एक नवीन व्यक्ती म्हणून पुन्हा जन्म घेता. तुम्ही तुमची ताकद सिद्ध करण्यासाठी पुरेपूर सज्ज होता. अमुक एखादी गोष्ट मिळाली म्हणजे एखादी व्यक्ती सुखी झाली, असे म्हणता येणार नाही. तसेच संकटाचा डोंगर कोसळला म्हणून सगळ्याच व्यक्ती आयुष्यभर दुःखाच्या गुहेत लुप्तही होत नाहीत. किंबहुना, कितीही कठीण परिस्थितीत मन शांत ठेवून यशाची शिखरे गाठणारी माणसे या जगात आहेतच, तर अत्यंत पोषक परिस्थिती आहे, कुठलीही कठीण समस्या नाही, तरी रसातळाला जाणारी माणसेही याच पृथ्वीतलावर आहेत. एकंदरीत फ्रॉईडसारखे मानसशास्त्रज्ञ मनाची गुंतागुंत व कार्यक्षमता या सुप्त मनातील कार्यपद्धतीवरून वर्णन करतात. सुप्त मनातून येणार्‍या जाणिवा, दबलेल्या इच्छा व त्यामुळे व्यक्त होणारे विशिष्ट आचारविचार याचा ऊहापोह मनोविश्लेषणातून बर्‍याच वेळा केला जातो.
 
एक लक्षात घ्यायला पाहिजे की, आपले आयुष्य आपली स्वत:ची कथा आहे. आपण जगलेली कथा. मग आपण आपली कथा नकारार्थी लिहिणार का? शेवटी ती आपली निवड आहे. तात्पर्य काय, वरील सर्व विचारांचा ऊहापोह केल्यावर लक्षात येते की, आपला दृष्टिकोन आपली जगण्याची कथा किती विधायक असावी, हे ठरवणार! या जगात सगळंच काही भव्यदिव्य, अतिआरामदायी आहे, असे नाही. किंबहुना, खाचखळगेच अधिक आहेत. आपण आपल्या वृत्तीतील आणि बाह्यजगातील अनेक पिशाच्च्यांबरोबर जगत आहोत. आयुष्यात काळोख आतही आहे आणि बाहेरही आहे. पण, आत एक सकारात्मकतेचा दिवा मात्र सदैव तेवत असतो. काही ना काही कारणांनी आपल्याला त्याचा प्रकाश पाहता येत नाही, तेव्हा आपल्या या प्रकाशाला आपणच शोधूया.
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@