पारधी समाजाच्या उत्थानासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020   
Total Views |

Pintu pawar_1  
 
 
 
पारधी समाजास मूळ समाजप्रवाहात आणण्यासाठी पिंटू पवार कार्यरत आहेत. आजही समाजाचे प्रश्न आणि वास्तव पाहता, पिंटू पवार यांचे कार्य जाणून घ्यायला हवे. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
 
पारधी समाजाचे प्रश्न बदलले आहेत का? ब्रिटिशांनी दिलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसला गेला आहे का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरावर सोलापूरचे पिंटू पवार काम करतात. बनुदया पवार आणि ध्रुपदा या दाम्पत्याला पाच मुलं. तीन मुली आणि दोन मुले. त्यापैकी एक पिंटू. बनू हे मोलमजुरी करायचे. आपण भटकंती सोडून एका ठिकाणी स्थिर राहून इज्जतीचे जीणे जगावे, असे त्यांना वाटे. त्यासाठी उस्मानाबादमध्ये येवती गावी त्यांनी मुक्काम केला.
 
 
बनू दिवसभर मोलमजुरी करायचे, मिळालेल्या पैशातून घरी चूल पेटायची. एक दिवशी बनू मजुरी करायला निघाले आणि पोलीस दारात हजर झाले. काय झालं? विचारण्याआधीच बनूंना पोलीस चौकीत नेले. ध्रुपदांनी आणि पाच लहान पोरांनी रडून आकांत केला. सगळ्या गलक्यात एक गोष्ट कळली की, गावापासून जवळ कुठेतरी चोरी झाली होती. ती चोरी कुणी केली, याचा अजिबात थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे पारधी बनूनेच चोरी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्या दिवशी ध्रुपदाबाई आणि पाच मुलं दिवसभर पोलीस स्टेशनसमोर बसून राहिली. ऊन रणरणत होते. जेवण तर सोडाच; पण या सहा जणांनी पाण्याचा घोटही घेतला नाही. नंतर सूर्य मावळतीला आल्यावर कळले की, बनूवर पोलिसांनी आणखी २१ गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यांचे गुन्हेगार सापडत नव्हते. बनू त्यावेळी पत्नीला आणि पाच मुलांना भेटले. ते म्हणाले, “२२ पैकी एकाही गुन्ह्याबाबत मला काहीच माहिती नाही. मी, सिद्ध करणार की, हे गुन्हे मी केले नाहीत. ध्रुपदा, पोरांनो, मी चोर नाही.” ही घटना पिंटू कधीही विसरले नाहीत. मुलाने शिकावं म्हणून बनूंनी पिंटूना यमगरवाडी इथल्या वसतिगृहामध्ये शिकायला पाठविले. इथे आल्यावर पिंटू यांचे जग आणि दृष्टिकोनच बदलला. गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे आणि डॉ. सुवर्णा रावळ हे तिघेही जण अधून-मधून या लहानग्यांना भेटायचे. त्यांना सरळ सोप्या भाषेत जगण्याची आणि शिकण्याची उमेद द्यायचे. या तिघांना पाहून पिंटू यांना वाटे की, हे तिघेही आपल्या समाजाचे नाहीत. तरीसुद्धा आपल्याला घरच्यासारखेच वाटतात. आपणही यांच्यासारखेच काहीतरी चांगले काम करायचे.
 
