कांजूरमार्ग कारशेडचे महत्व पटवून देण्यासाठी 'सीएम' मैदानात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |

CMO Maharashtra_1 &n
 
 


स्थगितीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन




मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी १ वाजता जनतेशी संवाद साधला. त्यावेळी कोरोना, मेट्रो कारशेडसह अन्य मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. 'कोरोनाने तिकडे आपला अवतार बदलला आहे. काळाप्रमाणे त्याने त्याची गती वाढवली आहे. तिथे हीच भीती आहे की लॉकडाऊन नाही केला तर झपाट्याने पसरणारा व्हायरस गेल्या वेळेपेक्षा अधिक मोठा हाहाकार पसरवू शकेल.', असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
 
 
"मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे. जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे.", असे खबरदारीचे आवाहन त्यांनी केले.
 
 
"गेल्या मार्चपासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट दिसायला लागले. त्यानंतर त्याची वाढ किती झाली, कमी कसे झाले, दुदैवाने मृत्यू किती झाले हे सर्व काही आपण जगासमोर अत्यंत पारदर्शकपणे ठेवलेलं आहे. घशाचं इंफेक्शन, सर्दी, खोकला ताप या सर्वांवर औषधे असली तरी कोविडसाठी प्रतिबंधात्मक इलाज तोच आहे, मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं तर कोविडच काय तर इतर कोणतेही साथीचे आजार आपल्यापासून अंतर ठेवू शकतात.", अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
"युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये आजपासून आधीपेक्षा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. का करावा लागला? आता न्यू इयर येणार. जसं आपण शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत करणार तसंच तेही करणार. हा टप्पा तिथे गर्दीचा असतो. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाऊन केलाय. कोरोनाने तिकडे आपला अवतार बदलला आहे. काळाप्रमाणे त्याने त्याची गती वाढवली आहे. तिथे हीच भीती आहे की लॉकडाऊन नाही केला तर झपाट्याने पसरणारा व्हायरस गेल्या वेळेपेक्षा अधिक मोठा हाहाकार पसरवू शकेल.", असे ठाकरे म्हणाले.
 
 
नाईट कर्फ्यू लागणार का ?
 
 
जूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण, ते का करायचं? ७०-७५% लोकं चेहऱ्यावर मास्क घालून फिरत असतात. पण उरलेल्यांना मी सूचना देतो की आपणही ही बंधन पाळा. कारण यामुळे केवळ आपल्यालाच धोका निर्माण होतो असं नाही पण जे ७०-७५% लोकं सावधानता बाळगत आहेत त्यांना हा धोका होऊ शकतो, आपल्या कुटुंबियांना हा धोका होऊ शकतो. मला असं वाटतं की आजार आणि इलाजापेक्षा काळजी घेतलेली बरी. पुन्हा एकदा सांगतो की नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण सावध रहा. लग्नसराई सुरू झाली आहे, आपली प्रथा आहे की आमंत्रण घेऊन जायचं आणि "यायचं हं... सहकुटुंब सहपरिवार लग्नाला आलंच पाहिजे" असा आग्रह करायचा. आपल्या आप्तस्वकीयांना आमंत्रण द्या, कोरोनाला देऊ नका., असे आवाहन करत त्यांनी नाईट कर्फ्यूबद्दल सुतोवाच केले आहे. राज्यात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरपूर्वी नाईट कर्फ्यू लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
 
 
विकासकामांचा आढावा
 
 
"२८ नोव्हेंबरला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि विश्वासाने महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. अनेक जण डोळे लावून बसले होते आता पडेल, उद्या पडेल. पण जगात १०० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती आली होती तिचा सामना करत, राजकीय हल्ले परतवून लावत, विकास करत एक वर्ष पूर्ण केलंय. गेल्या महिन्यापासून आपल्या राज्यात जी विकासकामे सुरू आहेत, त्याची पाहणी सुरू केली आहे. सुरुवातच केली ती, माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या एकूण कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन. नागपूरपासून सुरुवात केली. रस्त्याचा दर्जा पहिला, वन्य प्राण्यांसाठी अंडरपास कसे दिले आहेत, काम किती वेगाने चालले आहे, काम कधी पूर्ण होईल याची पाहणी केली आणि मी जाहीर केलं की येत्या १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी हा टप्पा आपण वाहतुकीसाठी खुला करत आहोत.", असे म्हणत त्यांनी विकास कामांचा आढावा घेतला.
 
 
मेट्रो आरे कॉलनी - कांजूर मार्गे बीकेसीत ?
 
