शिखराकडून थेट पायथ्याशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |

Cricket_1  H x
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान होता. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियमांत बदल केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी जाऊन पोहोचला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी विराजमान असला, तरी या दोन्ही संघाचे गुण हे सारखेच होते. त्यामुळे या कसोटी मालिकेनंतरच गुणतालिकेत अव्वलस्थानी नेमका कोणता संघ विराजमान होतो, याचे चित्र स्पष्ट होणार, असे क्रिकेट वर्तुळात सर्वत्र चर्चिले जात होते. मात्र, अ‍ॅडिलेड येथील मैदानावर पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने गुणतालिकेत आघाडी घेतली. या कसोटी मालिकेचा योग्यरीत्या अभ्यास केला असता, पहिल्या डावात भारताचे पारडे हे ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत जड असल्याचेच आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र, तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही आणि भारताला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. इतकेच नव्हे, तर नीचांकी धावसंख्येच्या नकोशा विक्रमाच्या नोंदीचा शिक्काही भारतीय संघाच्या माथी मारला गेला. १९ डिसेंबर, २०१६ रोजी भारतीय संघाने ७ बाद ७५९ अशी धावसंख्या उभारत ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली होती. परंतु, १९ डिसेंबर, २०२० रोजी मात्र भारताच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद होणे म्हणजे या चार वर्षांत भारतीय संघाच्या प्रगतीची वाटचाल अपेक्षेपेक्षा काही प्रमाणात मंदावली, असे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. खरेतर भारताने चार वर्षांनंतर आणखी एका नव्या विक्रमाची नोंद करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता भारतीय संघाच्या खराब कामगिरीचे प्रदर्शन यावेळी दिसून आले. त्यामुळे विक्रमांच्या शिखरावर असलेला संघ आता पुन्हा पायथ्याच्या दिशेने तर वाटचाल करत नाही ना, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत क्रिकेट जाणकार आणि समीक्षकांनी पहिल्या कसोटी सामन्यानंतर नोंदविले आहे.
 
 
...म्हणून अपेक्षाभंग
 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघात काही आमूलाग्र बदल करण्याबाबत क्रिकेट समीक्षकांनी आणि जाणकारांनी सुचविल्यानंतर संघनिवडीवरून अनेक मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉच्या खराब कामगिरीची मालिका संपूर्ण ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) स्पर्धेत पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतरही त्याच्यावर विश्वास दाखवत निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड केली आणि पहिल्याच कसोटी सामन्यात पृथ्वी शॉला संधीही देण्यात आली. परंतु, या संधीचे सोने करण्यात तो अयशस्वी ठरला. त्याच्या अपयशाची मालिका येथेही सुरू राहिली आणि भारताची सुरुवातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काहीशी खराब झाल्याचे मत क्रिकेट समीक्षकांनी नोंदविले. पृथ्वी शॉचा फॉर्म खराब असतानाही त्याला निवड समितीने संघात का संधी दिली, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत समीक्षकांचे आहे. पृथ्वी शॉ ऐवजी ‘इंडियन प्रीमियर लीग’ स्पर्धेत, तसेच घरगुती क्रिकेट मैदानांवर सुमार कामगिरी करणाऱ्या अनेकांना येथे संधी देण्याचे पर्याय निवड समितीपुढे उपलब्ध होते. केवळ इतकेच नव्हे, तर सध्याच्या काळातील भारताची प्रसिद्ध सलामीवीर फलंदाजांची जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोन खेळाडूंपैकी कोण्या एकाला संधी देण्याचा पर्यायही भारतापुढे उपलब्ध होता. यष्टिरक्षक लोकेश राहुल हादेखील उत्तम फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला चर्चेत असून त्यालाही संधी देता आली असती. मात्र, या सर्व दिग्गजांकडे दुर्लक्ष करत निवड समितीला नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल क्रिकेट समीक्षकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याच्याऐवजी लोकेश राहुलला संधी देत त्याच्याकडून सलामीला फलंदाजी करून घेतल्यास भारताला मध्यम फळीत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या नामवंत खेळाडूंना संधी देता आली असती. परंतु, याकडेही निवड समितीने दुर्लक्ष केल्यामुळे भारतीय संघाची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही आणि अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम पाहावयास मिळाल्याच्या मुद्द्यावर समीक्षक बोट ठेवत आहेत. गेल्या सामन्यात ज्या चुका झाल्या, त्या चुका आता पुन्हा होणार नाहीत, हीदेखील एक अपेक्षा भारतीय संघाकडून असून निवड समितीने याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत समीक्षकांचे आहे.
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@