 
पहिली ते पाचवी ते यमगरवाडीमध्ये शिकले. मग केव्हातरी बनू यमगरवाडीला आले. मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा म्हणून त्यांनी पिंटूला पुन्हा गावी नेले. पिंटू दहावीपर्यंत शिकले. बनू यांनी निश्चय तर केलाच होता की, आपली निर्दोषता सिद्ध करायची. त्यांनी आणि पिटूंनी वर्षोनुवर्षे कोर्टकचेरी केली. एक-एक करत बनू यांची २२ गुन्ह्यांतून निर्दोष म्हणून सुटका झाली. हा सगळा काळ पिंटू यांच्या समाजकार्याच्या अनुभव शिक्षणाचाच म्हणावा लागेल. या काळात समाज वास्तव, समाजाची मानसिकता, कोर्टकचेरी, प्रशासन, कायदे यांचा पिंटू यांना चांगलाच अभ्यास झाला. हा संघर्ष करता करता पिंटू यांनी वयाची तिशी पार केली होती. पण, आयुष्यातला संघर्ष ते जिंकले होते. ‘मेरा बाप चोर नहीं।’ हा दिवार सिनेमातला डायलॉग केवळ त्या सिनेमातल्या नायकाचेच भावविश्व नाही, तर त्या काळात पिंटूचे भावविश्वही हेच होते. पुढे पिंटू यांचा विवाह झाला. रोजगार मिळणे गरजेचे होते. हा विचार करून पिंटू सोलापूर शहरात आले. भाड्याने घर घेतले. इथे पती-पत्नी दोघांनीही कष्ट केले. मोलमजुरी केली. पै-पै जोडला आणि सोलापुरात घर घेतले. याच काळात कितीतरी समाजबांधव त्यांच्याकडे येऊ लागले. कारण, जराही न घाबरता, धीर न सोडता बनू यांनी स्वतःचे २२ गुन्ह्यांतले निर्दोषत्व सिद्ध केले होते. यामधली सगळी कोर्टकचेरी आणि व्यवहारनीतीमध्ये पिंटू यांचा सहभाग होता. त्यामुळे पंचक्रोशीतले कितीतरी पारधी तरुण पिंटू यांच्याशी संपर्क करू लागले. आपल्यावरही खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, हे सांगू लागले. आज इतक्या वर्षांनीही समाजाला हेच भोगावे लागत आहे, हे पाहून पिंटू यांनी ‘आदिवासी पारधी तरुण समाज संघटना’ २०१५ साली स्थापन केली. त्या माध्यमातून पारधी समाजावर होणार्‍या कोणत्याही अत्याचाराचे निवारण करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. पिंटू म्हणतात की, “माझ्याकडे अनेक समाजबांधव त्यांचे प्रश्न घेऊन येतात. मी त्यांना एकच सांगतो की, सत्य नेहेमी जिंकते. जर तुमची चूक नसेल, तरच मी मदत करू शकतो, नाहीतर मदत करणार नाही. दुसरे असे की, स्थिर व्हा, शिका आणि आपल्या धर्माचे पालन करा.”
 
 
असो. २०२० सालचा गणेशोत्सवही कोरोनाकाळातच गेला. पण, या काळात सोलापूरला एक घटना घडली. अहमदनगरहून एक पारधी स्त्री करमाळ्याला नातेवाईक आजारी होते म्हणून आली. इथे तिच्यावर अहमदनगरच्या एका व्यक्तीने बलात्कार केला. ती तशा अवस्थेत घरी आली. तिची परिस्थिती पाहून नातेवाइकांनी ओळखले की काय झाले असावे. बलात्कार झालेल्या स्त्रीला पती परत स्वीकारणार नव्हताच. काही चूक नसताना सर्वस्व हरवलेल्या त्या महिलेने आवाज उठवायचे ठरवले. तिने पिंटू पवार यांच्याशी संपर्क साधला. पिंटू आणि त्यांची पत्नी तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. पण, इथेही कोणत्या समाजाची स्त्री आहे? पारधी का? असे म्हणून बाहेर तासन्तास थांबविले गेले. तिच्यावर बलात्कार झाला हे सिद्ध करण्यासाठी तिची आरोग्य तपासणी होणे गरजेचे होते. पण, इथे तर साधी तक्रार नोंदवून घ्यायची मारामार होती. पिंटूंनी डॉ. सुवर्णा रावळांकडून मार्गदर्शन घेऊन मुंबईच्या ‘स्वयं महिला मंडळा’च्या मदतीने त्या महिलेला न्याय मिळवून दिला. पिंटू म्हणतात की, “त्या बहिणीचे आणि न्याय मिळवून दिलेल्या अनेक समाजबांधवांचे आनंदाश्रू मला बळ देतात. सांगतात की, तुझ्या ज्ञानाचा मेहनतीचा उपयोग आमच्यासारख्या गांजलेल्या लोकांसाठी कर. त्यामुळे आयुष्यभर मी समाजबांधवांसाठी काम करणार आहे.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@