मुंबई : जनतेशी संवादच्या नावाखाली मुख्यमंत्री यांचे राजकीय भाषण ?, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी १ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला. मात्र, यावेळी कोरोना आणि इतर महत्वपूर्ण घोषणा करण्याऐवजी त्यांनी मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेल्यावर फायदा कसा होईल, याचा पाढा वाचून दाखवला.
यातही त्यांनी केंद्र सरकार व राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. "विकासात केंद्र व राज्य संघर्ष नसतो, जनतेचे हित सर्वतोपरी ठेऊन आघाडी सरकारने निर्णय केले असते तर प्रश्न निर्माण झाला नसता!", असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मेट्रो ३ नव्हे तर अन्य कारशेडही कांजूरमार्गलाच !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी साधलेल्या संवादात मेट्रो ३ कारशेड सोबतच या जागेचा वापर मेट्रो ३, ४ आणि ६ या मार्गांच्या कारशेडसाठी करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. कांजूरमार्ग कारशेडला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केले. मात्र, यावेळीही त्यांनी नेमकी स्पष्टता केलेली नाही.
ते म्हणाले, "कांजूरचे काय प्रकरण आहे ? तर ही ३० वजा ५ अशी २५ हेक्टर जागा आणि कांजूरची ४० हेक्टर जागा, म्हणजे सुरुवातीलाच २५ आणि ४० एवढा फरक! मला धक्का बसला की मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पात 'Stabling Line' चा प्रस्तावच नव्हता. आता आपण आरेच्या टोकावर जिथे Casting Yard आहे तिथे ही लाईन करतोय. कांजुरची जागा आपण एवढ्यासाठी घेतली की आरेला फक्त मेट्रो ३ ची कारशेड होणार होती आणि कांजुरला मात्र ३, ४ आणि ६ ह्या ३ लाईनच्या कारशेड आपण करू शकतो. काही फरक आहे की नाही आहे?, असे ठाकरे म्हणाले.