 
कांजूरमार्ग कारशेडला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केले. मात्र, यावेळीही त्यांनी नेमकी स्पष्टता केलेली नाही. ते म्हणाले, "कांजूरचे काय प्रकरण आहे ? तर ही ३० वजा ५ अशी २५ हेक्टर जागा आणि कांजूरची ४० हेक्टर जागा, म्हणजे सुरुवातीलाच २५ आणि ४० एवढा फरक! मला धक्का बसला की मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पात 'Stabling Line' चा प्रस्तावच नव्हता. आता आपण आरेच्या टोकावर जिथे Casting Yard आहे तिथे ही लाईन करतोय. कांजुरची जागा आपण एवढ्यासाठी घेतली की आरेला फक्त मेट्रो ३ ची कारशेड होणार होती आणि कांजुरला मात्र ३, ४ आणि ६ ह्या ३ लाईनच्या कारशेड आपण करू शकतो. काही फरक आहे की नाही आहे?, असे म्हणत त्यांनी कांजूरमार्ग कारशेडचे फायदे वाचून दाखवले.
 
विरोधकांवर टीका
 
 
"आरेमध्ये हे काम केलं तर पुढच्या ५ वर्षांत कमी पडणार आणि कांजूरला केलं तर पुढच्या ५०-१०० वर्ष आपण वापरू शकू. तुम्ही सांगा मला. हा अहंकार आहे की उपयोग? पण दुर्दैव का वाटलं मला? आपल्याविरुद्ध केंद्र सरकार कोर्टात गेलं. ते Salt Commissioner. कशासाठी जाताय? कशासाठी खेचाखेची करताय? राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर माझ्या राज्यासाठी, माझ्या जनतेच्या हितासाठी पुढच्या ५-५०-१०० वर्षांसाठी जे उपयुक्त राहील ते मी मुख्यमंत्री म्हणून करणार. ते माझं कर्तव्य आहे. राज्याची हक्काची मोक्याची जागा, ज्याचा उल्लेख कदाचित जगातील सर्वात महागडा भूखंड असा होऊ शकेल असा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सचा काही हजार कोटींचा भूखंड आपण बुलेट ट्रेनला दिला. त्याच्यावरचं International Finance Centre हे इतर राज्यात गेलं. आम्ही खळखळ नाही केली.", अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
 
 
मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनच्या विरोधाचे सांगितले हे कारण ?
 
 
"बुलेट ट्रेनला विरोध होतोय त्या शेतकऱ्यांना मी भेटलो, वाढवणला विरोध होतोय त्या शेतकऱ्यांना मी भेटलो. शेतकऱ्यांना नुसतं अडवून ठेवायचं, त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारायचे, असं नाही चालणार, ही लोकशाही नाही. मुंबईमध्ये दरवेळी पावसाळ्यात बातम्या येतात की मुंबईची तुंबई झाली. आता मान्य केलं पाहिजे की मुंबईची भौगोलिक रचना ही समुद्रसपाटीपासून काही ठिकाणी खाली आहे. मग अतिवृष्टी झाली आणि समुद्राला भरती असेल तर मुंबईचं पाणी समुद्रात जाण्याच्या ऐवजी समुद्राचं पाणी मुंबईत येतं, हे सत्य आहे.", असे ठाकरे म्हणाले.
 
विरोधी पक्षांना आवाहन !
 
माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे "चला, या... आम्ही तुम्हाला याचं श्रेय द्यायला तयार आहोत. कांजूरचा प्रकल्प तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवा, कारण हा प्रश्न एकत्र चर्चेला बसलो तरी सुटू शकतो." इथे माझ्या इगोचा विषय नाही आहे आणि तुमच्याही असता कामा नये. केंद्राचे कोणतेही प्रकल्प येतात तेव्हा आपण खळखळ न करता जागा देतो मग भले ही जमीन केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडू शकतो. तिथे बिल्डर गेलेले आहेत. वाद आहे म्हणून जागा सोडून द्यायची? मग वाद सोडवणार कोण? कोणाच्या घश्यात ही जागा जाणार? बिल्डरच्या? त्या पेक्षा केंद्राने आणि राज्याने जर एकत्र बसून हा वाद सोडवायला हवा. आपण ही राज्याची जागा, जनतेची जागा जनतेच्याच उपयोगात आणू इच्छित असू तर त्यावरून खेचाखेची कशाला?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
खोटं बोललो नाही खोटं बोलणार नाही !
 
 
"अनेक जण मला सांगत असतात की मी ज्यावेळी आपल्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरातीलच मोठा भाऊ, आपला कुटुंबीय बोलतोय असं वाटतं, मी तेच नातं कायम ठेऊ इच्छितो. मी जे आपल्याशी बोलेन आणि मी जे आपल्याशी बोलतो, मी एक शब्दही खोटं बोललो नाही आणि खोटं बोलणार नाही. तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं मी कदापि करणार नाही. मी ज्या खुर्चीवर बसलोय त्या खुर्चीचं महत्त्व मला माहीत आहे, या खुर्चीवर बसताना वैयक्तिक आवडनिवड ठेवून चालत नाही. पुन्हा एकदा सांगतो की कोरोनाचा धोका टळलेला नाही आणि तो टाळायचा असेल तर आपण कुठेही गाफील राहू नका, अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नका, उगाच रात्री, संध्याकाळी एकत्र येऊन मास्क काढून बोलू नका, मास्क लावा, हात धुवा आणि अंतर ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र!", असे म्हणत त्यांनी निरोप घेतला.



@@AUTHORINFO_V1@@