‘कोरोना’चे नवे कोडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020   
Total Views |

England_1  H x
 
 
 
कोरोना जगभरातून अथवा भारतातून अजूनही हद्दपार झालेला नाही, उलट या विषाणूने आपले रंग-ढंग-स्वरूप बदलून मानवजातीसमोर एक नवीन आव्हानच उभे केले आहे. तेव्हा, नवीन वर्षीही आपण सर्वांनी स्वत:ची काळजी घेण्याचाच संकल्प करूया आणि कोरोनाला दूर ठेवूया!
 
 
 
कोरोनाविरोधी लसीकरणानेही २०२१च्या उंबरठ्यावर वेग घेतला. जगभरात विविध लसींच्या यशस्वी चाचण्याही पार पडल्या. काही देशांमध्ये तर लसीकरणाचा शुभारंभही झाला. एकूणच २०२१ हे वर्ष नक्कीच कोरोना महामारीचा सर्वार्थाने पाडाव करणारे ठरेल, अशी सकारात्मकता जगभर पसरली असतानाच, ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या विषाणूने सगळ्या आनंदावर एकाएकी विरजण टाकले. नाताळ आणि नवे वर्ष अवघ्या काही दिवसांवर असताना, ब्रिटनमधील लंडनसह काही भागात कडक ‘लॉकडाऊन’ प्रतिबंध घोषित करण्यात आले. याला कारणीभूत ठरला लंडनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू ‘SARS-Cov-2’
 
 
खरंतर हा विषाणू काही एकाएकी डिसेंबरमध्ये जगाच्या पाठीवर अवतरला किंवा त्याची मुद्दाम निर्मिती करण्यात आली, असे नाही. सप्टेंबरमध्येच कोरोनाचा हा नवा विषाणू इंग्लंडच्या आरोग्य व्यवस्थेच्या सर्वप्रथम निदर्शनास आला होता. त्यावर संशोधनही सुरू होते. पण, डिसेंबर उजाडता उजाडता या विषाणूने लंडनमध्ये आपला जम चांगलाच बसविला. इतका की, एकट्या लंडनमध्ये जे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी ६० टक्के रुग्ण हे या नव्या विषाणूनेच बाधित होते. परिणामी, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नाइलाजाने कडक ‘लॉकडाऊन’ घोषित केले आणि लंडनवासीयांना घरातून अजिबात बाहेर न पडण्याच्या सूचनाही केल्या.
 
 
अचानक झालेल्या या ‘लॉकडाऊन’च्या घोषणेने संपूर्ण देशात घबराट पसरली. नाताळचा उत्साही माहोल एकाएकी उलटला. लंडनवासीयांचीही अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. काहींनी तर लंडन शहरातून बाहेर जाण्यासाठी गाड्याही रस्त्यावर उतरवल्या. पण, कडक निर्बंधांमुळे लंडनमधून बाहेर पडणे हे जवळपास अशक्यच होते. त्यात स्कॉटलंड, उत्तर आर्यलंड यांनीही आपल्या सीमा सील केल्या. बेल्जियम, हाँगकाँगसारख्या देशांनी इंग्लंडमधून दाखल होणाऱ्या आणि उड्डाण करणाऱ्या विमानांवरही लगोलग बंदी घातली. त्यामुळे पहिल्यांदा जशी कोरोनामुळे घबराट पसरली होती, त्याचीच वर्षाच्या अखेरीस पुनरावृत्ती लंडनमध्ये होताना दिसते.
 
 
खरंतर कोरोनाच्या या नव्या विषाणूबद्दल अद्याप फारशी माहिती शास्त्रज्ञांकडेही उपलब्ध नाही. पण, समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा हा नवा विषाणू ७० टक्के अधिक वेगाने संक्रमित होत असून, त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच सामान्य कोरोना विषाणूवरील आणि या नव्या विषाणूवरील ‘स्पाईक प्रोटीन’मध्येही फरक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. एका निष्कर्षानुसार, सामान्य कोरोना विषाणूपेक्षा नवीन कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १७ विविध बदल आढळले आहेत. त्यामुळे हा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा अधिक घातक ठरू शकतो, असे अनुमान आहे. कोरोनावरील लस या नव्या विषाणूचाही प्रतिरोध करू शकते, असे काही शास्त्रज्ञांना वाटते, तर काही तज्ज्ञांनी याबाबत एवढ्यातच कुठलाही ठोस निष्कर्ष काढता येणार नसल्याचे अधिक संशोधन करण्याची गरज अधोरेखित केली.
 
अद्याप इतर देशांमध्ये कोरोनाचा हा नवा विषाणू आढळून आला नसला, तरी दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा असाच एक नवीन प्रकार आढळला असून त्याकडेही ‘जागतिक आरोग्य संघटना’ लक्ष देऊन आहेच. आता हा नवीन विषाणू भारतात दाखल होईल; अथवा नाही, हे सांगणे कठीण असले, तरी जगभरातील हवाई प्रवासाचे निर्बंध उठविल्यामुळे इथेही त्याचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतातही इंग्लंडवरून येणाऱ्या आणि उड्डाण करणाऱ्या विमानप्रवासावर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी सरकारने घोषित केली आहे. त्यात २६ जानेवारी, या आपल्या प्रजासत्ताक दिनी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना विशेष अतिथी म्हणूनही आपण निमंत्रित केले आहे. पण, एकूणच त्यांच्याच देशातील महामारीची ही दुसरी लाट लक्षात घेता, ते स्वत: या सोहळ्याला हजेरी लावतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
 
 
एकूणच, कोरोना जगभरातून अथवा भारतातून अजूनही हद्दपार झालेला नाही, उलट या विषाणूने आपले रंग-ढंग-स्वरूप बदलून मानवजातीसमोर एक नवीन आव्हानच उभे केले आहे. तेव्हा, नवीन वर्षीही आपण सर्वांनी स्वत:ची काळजी घेण्याचाच संकल्प करूया आणि कोरोनाला दूर ठेवूया!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@